जत

जत तालुक्यातील उटगी मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाज्याच जेवणात वापरण्यात येणार

आयर्विन टाइम्स /जत
केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेतच ताज्या भाज्या त्वरित उपलब्ध व्हाव्या, भाज्या लागवडीविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांनी जेवणानंतर हात धुतल्यावर शाळेच्या आवारात जमा होणाऱ्या पाण्याचा योग्य विनियोग व्हावा यासाठी जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी उटगी शाळेने परसबाग उपक्रम राबवला आहे .

जत

शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांनी कोथिंबीर, वांगी, गाजर, टोमॅटो, मुळे, मेथी, पालेभाज्या, वांगी अशा भाज्यांची लागवड करत ‘परसबाग’ तयार केली असून भाज्या लागवडीचे प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थी अनुभवत आहेत. हंगामानुसार शाळेच्या आवारात भाजीपाला लागवड करण्यात येणार असून शक्यतो विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाज्याच जेवणात वापरण्यात येणार आहे. रसायनविरहित भाज्या लागवडीचे संस्कार विद्यार्थ्यांवर होत असल्याने या शाळेचा परसबागेचा उपक्रम आदर्श उदाहरण ठरणार आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लियाकत नंदूर मुख्याध्यापक मल्लू बिराजदार, लखन होनमोरे, बसवंतराय कोळी, भानुदास वाघमोडे, दसरथ पुजारी, लक्ष्मण गायकवाड, विध्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते.

जतला पूर्णवेळ गटविकास अधिकारी देण्याचीआढावा बैठकीत मागणी

आयर्विन टाइम्स / जत
जत येथे झालेल्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी महसूल, पोलिस ठाणे, पंचायत समिती आदी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लोकप्रतिनिधींनी बैठकीत जतकरांच्या तक्रारींबरोबरच अधिकाऱ्यांना असणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांना वेळेत काम करण्याच्या सूचना दिल्या.जतला पूर्णवेळ गटविकास अधिकारी देण्याचीआढावा बैठकीत मागणी करण्यात आली.

हे देखील वाचा: Sangli News : सांगलीत जुनी पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; जिल्ह्यातील 45 कर्मचारी संघटनांचा पाठिंबा

या बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील, माजी सभापती आकाराम मासाळ, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे, प्रभाकर जाधव, आप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण, संजय तेली, म्हाळाप्पा पुजारी, युवराज निकम, विक्रम ताड, किरणमामा शिंदे, महादेव हिंगमिरे, लक्ष्मण जखगौंड यांच्यासह प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे तहसीलदार जीवन बनसोडे, जतचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली, उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे उपस्थित होते.

सरदार पाटील, संजय तेली, आप्पासाहेब नामद, महादेव हिंगमिरे, विक्रम ताड, किरण शिंदे यांनी प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. अॅड. नानासाहेब गडदे यांनी महसूल विभागाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवत शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे सांगितले. जत नगरपरिषदेमार्फत शहरात स्वच्छता व अन्य योजना राबविल्या जात नसल्याचे युवराज निकम यांनी निदर्शनास आणून दिले. लक्ष्मण जखगौंड यांनी गुगवाड येथे तीनपानी जुगार आदी धंदे जोरात सुरू आहेत, ते बंद करा, अशी मागणी केली. जतला पूर्णवेळ बीडीओ द्या, २९ गावांची नळपाणी पुरवठा योजना रद्द करा आदी ठराव यावेळी घेण्यात आले.

जत

उटगी मराठी शाळेच्या आवारात विद्यार्थी आणि पालक यांच्याहस्ते वृक्षारोपण

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उटगीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण साप्ताहनिमित्त शासनमान्य विविध उपक्रम राबविण्यात आले. इको क्लबची स्थापना करून वृक्षारोपण दिन साजरा करण्यात आला. याला विध्यार्थी पालक शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आठवडाभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी म्हणी, वाक्प्रचार, शब्दकोडे तक्ते बनविले. तसेच नकाशे व इतर विषयाचे चार्ट बनविले. मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस साजरा झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गणितीय प्रतिकृती, रांगोळी स्पर्धा व तक्ते सादर केले. गणितीय कोडी तसेच विविध बौद्धिक कौशल्य यावर आधारित प्रतिकृती सादर केल्या.

हे देखील वाचा: Jat area news : जत तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने मारली दडी; तालुक्यातील 9 तलाव कोरडे

बुद्धिबळ, संगीत खुर्ची, लिंबू चमचा काही मैदानी खेळ घेऊन विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. नृत्य, नाटिका, एकांकिका विविध महामानवाची वेशभूषा साकारून महामानवाचे विचार प्रगट करण्यात आले. उटगी येथील डोडला दूध कंपनीचे दूध संकलन केंद्रास विद्यार्त्यांनी भेट देऊन दूध संकलनाची माहिती घेतली. शालेय पोषण आहारा अंतर्गत तिथी भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक मल्लू बिराजदार, पदवीधर शिक्षक लखन होनमोरे, बसवंतराय कोळी, भानुदास वाघमोडे, दसरथ पुजारी, मदगोंडा होर्ती, लक्ष्मण गायकवाड यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

जतचे तहसीलदार, संखच्या अप्पर तहसीलदारांची बदली

जतचे तहसीलदार जीवन बनसोडे व संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांची बदली झाली आहे. बनसोडे यांची इंदापूर येथे तर सुधाकर मागाडे यांची पुणे येथे बदली झाली आहे. बनसोडे यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही तर संख अप्पर तहसिलदारपदाचा कारभार पुणे शहर तहसील कार्यालयातील रोहिणी शंकरदास यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जतचे तत्कालीन तहसिलदार सचिन पाटील यांची भोर येथून वाळवा – इस्लामपूर येथे बदली करण्यात आली आहे.

जत

जातीचे दाखले द्या, अन्यथा अर्धनग्न मोर्चा: आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष बसवराज चव्हाण

आयर्विन टाइम्स 
जागतिक आदिवासी दिनापूर्वी जातीचे दाखले न मिळाल्यास प्रांत कार्यालयावर आदिवासी समाजाचा अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण यांनी प्रशासनाला दिला आहे. येथील तलाठी कार्यालयात आदिवासी समाज व प्रशासन यांची बैठक झाली. बैठकीस प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सुरज बिजली, संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे, मुख्याधिकारी कुंभार तसेच इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा: जत तालुक्यातील उमदी येथील मध्यवर्ती बँकेचा लिपिक साबू करजगी उद्धट वर्तणुकप्रकरणी निलंबित

बसवराज चव्हाण म्हणाले की, आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले देण्यासंदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदार यांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडून आदिवासी पारधी समाजाला जातीचे दाखले तातडीने द्यावे, असा आदेश दिले आहेत.
गेले दीड ते दोन वर्ष या समाजाला दाखले दिले जात नाहीत. त्यामुळे शासनाच्या घरकुलसह अन्य योजनेचा लाभ मिळत नाही. मुलांचे शिक्षण व नोकरीमध्येही अडचणी येत आहेत.

येत्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापूर्वी जातीचे दाखले न दिसल्यास १५ ऑगस्टला प्रांतकार्यालयावर आदिवासी अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा दिला. १५ ऑगस्टपूर्वी दाखले देवू – प्रांताधिकारी आदिवासी पारधी समाजाने नियमाप्रमाणे कागदपत्राची पूर्तता केल्यास येत्या १५ ऑगस्ट पर्यत त्यांना दाखले दिले जातील. त्यासाठी समाजाने तात्काळ प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे यांनी केले आहे.

जत

तुकारामबाबांनी उबाठा शिवसेनेकडून विधानसभा लढवावी; शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंना भेटणार

आयर्विन टाइम्स / जत
मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून जत विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी लवकरच तुकाराम बाबांना शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यानंतर पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून तुकाराम बाबा यांच्या उमेदवारीची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे उबाठाचे नेते अमित उर्फ बंटी दुधाळ, सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे देखील वाचा: जत तालुक्यातील गुड्डापूर येथे 9 कोटी खर्चून कर्नाटक सरकारने उभारले कर्नाटक भवन; माजी मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांच्या हस्ते झाले उद्घाटन; अन्नछत्राचीही उभारणी

यावेळी सागर पाटील, रमेश कदम, अशोक शिंदे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षाने काय केले हे सर्वांना माहित आहे. त्यांच्या चुकीच्या वागण्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे सांगत अमित दुधाळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जरी आमचा पराभव झाला असला तरी जत तालुक्यात आजी-माजी आमदार एका बाजुला असतानाही अपेक्षित यश त्यांना येथील मतदारांनी मिळू दिले नाही. त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्य त्यांना मिळाले ही वस्तुस्थिती आहे. व जतचा भूमिपुत्र हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे नेतृत्व आगामी विधानसभा निवडणुकीत उतरावे, अशी आमची इच्छा आहे. जतची जागा उबाठाकडे घ्यावी, या मागणीसाठी लवकरच जतचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे.

सागर पाटील म्हणाले, तुकाराम बाबा हे अध्यात्माबरोबरच सामाजिक कार्यात त्यांचे योगदान मोठे आहे. कोरोना, महापूर, दुष्काळ, म्हैसाळच्या पाण्यासाठीचा त्यांचा सुरू असलेला लढा यामुळे तुकाराम बाबा हेच योग्य उमेदवार आहेत. आमच्या पक्षातून त्यांनी उभा रहावे यासाठी लवकरच आम्ही त्यांची भेट घेवून त्यांना विनंती करणार आहोत तसेच ही जागा महाविकास आघाडीतून उबाठाकडे घ्यावी यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यासाठी शिष्टमंडळ भेटणार असल्याचे सांगितले.

काँग्रेसची वाटचाल चुकीच्या दिशेने: महाविकास आघाडीतून लोकसभेला उमेदवार दिलेला असताना  काँग्रेसने व मित्र पक्षाने काय केले सर्वज्ञात आहे. आजी-माजी आमदार एकत्र आले पण त्यांना मोठे मताधिक्य जतमध्ये घेता आले नाही हे त्यांचे अपयश आहे. जनतेने त्यांना नाकारले आहे. महाविकास आघाडीतून या जागेवर काँग्रेस हक्क सांगत असली तरी त्यांची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू असल्याचा टोला अमित दुधाळ यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !