घरगुती किरकोळ वादातून ही खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट
आयर्विन टाइम्स / नांदेड
नांदेड शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाचा १ सप्टेंबर रोजी राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सहा दिवसांनंतर पोलिस तपासातून या प्रकरणाचे रहस्य उलगडले आहे. मुलानेच मित्राला दोन लाखांची सुपारी देऊन वडिलांचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. घरगुती किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. मुख्य आरोपी मुलासह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, सुपारी घेणारा आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शेख यासेर अरफाद शेख युनूस, शेख अमजद शेख इसाक, आणि योगेश शिवाजी निकम अशी संशयित आरोपींची नावे आहेत. खडकपुरा येथील रहिवासी शेख युनूस शेख पाशा यांचे मदिना हॉटेल आहे. ३१ ऑगस्टच्या रात्री ते कुटुंबीयांसोबत झोपले होते, परंतु १ सप्टेंबरला सकाळी त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला. सदर खून प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेज तपासताना दोन तरुण घटनेच्या दिवशी घरात शिरल्याचे दिसले. त्यानुसार पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली.
हे देखील वाचा: Alimony: वडिलांना दरमहा 40 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश: वैजापूर न्यायालयाचा निर्णय
तपासादरम्यान, मृताचा मुलगा शेख यासेर अरफाद याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने वडिलांच्या खुनाची कबुली दिली. त्याने सांगितले की, वडील मला आणि आईला मारहाण करीत होते आणि मानसिक त्रास देत होते. यामुळे त्याने मित्राला दोन लाख रुपयांची सुपारी देऊन वडिलांचा खून करवला.
मुलाने घटनेच्या रात्री घराचे मुख्य गेट आणि बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवला होता, आणि रात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान दोन मित्रांनी घरात प्रवेश करून हॉटेल व्यावसायिकाचा खून केला आणि त्याचा मार्गाने निघून गेले. सकाळी मुलानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली.
१० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी मनमान येथील शेख अमजद शेख इसाक आणि योगेश शिवाजी निकम यांना ताब्यात घेतले आहे. सुपारी घेणारा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. संशयित आरोपींना शुक्रवारी (ता. ६) न्यायालयात हजर केले असता, त्यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले.