सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ४ लाख ५९ हजार ८२७ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ३३ हजार अधिक अर्ज अपात्र ठरले आहेत. ते तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यावर पुढील शनिवारी (ता. १७) ३ हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पालकमंत्री सुरेश खाडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. योजनेतून महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये शनिवारी बँक जमा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.”
ते म्हणाले, “रक्षाबंधनदिवशी लाडक्या बहिणींना आपल्या खात्यात ३ हजार रुपये जमा होतील. १७ ऑगस्ट रोजी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेतील पैसे जमा करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम होईल.”
ते म्हणाले, “जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ५९ हजार ८२७ अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुका पातळीवरील समित्यांच्या माध्यमातून अर्जांची छाननी सुरू आहे. आतापर्यंत ४ लाख २४ हजार २११ अर्जांची छाननी पूर्ण झाली असून हे प्रमाण ९२ टक्के इतके आहे. ३३ हजार ३१३ महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत.
‘लाडकी बहीण’बाबत विरोधकांकडून गैरसमज |
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. योजनेसाठी पैसे नसल्याचा गाजवाजा केला जातो. हे सर्व साफ खोटं आहे. राजकीय विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी राबवली जाणार असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले. अंशतः कारणाने हे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. मात्र आवश्यक कागदपत्रे व त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानंतर या अर्जांनाही मंजुरी दिली जाणार आहे, असेही पालकमंत्री खाडे म्हणाले.
सांगली जिल्ह्यातील मालगाव येथील शिक्षक आत्महत्येप्रकरणी शिक्षिकेसह दोघांना अटक
मालगाव (ता. मिरज) येथे खासगी क्लास चालक सुधाकर सावंत यांच्या आत्महत्येप्रकरणी शिक्षिकेसह दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. शिक्षिका नम्रता नारायण सदाफुले (वय २८) व नंदकुमार बळीराम कदम (३८ दोघे, मालगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, सुधाकर सावंत यांनी २६ जून रोजी आत्महत्या केली. सुधाकर सावंत गेल्या वर्षांपासून मालगाव येथे कोचिंग क्लासेस घेत होते. त्यांच्यासोबत क्लासमध्ये सहकारी शिक्षिका म्हणून संशयित नम्रता सदाफुले काम करीत होत्या. नम्रता सदाफुले यांची आर्थिक भागीदारी होती. संशयित दोघे सावंत यांना मानसिक त्रास देत असल्याने आत्महत्या केल्याची तक्रार सावंत यांच्या पत्नीने दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयाने तीन दिवस कोठडी दिली.
विटा शहरात ६ वर्षांच्या बालकाचा तापाने मृत्यू; ‘चंडीपुरा’ या विषाणूची लागण झाली आहे का, याचीही तपासणी होणार
सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील एका सहा वर्षांच्या बालकाचा तापाने मृत्यू झाला. मेंदूज्वराने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी रक्ताचे नमुने घेऊन पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
विट्यातील एका बालकाला दोन ते तीन दिवसांपूर्वी ताप आल्याने कुटुंबीयांनी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार या बालकाचा मृत्यू मेंदूज्वराने झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची तपासणी करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये ‘चंडीपुरा’ या विषाणूची लागण झाली आहे का, याचीही तपासणी होणार आहे.
रविवारी किंवा सोमवारी प्रशासनाला अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ म्हणाले, त्या बालकाचा मृत्यू मेंदूज्वराने झाल्याचा अंदाज आहे. मात्र खबरदारी आणि मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याला चंडीपुराची लागण झाली असावी, असे वाटत नाही.सांगली जिल्ह्यात सध्या या आजाराचा एकही रुग्ण नाही.