आळंदी

आळंदीजवळील दुर्घटनेतील एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता

आयर्विन टाइम्स / पुणे
पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळील इंद्रायणी नदीत सोमवारी (ता. १९) सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने पुणे जिल्हा हादरून गेला आहे. मोशीतील महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान संचलित वेदश्री तपोवन संस्थेतील ७१ विद्यार्थी नारळी पौर्णिमेनिमित्त इंद्रायणी नदीवर स्नानासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे विद्यार्थी बुडू लागले, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे.

या विद्यार्थ्यांचे वय १६ ते १९ वर्षे असून, ते राज्यातील वेगवेगळ्या भागांतून वेद अभ्यासासाठी आले होते. आळंदी जवळील डुडुळगाव येथील हवालदार वस्तीजवळ सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा या श्रावणातील सणांदरम्यान नदीत स्नान करण्याची प्रथा असते. या प्रथेनुसार, वेदश्री तपोवन संस्थेतील हे विद्यार्थी नदीत स्नानासाठी गेले होते.

आळंदी

स्नानदरम्यान, आळंदी जवळील इंद्रायणी नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने चार विद्यार्थी बुडू लागले. यावेळी जय ओमप्रकाश दायमा (वय १९, मूळगाव वणी, जि. नाशिक) या विद्यार्थ्याने धाडसाने पाण्यात उडी घेतली आणि अर्चित दीक्षित आणि चैतन्य पाठक या दोघांना पाण्याबाहेर काढले. मात्र, स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात जयला पाण्याचा मोठा धक्का बसला. त्याला तात्काळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) नेण्यात आले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा: crime news: कुरळप पोलिसांची यशस्वी कारवाई: दोन म्हैस चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक, 4.62 लाखांचा मुद्देमाल जप्त

दुर्दैवाने, अन्य दोन विद्यार्थी बेपत्ता झाले होते. त्यापैकी ओंकार श्रीकृष्ण पाठक (वय १६, रा. पद्मावती गल्ली, लातूर) याचा मृतदेह काही वेळाने आढळून आला, परंतु प्रणव रमाकांत पोतदार (वय १७, रा. खडा, ता. आष्टी, जि. बीड) हा अद्याप बेपत्ता आहे. आळंदी नगर परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण दिवस त्याचा शोध घेतला, परंतु त्यात यश आले नाही. रात्री उशिरा मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह नातेवाइकांनी मूळ गावी नेले.

ही दुःखद घटना घडल्याने वेदश्री तपोवन गुरुकुलमध्ये शोककळा पसरली आहे. संस्थेतील गुरुजी महेश नंदे आणि दिलीप लांडगे यांनी सांगितले की, “हे विद्यार्थी अतिशय अभ्यासू आणि मनमिळाऊ होते. अशा दुर्दैवी घटनेने संपूर्ण संस्थेवर आघात झाला आहे. या विद्यार्थ्यांनी सहा-सात वर्षांपासून वेदाभ्यास सुरू केला होता आणि ते सर्व एक परिवारप्रमाणे इथे राहत होते. त्यांच्या जाण्याने आभाळ कोसळल्यासारखे वाटते.”

हे देखील वाचा: मराठी चित्रपट: ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’; भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सुंदर बंध उलगडणारे पोस्टर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रदर्शित; चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या

आळंदी

ही दुर्घटना घडलेले ठिकाण मोशी आणि डुडुळगाव हद्दीवरील हवालदार वस्ती तापकीरनगरजवळ आहे. या परिसरात इंद्रायणी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने बरेच ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती, परंतु पोलिसांनी नदीपात्रात जाण्यास मनाई केली होती.

संपूर्ण दिवस अग्निशमन दल, पोलिस, आणि ‘एनडीआरएफ’चे जवान बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेत होते, परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे आणि अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसामुळे आणि अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबवावे लागले. आळंदी नगर परिषद अग्निशमन दलातील प्रसाद बोराटे यांनी सांगितले की, “मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले जाईल.”

हे देखील वाचा: Sangli Crime: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई: घरफोडी करणारे तीन आरोपी जेरबंद, 38.64 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

या घटनेप्रकरणी ‘अकस्मात घटना’ म्हणून नोंद करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी हजर असलेल्या पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, “घटनेचा तपास सुरू आहे आणि त्यात जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !