जतसह सांगली जिल्ह्यात मध्यम प्रकल्पाची संख्या पाच तर लघू प्रकल्पांची संख्या ७८
आयर्विन टाइम्स / जत
सांगली जिल्ह्यात जुलैमध्ये जत, कवठेमहांकाळ हे दोन तालुका वगळता सर्वदूर जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत अतिवृष्टीही झाली. यामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. सध्या या ८३ प्रकल्पांत ३६५८ दशलक्ष घनफूट म्हणजे ५० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. मात्र, जत तालुक्यात पावसाने दडी मारली असल्याने तालुक्यातील ९ तलाव कोरडे आहेत.
जिल्ह्यात मध्यम प्रकल्पाची संख्या पाच तर लघू प्रकल्पांची संख्या ७८ असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणी साठवण क्षमता ९४४० दशलक्ष घनफूट आहे. जूनमध्ये ११७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात २९२० दशलक्ष घनफूट म्हणजे ३८ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यात २२ टक्क्यांनी वाढ झाली असून तो ३८ टक्के इतका पाणीसाठा होता.
हे देखील वाचा: जत तालुक्यातील उमदी येथील मध्यवर्ती बँकेचा लिपिक साबू करजगी उद्धट वर्तणुकप्रकरणी निलंबित
मिरज, पलूस, शिराळा आणि वाळवा तालुक्यासह दुष्काळी पट्ट्यातील तासगाव, आटपाडी, खानापूर या जुलैमध्ये तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. जुलैमध्ये २८३.६ मिलिमीटर म्हणजे २०९.३ टक्के पाऊस झाला. या पावसामुळे आठ तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. तर जतमधील २७ पैकी ९ प्रकल्प कोरडे तर, खानापूर तालुक्यात एक, आटपाडी तालुक्यातील एक असे एकूण अकरा प्रकल्प कोरडे आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये १०३९ दशलक्ष घनफुटाने म्हणजे १२ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे.
तम्मनगौडा रविपाटील यांच्या जनकल्याण संवादयात्रेचे बिळूरमध्ये स्वागत
आयर्विन टाइम्स / जत
तम्मनगौडा रविपाटील यांच्या जनकल्याण संवादयात्रेचे बिळूरमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री व विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील म्हणाले की, देशात आजपर्यंत ज्यांनी-ज्यांनी पदयात्रा काढली आहे, त्यांनी त्यांनी क्रांती केली आहे. तम्मनगौडा रविपाटील यांची जनकल्याण संवादयात्रा म्हणजे जत तालुक्यातील क्रांतीचे बीज आहे. अशा युवा नेत्याला विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी जनतेवर आहे.
भाजपचे जत विधानसभा निवडणूकप्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांच्या जनकल्याण संवाद यात्रेनिमित्त येथे संवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ककमरी मठाधिपती गुरुलिंगजंगम स्वामी, राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महामंडळाचे संचालक प्रसन्न आजरेकर प्रमुख पाहुणे होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामण्णा जीवन्नावर, बी. एस. घेज्जी, शिवसेना नेते निवृत्ती शिंदे, सरपंच परिषदेचे जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार, डॉ. राजेश जिवान्नावर, नागनगौडा पाटील, महादेव कलुती, टीमुभाई एडके, हणमंत गडदे, कामण्णा बंडगर, सागर बिज्जरगी, रामनिंग निवर्गी, रामचंद्र पाटील, पिरू कोळी उपस्थित होते.
हे देखील वाचा: Shravan mass / श्रावण मास : येत्या 5 ऑगस्टपासून सुरू होतोय श्रावण मास; जाणून घ्या श्रावण मासात कशी करतात पूजा?
…तर लोकभावनेप्रमाणे वाटचाल राहील: विलासराव जगताप
आयर्विन टाइम्स / जत
“राज्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीने सर्व्हे केले जात आहेत. त्यामुळे सध्या घाई करायला नको. पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. मात्र, पक्ष आपल्याला डावलत असेल तर जी लोकभावना असेल, त्याप्रमाणे आपली वाटचाल राहील,” असे प्रतिपादन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.
माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले, “काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करण्यासाठी एकत्र लढण्याची आवश्यकता आहे. आपल्यापासून बाजूला गेलेले व सध्या विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांशी बोलण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करून पक्षांकडून होणाऱ्या सर्व्हेमध्ये ज्याचे नाव आघाडीवर येईल, त्याच्या पाठीशी राहू.’ यावेळी अण्णासाहेब सावंत, प्रमोद सावंत, संग्राम जगताप, लक्ष्मण बोराडे, आर. बी. पाटील, लक्ष्मण सिद्धरेड्डी, पुंडलिक दुधाळ, अण्णा भिसे, राजू डफळे, संतोष मोटे, विठ्ठल निकम, राजू चौगुले, बापू पाटील, सुनील छत्रे, रमेश बिराजदार, प्रकाश इंगवले उपस्थित होते.
प्रकाश जमदाडे फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
आयर्विन टाइम्स / जत
इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. मात्र, मराठी शाळांमधून संस्कारक्षम विद्यार्थी घडत आहेत. शिक्षणातून मुलांनी मोठं व्हावं, मोठ्या पदावर जावं. आई-वडिलांसह शाळेतील शिक्षक गुरू आहेत. जग बदलत आहे. त्यासोबत जिल्हा परिषद शाळा बदलत आहेत. चांगला विद्यार्थी घडविण्याचे काम येथे होत आहे,” असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केले.
