मिरजेतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केला खून
आयर्विन टाइम्स / मिरज
सांगली जिल्ह्यातील मिरजेत बसस्थानक आवारात नारायण बडोदे याचा मृतदेह आढळून आला. संशयास्पदरीत्या आढळल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा खून असल्याचे स्पष्ट झाले. चाकूने भोसकून त्याचा खून झाल्याचे समोर येताच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तत्काळ संशयितास अटक केली. संभाजी चंदर नाईक ( वय ४०, जानराववाडी ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, मिरज बसस्थानकात चार दिवसांपूर्वी नारायण लक्ष्मण बडोदे (वय ५७, हुब्बरवाडी ता. रायबाग जिल्हा बेळगाव) या वृद्धाचा संशयास्पद मृतदेह सापडला. मृत वृद्धाच्या पोटात धारदार शस्त्राचे वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. मिरज बसस्थानक आवारात किरकोळ कामे करून व तेथेच राहणाऱ्या बडोदे या बेघर वृद्धाचा खून झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
बडोदे यास कोणी मारले, याचा शोध घेताना मिरज बस स्थानकावरच्या पार्सल ऑफिसजवळ सीसीटीव्हीत बडोदे यास मारहाण करताना एक जण दिसून आला. पोलिसांनी त्यास शोधल्यानंतर तो संभाजी नाईक असल्याचे निष्पन्न झाले. नाईक यांच्याविरुद्ध शहर व ग्रामीण पोलिसांत यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. नाईक हा मिरज रेल्वे स्थानक व मिरज बस स्थानकात वास्तव्य करून तेथेच किरकोळ कामे करून गुजराण करतो.
संबंधित वृद्ध मिरज बस स्थानक आवारात बसला असताना पार्सल ऑफिस जवळ बसण्याच्या जागेवरून त्याचा संभाजी नाईक यांचा सोबत वाद झाला. या वादातून नाईक याने चाकूने यांच्या पोटात वार करून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या बडोदे यांचा काही वेळात तेथेच मृत्यू झाला. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी बडोदे याचा खून करणाऱ्या संशयितास शोधून काढून त्याच्याकडून खुनासाठी वापरलेला चाकू जप्त केल्याचे गांधी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक भालेराव यांनी सांगितले.
कृष्णा नदीत उड्या टाकून तरुणांनी चोरट्यांना पकडले; आमणापूर येथील प्रकार; धनगावच्या युवकांचे धाडस
सांगली जिल्ह्यातील शेरीभाग- आमणापूर (ता. पलूस) येथे चोरीच्या उद्देशाने हत्यारांसह फिरणाऱ्या १२ जणांच्या टोळीतील काहीजणांना हटकल्यावर ते इकडे तिकडे पळू लागले. त्यातील काहींनी नदीत उडी घेतली. चोर काही केल्या पाण्यातून लवकर बाहेर पडेनात. त्यामुळे धनगावच्या काही युवकांनी नदी पात्रात उड्या टाकून त्यांना पाण्याबाहेर काढले. यावेळी त्यांची चोरांबरोबर जोरदार झटापट झाली. तिघांना धाडसाने पकडून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेरीभाग- आमणापूर येथे आज (ता. १०) सकाळी साडेदहाच्या दरम्यान १२ जण संशयित फिरताना दिसले. त्यांना शेरीभाग येथील तरुणांनी हटकले असता, त्यांनी गाडीचा घोटाळा झालाय, जुळेवाडीला निघाल्याचे सांगितले. तिथून निसटून त्यातील पुढे काहीजण भवानी टेक धनगाव हद्दीतील शिवारात शिरले. तोवर स्थानिक तरुणांना संशय आल्याने त्यांनी लोकांची जमवाजमव केली.
जमावाने त्यांच्यादिशेने धाव घेतल्यावर काहींनी शेताकडे पळ काढला; तर तिघांनी कृष्णा नदीच्या पाण्यात उड्या घेतल्या. यावेळी त्यांची बॅग नागरिकांच्या हाती लागली. त्यामध्ये हत्यारे, कटावणे, पकडी, कपडे, सत्तूर, डोळ्यांसाठी भोके असणाऱ्या माकड टोप्या, लगोरी अशा वस्तूंवरून हे चोरच असल्याचे नागरिकांना लक्षात आले.
काही तरुण तोपर्यंत मोटारसायकलवरून नदीपलीकडे अंकलखोपला पोहोचले. त्यावेळी आमणापूर व अंकलखोपच्या नागरिकांनी भिलवडी पोलिसांनाही पाचारण केले. नुकताच कृष्णा नदीला पूर येऊन गेला होता. त्यामुळे नदी काठावर गाळ, काटे यांचा ढीग साचला होता. चोर काही केल्या पाण्यातून बाहेर पडेनात. त्यामुळे धनगावच्या काही युवकांनी नदीपात्रात उड्या टाकून त्यांना पाण्याबाहेर काढले. तीन चोर पाण्यातून वर येताच पकडले. तरुणांची चोरांबरोबर जोरदार झटापट झाली. मात्र, तरुणांनी तिघांना पकडून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
तरुणाई अधिक सतर्क: २३ जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास शेरीभाग, आमणापूर येथील अंकुश पाटील यांच्या घरातील तब्बल १७ तोळे दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला होता. तसेच अनुगडेवाडीतही घरफोडी केली होती. तेव्हापासून सर्वत्र तरुणांनी गस्त घालायला सुरुवात केली होती. याकाळात गावात काहीजणांना रात्रीच्यावेळी काही संशयित दिसल्याचीही चर्चा होती. त्यामुळे तरुणाई अधिक सतर्क झाली होती.