सांगलीत ट्रकच्या नंबर प्लेटला काळे फासल्याचे आले आढळून
आयर्विन टाइम्स / सांगली
ट्रक चोरणारा आणि त्याला चोरीचा बनाव रचण्यासाठी मदत करणारा अशा दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. बिरदेव बाळू गडदे (वय २६, गौडवाडी, गडदेवस्ती, सांगोला), गणेश अनिल भोसले (३२, रमामातानगर, काळे प्लॉट, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ‘एलसीबी’ला दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक शहरात गस्तीवर होते. चोरीचा ट्रक पार्किंग अड्डयावर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकला. त्यावेळी पथकाने केलेल्या पाहणीत एका ट्रकच्या नंबर प्लेटला काळे फासलेले असून या ट्रकजवळ दोन व्यक्ती संशयितरीत्या थांबलेले दिसले. संशय आल्याने पथकाने दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली.
हे देखील वाचा: Jat News : जत तालुक्यातील शेगाव येथे घर फोडून 1 लाख 40 हजारांचा ऐवज पळविला; जत परिसरातील / Jat area आणखीही बातम्या वाचा
त्यावेळी बिरदेव गडदे याने सांगितले की, त्यास ट्रक घेण्यास अर्थसहाय्य मिळत नसल्यामुळे त्याने त्याचे चुलते यशवंत गडदे यांच्या नावे कर्ज घेतले. ट्रक खरेदी घेऊन तो ट्रक स्वतः वापरीत होता. कर्जाचे हप्ते थकीत झाल्याने तो त्याचा साथीदार गणेश भोसले या दोघांनी संगनमत करून हा ट्रक मोहन शेंबडे (रा. सांगोला) यांना विकला. त्यानंतर चोरीचा बनाव केला. खोटी फिर्याद देण्यास भाग पाडल्याची कबुली त्याने दिली.
ही कारवाई निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पवार, सिकंदर वर्धन, संकेत मगदूम, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, अमोल लोहार, बाबासाहेब माने, अमर नरळे, सोमनाथ गुंडे, अनंत कुडाळकर, श्रीधर बागडी, सुनील जाधव, रोहन गरस्ते, अभिजित ठाणेकर, अजय बेंदरे, गणेश शिंदे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली.
सांगलीत कोयत्याने हल्ला करून लुटणारे तिघे गजाआड: ‘विश्रामबाग’ची कारवाई ; इंदिरानगरमधील घटना
सांगली शहरातील इंदिरानगर येथे चार दिवसांपूर्वी कोयत्याने हल्ला करून मोबाईल, सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी करणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून कोयता, मोबाईल, सोन्याची बाली जप्त केली. श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय २४, इंदिरानगर), विशाल मुरारी निशाद (२३, पाचवी गल्ली, विठ्ठलनगर ), राकेश शिवलिंग हदीमणी (२४, इंदिरानगर) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की इंदिरानगर येथे १५ जुलै रोजी मध्यरात्री फिर्यादी अरबाज झाकीर जमादार याच्यावर तिघांनी कोयत्याने हल्ला करून त्याच्याकडील ऐवज चोरल्याची घटना घडली होती. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, संशयित शहरातील एका हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हे देखील वाचा: Shocking: गर्भपातावेळी विवाहित प्रेयसीचा मृत्यू : तिचा मृतदेह फेकला इंद्रायणीत; जिवंत 2 लेकरांनाही दिली जलसमाधी
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेला ऐवज पोलिसांनी जप्त केला. निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मारूती साळुंखे, निवास कांबळे, नरळे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, महमंद मुलाणी, अतुल खंडागळे, विजय पाटणकर, उमेश कोळेकर यांचा कारवाईत सहभाग होता.
विट्यात गहाळ झालेले बावीस मोबाईल पोलिसांनी त्यांच्या मालकांना केले परत
सांगली जिल्ह्यातील विटा पोलिस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांच्या गहाळ झालेल्या विविध कंपन्यांच्या साडेतीन लाख रुपये किमतीच्या बावीस मोबाईलचा शोध घेऊन ते मालकांना परत दिल्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.
विटा शहर सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. आजूबाजूच्या गावांतून दररोज नोकरी, शिक्षण, तसेच बाजारात ग्राहक येत असतात. प्रवास, बाजारपेठ, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. मोबाईल गहाळ झाल्याची फिर्याद विश्वास प्रल्हाद जाधव (आळसंद, ता. खानापूर) यांनी १६ एप्रिल २०२४ रोजी विटा पोलिसांत दिली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊन राज्यातील विविध जिल्ह्यांतून बावीस मोबाईलचा शोध घेऊन ताब्यात घेतले. ते मोबाईल मूळ मालकांना परत दिल्याचे मेमाणे यांनी सांगितले.
दरम्यान, मोबाईल मिळाल्याने मोबाईलधारकांतून पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त होत आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती रीतू खोखर, उपाधीक्षक विपुल पाटील, निरीक्षक शरद मेमाणे, संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उत्तम माळी, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, अमोल कराळे, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, हेमंत तांबेवाघ, संभाजी सोनवणे, विवेक साळुंखे यांनी ही कारवाई केली.