प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनतर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ जत शहरातील जिल्हा परिषद शाळा क्र. १ येथून करण्यात आला. केंद्रप्रमुख संभाजी कोडग यांनी स्वागत केले. यावेळी सरदार पाटील, मोहन कुलकर्णी, रवींद्र सावंत, युवराज निकम, अण्णा भिसे, पिंटू माने, चंद्रकांत गुड्डोडणी अविनाश वाघमारे, मिलिंद पाटील, प्रा. हेमंत चौगुले, सद्दाम अत्तार, दीपक चव्हाण, मकरंद कुलकर्णी, प्रकाश इंगवले, प्रमोद कुलकर्णी, प्रकाश इंगवले, प्रमोद जमदाडे, योगेश व्हनमाने यांच्यासह शाळेतील शिक्षक हणमंत मुंजे, सुजाता कुलकर्णी, मीनाक्षी शिंदे, संगीता कांबळे, रेवती कुंभार, सुनीता कदम, विशाखा सावंत, स्मिता कुलकर्णी, जोती भोसले, श्रीदेवी कांबळे उपस्थित होत्या.
जत तालुक्यात ७३, ४५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या
आयर्विन टाइम्स / जत
सांगली जिल्ह्यात यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी वेळेत सुरू केली. हंगामात २ लाख ३३ हजार ८४३ हेक्टरवर पेरा झाला असून पेरणी आटोपण्याच्या मार्गावर आहे. यंदा उसाची १४ हजार ४७७ हेक्टरवर लागवड झाली आहे. मात्र, गत महिन्यापासून अतिवृष्टी, सतत पाऊस याचा फटका आडसाली ऊस लागवडीला बसला आहे. दरम्यान, जत तालुक्यात ७३, ४५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर इतके आहे. यंदा जूनपासून पावसाचा सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्याचे नियोजन केले. जूनमध्ये ११७ टक्के पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. त्यानंतर जुलैमधील पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. परंतु जुलैच्या मध्यापासून पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यानंतर शेतकरी पुन्हा पेरणी सुरू केल्या. यंदाच्या हंगामात २ लाख ३३ हजार ८४३ हेक्टरवर पेरा झाला आहे. खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली असून एकूण पेरणी ९४ टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.
जत मतदारसंघाची जागा रासपलाच सोडा : अजित पाटील
आयर्विन टाइम्स / जत
जत विधानसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली तरच राज्यामध्ये महायुती सोबत रासप राहील असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील यांनी व्यक्त केला. रासप महायुतीच्या माध्यमातून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या सोबत आहे. लोकसभेला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची जागा त्यांच्या चिन्हावर सोडण्यात आली होती. राज्यात झालेले सामाजिक ध्रुवीकरण पाहिल्यास महादेव जानकर यांची महायुतीला नितांत गरज भासणार असून हे लक्षात घेता अजित पाटील यांनी जत विधानसभेच्या जागेवर दावा केल्याचे दिसून येत आहे.
पाटील म्हणाले, जत विधानसभा पक्षाने लढवावा यासाठी स्थानिक कार्यकर्ते फार आग्रही आहेत. तसेच रासपचे सांगली जिल्हाध्यक्ष किसन टेंगले, जत तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे, आप्पासाहेब थोरात, अखिल नगारजी आणि पदाधिकाऱ्यांनी गावागावांमध्ये बैठका घेऊन बूथ बांधणी पूर्ण करून संघटनात्मक ताकद वाढवून विधानसभेची जोरदार तयारी केली असल्याचा अहवाल पक्षाकडे सादर केला आहे. जत विधानसभेसाठी अनेक मातब्बर इच्छुक आहेत. ते पक्षाच्या संपर्कात आहेत.
हे देखील वाचा: Kamya Karthikeyan: एव्हरेस्ट शिखर सर करणारी काम्या कार्तिकेयन ही जगातील सर्वात तरुण भारतीय
या तिन्ही मोठ्या पक्षाला रासप त्यांच्या सोबत हवा असल्यास जतची जागा रासपला सोडण्यात यावे अन्यथा पक्ष महायुती सोबत न राहता कोणत्याही परिस्थितीत जत विधानसभा मतदारसंघ लढवावा लागेल अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जत विधानसभा मतदारसंघ लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केल्याचे अजित पाटील यांनी सांगितले.
रोहित सावंत यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील माडग्याळ येथील शेती व व्यवसाय निमित्ताने राहटेवाडी (ता. मंगळवेढा) येथे स्थायिक झालेले माडग्याळचे माजी सरपंच कै. एकनाथ सुदाम सावंत यांचे नातू व रामचंद्र एकनाथ सावंत यांचे चिरंजीव रोहित सावंत यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर लोकसेवा आयोग निवड झाली. या निवडीबद्दल माडग्याळ व राहटेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने रोहितचे अभिनंदन करण्यात आले.
हे देखील वाचा: स्वतःला घडवण्यासाठी काय करायला हवं?
रोहित सावंत याचे प्राथमिक शिक्षण राहाटेवाडी येथे व माध्यमिक शिक्षण श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर माचणूर (ता. मंगळवेढा) येथे व उच्च माध्यमिक शिक्षण वालचंद कॉलेज सोलापूर येथे झाले. त्याने बीएस्सी पदवी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून घेतली आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत कॉलेजमध्ये, असल्यापासूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास रोहितने केला. एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून मोठ्या पदाची नोकरी करायची या उद्देशानेच अभ्यासामध्ये रोहितने सातत्य ठेवले. अभ्यास करताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात रोहितने मोठे यश संपादन केलेले आहे. वडील शेती व ड्रायव्हरचा व्यवसाय करतात. रोहितच्या या यशामुळे त्याच्यावरती सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.