आत्महत्या: पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त
आयर्विन टाइम्स / सांगली
मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे पोलिस कर्मचारी सचिन शिवाजी जाधव (वय ४२) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांनी आत्महत्त्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून त्यात नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
‘अपयशामुळे मी आत्महत्या करत आहे’ असा चिठ्ठीत उल्लेख
पोलिसांनी सांगितले, की पोलिस कर्मचारी सचिन जाधव हे यापूर्वी जत पोलिस ठाण्यात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी पोलिस मुख्यालयाकडे बदली झाली. बुधवारी (दि. २८) रोजी ते रात्री घराजवळील नागेश बाळू इटकर यांच्या शेतात गेले होते. तेथे विष घेतले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यावेळी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली. ‘अपयशामुळे मी आत्महत्या करत आहे’ असा चिठ्ठीत उल्लेख आहे.
सचिन जाधव हा एकुलता एक मुलगा
पोलिसांनी मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात नेला. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. तरुण पोलिस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.
सचिन जाधव हा एकुलता एक होता. त्याच्या बहिणीचा विवाह झाला आहे. त्याला दोन मुले आहेत. सचिनचे वडील बस वाहक होते तर चुलते पोलिस दलात होते. चुलते काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले. सचिन यांच्या आत्महत्येने गावातही हळहळ व्यक्त होत आहे.
हनुमाननगरमध्ये वृद्धा चिरडून ठार: गाडी मागे घेताना अपघात; चालकावर गुन्हा
सांगली शहरातील हनुमाननगर येथे मारुती मंदिराजवळ मालवाहतूक गाडी मागे घेताना झालेल्या अपघातात वृद्धा ठार झाली. पाठीमागचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे त्या चिरडल्या गेल्या. लक्ष्मीबाई रामाप्पा दळवी (वय ७५, रा. महावीर कॉलनी, गणपती मंदिराजवळ, विश्रामबाग) असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत चालक अजित आप्पासाहेब मोहिते (रा. हनुमाननगर) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मीबाई दळवी या गुरुवारी सकाळी हनुमाननगर येथे फिरत गेल्या होत्या. हनुमाननगर सातव्या गल्लीत शनी मारुती मंदिरासमोर त्या थांबल्या होत्या. तेव्हा अजित मोहिते हा मालवाहतूक गाडी मागे घेत होता. त्याने बेदरकारपणे गाडी मागे घेत रस्त्यावर थांबलेल्या दळवी यांना धडक दिली. धडकेत त्या खाली पडल्यानंतर गाडीचे पाठीमागचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी मृत लक्ष्मीबाई यांचा मुलगा दऱ्याप्पा रामाप्पा दळवी (वय ५१ ) यांने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चालक मोहिते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सांगलीत हॉटेलमध्ये तरुणावर कुकरीने हल्ला
सांगली शहरातील एका बारमध्ये दारू पिण्यास बसलेल्या तिघांनी किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीतून तरुणावर कुकरीने डोक्यात वार केला. पवन बाबूराव सावंत (वय २९, बुधगाव, सांगली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघा हल्लेखोरांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी जखमी सावंत याचे वडील बाबूराव यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादींचा मुलगा पवन हा काल दुपारी अडीचच्या सुमारास संपत चौकातील प्रशांत बारमध्ये दारू पिण्यासाठी बसला होता. त्यावेळी त्यांच्या शेजारच्या टेबलावर अनोळखी तिघेजण बसले होते. दारू पिताना तिघा संशयितांनी पवन यास, ‘तू आमच्याकडे वाकड्या नजरेने का पाहतोस ?’ म्हणून वाद घातला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयिताने जवळील कुकरीने पवन याच्या डोक्यात वार केला. घाव वर्मी बसल्याने पवन खाली कोसळला.
यावेळी परिसरातील नागरिक जमा झाल्याने तिघांनी तेथून पलायन केले. उपस्थितांनी तातडीने पवन यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तिघा हल्लेखोरांविरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा नोंद केला.
सोनसाखळी चोरणारा चोरटा सांगलीत गजाआड
सांगलीतील विश्रामबागमधील वान्लेसवाडीतील दत्त मंदिर परिसरात महिलेच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसडा मारुन पसार झालेल्या चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले. हबीब दिलावर शेख (वय १९, हनुमाननगर, गल्ली क्रमांक १, सांगली) असे त्याचे नाव आहे. चोरीच्या ऐवजासह दुचाकी असा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी रंजना रमेश पाटील चार दिवसांपूर्वी वान्लेसवाडी परिसरातील दत्त मंदिरात गेल्या होत्या. तेथून बहिण सरस्वती पाटील यांच्याकडे निघाल्या होत्या. एका दुकानासमोर आल्या असता दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसडा मारुन पसार झाले. पोलिस अंमलदार बिरोबा नरळे, महंमद मुलाणी, योगेश पाटील यांना तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहिम राबवून संशयित हबीब शेखला जेरबंद केले. चौकशी केली असता
त्याने सोनसाखळी हिसकावल्याची कबुली दिली.