सांगलीतील चोरीतील तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद
आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली शहरालगत असलेल्या हरिपूरमधील दोन बंगले मध्यरात्री चोरट्यांनी फोडून तब्बल चाळीस तोळे सोन्यासह दोन लाख रोकड पळविली. सुमारे तीस लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. यासोबत परिसरातील दोन मंदिरांतही चोरीचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, हरिपूर परिसरातील विस्तारित भागात महिनाभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी प्रशांत प्रदीपकुमर अडसूळ (सुमंगल पार्क, हरिपूर) यांनी फिर्याद दिली. अडसूळ यांच्या बंगल्यातील भाडेकरूंना चोरट्यांनी डांबून ठेवले होते.
लोखंडी कपाटातील ४० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू घेऊन पोबारा
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत अडसूळ यांचा सुमंगल पार्क येथे ‘पॅराडाईज’ नावाचा बंगला आहे. ते खासगी नोकरी करतात. त्यांचे वडील निवृत्त अधिकारी आहेत. वडील प्रदीपकुमार काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे. काल ते व आई दोघेही बंगल्यास कुलूप लावून रात्री रुग्णालयात गेले होते. पहाटे दोन ते तीन चोरट्यांनी अडसुळे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून लोखंडी कपाटातील ४० तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच रोख २ लाख रुपये घेऊन पोबारा केला.
सांगलीत गेल्या महिन्यात अनेक चोरीच्या घटना
त्यानंतर चोरट्यांनी याच परिसरातील आणखी एक बंगला फोडला. तेथून सोन्याची अंगठी पळविली; पण त्याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. दोन बंगले फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा गोंदवलेकर महाराज मठ आणि गजानन महाराज मंदिराकडे वळविला. येथेही चोरीचा प्रयत्न केला. तेथून चोरटे पसार झाले. सकाळी नऊ वाजता अडसूळ घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिसांना कळवले. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, ग्रामीणचे निरीक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. गेल्या महिन्यात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. सराईत चोरट्यांकडून ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांसह एलसीबीची पथके तत्काळ रवाना करण्यात आली आहेत.
सांगलीत तेजा श्वानाने दाखवला दीड किलोमीटरचा मार्ग
हरिपूरच्या मुख्य गावापासून विस्तारित भागात मोठे बंगले बांधले आहेत. नवा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे चोरटे शेजारील जिल्ह्यात जात असल्याचे दिसते. महिनाभरात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. या भागात तातडीने गस्ती पथके तैनात करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहेत. पोलिस दलातील अत्यंत हुशार असणारा तेजा श्वानास घटनास्थळी पाचारण केले होते. श्वानपथकाने अडसुळे यांच्या बंगल्यापासून दीड किलोमीटरवर असणाऱ्या गोंदवलेकर महाराज मठापर्यंत माग काढला. त्याच परिसरात काही वेळ श्वान घुटमळले. त्यावेळी तेथेही चोरी झाल्याचे समोर आले.
नोकरीतून पै पै जमा करून केलेलं सोनं चोरट्यांनी पळवलं
अडसूळ यांचे वडील पंधरा दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीय रुग्णालयात ठाण मांडून आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात घरफोडी झाल्याने अडसूळ यांच्या आईला हुंदका आवरला नाही. नोकरीतून पै पै जमा करून केलेलं सोनं आणि उपचारासाठी काढलेले पैसे चोरट्यांनी रात्रीत पळवले. त्यामुळे त्या आणखी रडू लागल्या. पती रुग्णालयात आणि घराची ही अवस्था अशा स्थितीत त्या माऊलीने करायचं काय? त्यांची ही अवस्था पोलिस दलाला कळणार का ? दरम्यान, काळजी करू नका, चोरटे लवकरच ताब्यात घेऊ, असा धीर पोलिसांनी दिला खरा; मात्र पोलिसांनी सारी यंत्रणा कामी लावून या माऊलीला न्याय दिला पाहिजे.
हे देखील वाचा: Jat area news : जत तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने मारली दडी; तालुक्यातील 9 तलाव कोरडे
बंगल्यात सोडले पाणी
हरिपूरचा विस्तारित भाग मोठा आहे. या परिसरात कोठेही सीसीटीव्ही नाहीत. लाखोंचे बंगले परिसरात आहेत; पण २०-२५ हजारांचे सीसीटीव्ही मात्र बसविलेले नाहीत. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतल्याचे दिसून येते. एका सीसीटीव्हीत तीन चोरटे तोंडाला बांधल्याचे दिसून येते. त्यात त्यांचे डोळे दिसून येतात. चोरट्याने अडसूळ यांच्या बंगल्यात चोरी केल्यानंतर पोलिस व श्वानपथकाला माग काढता येऊ नये, यासाठी पाण्याचे नळ चालू केले. तसेच घरातील डब्यात ठेवलेले तांदूळही विस्कटले. बेडही अस्ताव्यस्त केला. अत्यंत हुशारीने चोरट्यांनी ही चोरी केल्याचे समोर आले.