आटपाडी, सांगोला, सांगली, आणि कोल्हापूर येथील सराफांना गंडा
आयर्विन टाइम्स / सांगली
मागील पंचवीस वर्षांपासून जुने सोने घेऊन त्याचे दागिने बनवून देणाऱ्या आटपाडी, सांगोला, सांगली, आणि कोल्हापूर येथील गौतम गोपाल दास आणि सौरभ गोपाल दास (मूळ गाव: गोपालनगर, दक्षिणपाडा, पूर्वमैदानापूर, कोलकाता) यांनी २० ते २५ सराफांकडून १८ किलो सोने घेऊन फरार झाले आहेत. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद भारत जवळे यांनी आपली तीन किलो चारशे ग्रॅम सोन्याची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की, जवळे ज्वेलर्स गेल्या ३५ वर्षांपासून लोकांचे जुने सोने घेऊन नवीन दागिने बनवून विकत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत गौतम आणि सौरभ दास हे जुन्या सोन्याचे दागिने बनवून देत होते. त्यांनी आपल्या व्यवसायाच्या विश्वासार्हतेमुळे इतर अनेक विक्रेत्यांचा विश्वास मिळवला होता. ते आठवड्यातून एकदा सांगलीहून आटपाडीला येत आणि सोने घेऊन जात असत.
गेल्या आठवड्यात प्रसाद जवळे यांच्याकडून तीनवेळा सोने नेल्यावर आज दागिने परत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते सोने घेऊन अचानक गायब झाल्याने जवळे यांच्यासह इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. जवळे यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे तीन किलो चारशे ग्रॅम सोने दास बंधूंनी नेले आहे. याशिवाय, संदीप नानासो जाधव, सचिन शिवाजी काटकर, नानासो तुळशीराम बोधगिरे, प्रमोद भोसले, सुरेश चव्हाण, शंकर चव्हाण, बाळासाहेब गिड्डे, मोहन गिड्डे, शशिकांत जाधव, राहुल होनमाने आदी २०-२२ सराफांकडून सुद्धा सोने घेऊन हे दोघे फरार झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जत तालुक्यातील बागेवाडीत एकाकडून धारदार शस्त्र हस्तगत
जत तालुक्यातील बागेवाडी (जि. सांगली) येथे एकाकडून बेकायदेशीरपणे बाळगलेल्या दोन तलवारी व एक कोयता पोलिसांनी हस्तगत केला. शुक्रवारी (ता. ३०) १.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत जत पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी गोविंद चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी देविदास ज्ञानू शिंगाडे (वय ३०, बागेवाडी, ता. जत) याच्यावर बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
देविदास हा बागेवाडी गावात बेकायदेशीर शस्त्र बाळगून असल्याचे माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याच्यावर कारवाई करत शस्त्र ताब्यात घेतले
आहेत. याची पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास जत पोलिस करत आहेत.
जत तालुक्यातील करजगी येथील दारूचे दुकान फोडले
जत तालुक्यातील करजगी (जि. सांगली) येथे चोरट्यांनी दारूचे दुकान फोडून बासष्ट हजारांचा मुद्देमाल पळवून नेला. शुक्रवारी (ता. ३०) पहाटे ही घटना घडली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात चंद्रजित अजितसिंह खानविलकर (वय ४६, व्यवसाय देशी दारू दुकान, रा. खानविलकर वाडा जत ता. जत) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी चंद्रजित खानविलकर यांचे दारूचे दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करून दुकानातील ६२ हजार ५४० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने चोरून नेला आहे. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलिस करत आहेत.
मिरजेत गांजा विकणाऱ्या तरुणास पकडले
सांगली जिल्ह्यातील मिरजेतील पंढरपूर रोडवरील एस. एस. कॉलेजजवळ ज्यादा दराने विक्री करण्यासाठी तयार गांजा आणलेल्या तरुणाला जेरबंद केले. या तरुणाकडून तयार गांजा, एक दुचाकी आणि सॅक असा एकूण ६० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चेतन कुमार चौगुले (वय ३० आशा टॉकीज जवळ, मिरज जि. सांगली ) याला अटक केली आहे.
गांजा विक्री करणाऱ्या संशयितावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईसाठी गस्त घालत होते. मिरजेतील पंढरपूर रोडवर असलेल्या एस. एस. कॉलेजजवळील टपरीवर एक तरुण गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती पथकाला मिळाली.
सापळा लावून संशयित चेतन चौगुले याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ असणाऱ्या सॅक मध्ये ८७७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला. या गांजा बाबत चौकशी केली असता त्याचा तो कोल्हापूर जिल्ह्यातील फुलेवाडी येथील मित्र आयुब पिरजादे याच्याकडून कमी दराने खरेदी करून जादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले.
वाळवा तालुक्यातील एका गावातील ७५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका गावातील ७५ वर्षीय वृद्धेवर युवकाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी सोमनाथ चंद्रकांत शिंदे (वय २८) या संशयिताला इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद पीडित वृद्धेनेने पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित पिडीत घरी येत असल्याने ओळखीचा होता.
शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वृद्ध महिला घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन संशयित आरोपी शिंदे याने बलात्कार केला. पीडितेने आरडाओरड केल्या नंतर शेजारच्या महिलांनी त्या ठिकाणी धाव घेतली. संशयितास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक निरीक्षक राहुल घुगे यांच्या पथकाने तत्काळ धाव घेतली.
गणेशोत्सवाच्या कालावधीत वर्गणीसाठी जबरदस्ती ; सांगलीतील कुपवाड येथील दोघांना शिक्षा
नऊ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या कालावधीत वर्गणीचा तगादा लावत जबरदस्तीने शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोघा सराईतांना पुढील एक वर्षासाठी चांगल्या वर्तणुकीच्या बॉण्डवर खुले करत त्यांना नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली.
दीपक हेमंत जाधव (वय १९), रोहित हेमंत जाधव (२२, दोघे रामकृष्णनगर, कुपवाड -सांगली ) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त गुन्ह्यात
अन्य दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे आढळून आले. याची फिर्याद खातुन मौला मोमीन (वय ४५ रा. रामकृष्णनगर, कुपवाड) यांनी २०१६ मध्ये कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१५ मधील गणेशोत्सवादरम्यान सराईतांसह दोघे अल्पवयीन फिर्यादींच्या घरी वर्गणी मागण्याकरिता गेली आणि ‘किमान पाचशे रुपयांची वर्गणी हवी, त्याखाली रकमेची वर्गणी स्वीकारणार नाही,’ असे
ठणकावले.
पाचशे रुपयांसाठी तगादा लावत फिर्यादीसह मुलांना दमदाटी व शिवीगाळ केली. यानंतर शिवीगाळ करत खंडणी मागितली. जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी मोमीन यांनी कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला तेथून नऊ वर्षे न्यायालयात चालला. ऑगस्ट २०२४ मध्ये न्यायालयाने सुनविलेल्या निर्णयानुसार चौघांपैकी दीपक व हेमंत जाधव या दोघांना दोषी ठरवले.