विजेच्या या धक्क्याने आणखी एक जण गंभीर जखमी
आयर्विन टाइम्स / चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर या जंगलव्याप्त गावात बुधवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी कुंपणात अचानक आलेल्या विजेच्या धक्क्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना सकाळी सुमारे १० वाजता गणेशपूर शेतशिवारात घडली. मरण पावलेल्यांमध्ये प्रकाश राऊत (वय ४८), नानाजी राऊत (५५), युवराज डोंगरे (४२) हे गणेशपूरचे रहिवासी असून, पुंडलिक मानकर (६२) हे चिंचखेडा गावातील होते. जखमी सचिन नन्नावारे (३५) याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
गणेशपूर गाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरात दरवर्षी वन्यप्राणी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होतो. भास्कर राऊत या शेतकऱ्याने धानपिकाचे संरक्षण करण्यासाठी लोखंडी तारांचे कुंपण लावण्याचे काम सुरू केले होते. शेतातील पिकाला खत घालून झाल्यानंतर त्यांनी आपल्या चुलत भावासह इतर तीन लोकांना कुंपण लावण्यासाठी शेतात बोलवले होते.
दुर्दैवी क्षण आणि विद्युत धक्का
सर्वजण धानपिकाला खत घालून कुंपण लावण्याचे काम करत असताना अचानक त्या कुंपणाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित झाला. याचा जोरदार धक्का लागल्यामुळे पाच जणांना विजेचा धक्का बसला, त्यापैकी चार जण जागीच मृत्यूमुखी पडले. जखमी सचिन नन्नावारे याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि महावितरणचे अधिकारी देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. गावातील एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गणेशपूर गावात शोककळा पसरली आहे.
वीज प्रवाह कुठून आला?
या दुर्घटनेमागे नेमके काय कारण होते, याबद्दल अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मृतकांच्या कुटुंबियांनी सांगितले की, पीक संरक्षणासाठी बॅटरीचा उपयोग केला जातो. बॅटरीचा वापर करण्यापूर्वी तारांचे कुंपण लावले जात होते. मात्र बॅटरी लावण्याआधीच त्या तारांमध्ये वीजप्रवाह कसा आला, हे अजूनही गूढच आहे.
पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त करताना सांगितले की, मृतक राऊत यांच्या शेतात कूपनलिका आहे, जिथे वीज प्रवाहित आहे. कुंपण लावत असताना कदाचित कूपनलिकेच्या विजेची तार तुटली असावी आणि त्या तारेचा संपर्क कुंपणाच्या तारांशी आला असावा, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असावी. तरीसुद्धा, वीज वितरण कंपनीच्या तपासणीनंतरच या दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल.
विजेच्या या धक्क्याने गावावर दु:खाचे सावट
या भयानक घटनेमुळे गणेशपूर गावात शोकाकुल वातावरण आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांसह, गावातील चार लोकांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावावर दु:खाचे सावट पसरले आहे.