श्रावणी उपवास आणि रताळे : आरोग्यासाठी खजिना
श्रावण महिना सुरू झाल्याने सध्या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. रताळ, वारी, खजुरांचा समावेश आहे. सध्या रताळ्याची स्थानिकसह कर्नाटकातून आवक सुरू आहे. किरकोळ प्रतिकिलोचा विक्री ६० ते १०० रुपये आहे. रताळे कंदमूळ आहे. चवीला अतिशय रुचकर असते. रताळ्याचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. रताळ्यात आरोग्याचा खजिना आहे.
गोड चव, मलाईदार गर असे रताळे तपकिरी, पांढरे, केशरी रंगांचं असतं. रताळ्याचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रताळे आयुर्वेदिक वनस्पती आणि कंदमूळ आहे. रताळे सेवन करणे तुम्हाला निरोगी ठेवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. आजारांचा धोका कमी तसेच वजन कमी होण्यास मदत होते. बाजारातील गुणवत्तापूर्ण रताळे निरखून घ्यावे.
रताळ्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
■ पंधरा प्रकारची पोषकद्रव्ये असतात
■ साखर नैसर्गिक असते. मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त
■ व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, पोषक फायबर मिळतात ॥ पचन व्यवस्थित होते. मुबलक फायबरमुळे पचनक्रिया सुधारते
■ रताळे खाल्ल्याने सर्दी, खोकला, फ्लूसह अन्य विषाणूजन्य आजारांचा धोका कमी
■ हृदयासंबंधित आजार, रक्तदाब नियंत्रण, हृदयविकार कमी होतो.
■ रताळ्याच्या सतत सेवनाने हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते.
■ रताळे उकळलेले पाणी त्वचेसाठी चांगले, त्याने जळजळ, खाज नाहीशी होते. त्वचा उजळते.
■ मासिक पाळीचा त्रास दूर करते.
■ महत्त्वाचे म्हणजे : मूतखड्याचा त्रास झाला आहे, त्याने ते खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
श्रावणी उपवास आणि वरी : मधुमेहासह वजन घटवणारी वरी आहे खूप फायदेशीर
उपवासात वरीचा भात व शेंगदाण्याची आमटी हे प्रमुख पदार्थ ठरलेले असतात. वरी अर्थात वरई का खाल्ली जाते ? त्याचे फायदे काय? हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. यासाठी तुम्हाला याची माहिती इथे दिली जाणार आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने वरीचे अनेक फायदे आहेत. त्यात प्रामुख्याने मधुमेहासह वजन घटवण्यासाठी ही वरी अधिक उपयुक्त ठरते.
महाराष्ट्रात भगर / वरी / वरई अशी नावे आहेत. या वरईची लागवड प्रामुख्याने घाट व उपपर्वतीय विभागात होते. वरीला काही भागात वरई / भगर असेही म्हटले जाते. हे पीक प्रामुख्याने उपवासासाठी प्रमुख अन्न म्हणून खातात. याचबरोबर दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे वरई हे प्रमुख अन्न आहे.
वरीचे आहारातील महत्त्व जाणून घ्या
वरी पिकाला असणारे धार्मिक महत्त्व व त्याचबरोबर त्यात असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास सत्वयुक्त धान्य म्हणणे योग्य ठरते. वरी धान्यात स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, खनिज व लोह या मूलद्रव्यांचे प्रमाण गहू व भात पिकापेक्षा चांगले आहे. उपवासाला वरीचा भात / भाकरी खाल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचे पित्त होत नाही. त्यामुळे वरी आरोग्यास लाभदायक आहे. वरीपासून भात, भाकरी, बिस्किट, लाडू, शेवया, चकली, शेव इत्यादी पदार्थ केले जातात.
मधुमेहासह वजन घटवणाऱ्या वरीचे आणखी आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
■ प्रथिने अधिक असल्याने शरीरात शक्ती येते.
■ कॅलरी कमी असल्याने वजन आटोक्यात राहते.
■ हलका आहार असल्याने पचनाच्या तक्रारी कमी होतात.
■ बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
■ कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्याने सहज पचते.
■ रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
■ हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास उपयोगी
श्रावणी उपवास आणि खजूर : जाणून घेऊयात खजुराचे फायदे…
उपवासात खजुराचे सेवन केले जाते. खजूर फळ आरोग्यदायी आहे. खनिजं, जीवनसत्वं अशा अनेक पोषकद्रव्यांनी समृद्ध असा खजूर आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी समजला जातो. खजुरात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीसाठी खजूर उपयुक्त असतो. म्हणूनच प्रत्येकाने नियमितपणे खजूर खायला हवा. तर जाणून घेऊ यात खजुराचे फायदे..
सुमधुर चवीचा खजूर थंड, पौष्टीक आणि बलवर्धक असतो. तो कॅल्शियम, पोटॅशिअम, कबरेदके, प्रथिनं, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशा पोषक घटकांनी समृद्ध असतो.
खजुरामुळे रक्त तयार होण्याची प्रक्रिया अधिक गतीमान होते. तसंच हृदय आणि मेंदूला बळ मिळतं. आतड्यांशी संबंधित व्याधींवर खजूर अत्यंत गुणकारी समजला जातो. आयुर्वेदानुसार खजूर वात, पित्त आणि कफनाशक असतो. खजुरामुळे पचनशक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारते. अशक्तपणावर खजूर फारच गुणकारी आहे.
मुलांना दुधासोबत खजूर देणं फायद्याचं ठरतं.
लहान मुलांना अशक्तपणा आला असेल तर खजूर आणि मध यांचं चाटण द्यावं. लगेच गुण येतो. रात्री बिछाना ओला करण्याची सवय असलेल्या मुलांना दुधासोबत खजूर देणं फायद्याचं ठरतं. खजुरामुळे आतड्यांना बळ मिळतं. तसंच शरीरही बळकट होतं. खजुरामुळे आतड्यातले अपायकारक विषाणू नष्ट होतात तर उपयुक्त जीवाणूंची वाढ होऊन आतड्यांची कार्यक्षमता वाढते. खजुरामुळे दातांचं आरोग्य सुधारतं. यातल्या कॅल्शियमुळे दात मजबूत होतात. तसंच फ्लोरिन नावाच्या खनिजामुळे दातांच्या इतर समस्याही दूर होतात.
कमी रक्तदाबाची समस्या असणार्यांसाठी खजूर हे नैसर्गिक औषध आहे. कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी रोज तीन ते चार खजूर गरम पाण्याने स्वच्छ धुवून खावेत. कमी रक्तदाबाची तक्रार दूर होईल.