पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून गर्भपात करणारा डॉक्टर आणि मदत करणारी महिला यांचा शोध सुरु
आयर्विन टाइम्स / पुणे
पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गर्भपातावेळी विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाल्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. या वेळी तिची दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून रडू लागल्याने त्यांचा आवाज गप्प करण्यासाठी आरोपी प्रियकर व त्याच्या मित्राने त्यांनाही नदीत फेकले. याबाबत मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
समरिन निसार नेवरेकर (वय २५, रा. वराळे, ता. मावळ), ईशांत निसार नेवरेकर (वय ५), इजान निसार नेवरेकर (वय २) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर ( वय ३७, रा. वराळे, ता. मावळ), रविकांत भानुदास गायकवाड ( वय ४१, रा. डॉन बास्को कॉलनी, सावेडी, ता. नगर) यांना अटक केली आहे, तर गर्भपात करणारी महिला व संबंधित डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर याच्यापासून समरिन गर्भवती राहिली होती. गर्भपात करण्यासाठी समरीनचे मूळ गाव अक्कलकोट आहे. गर्भपात करण्यासाठी ती ५ जुलै रोजी दोन्ही मुलांसमवेत घराबाहेर पडली. आई-वडिलांना तिने अक्कलकोट येथे बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी जात असून, तेथे पोहोचल्यानंतर फोन करते, असे सांगितले. त्यानंतर ती रविकांत गायकवाडसोबत कळंबोली येथे गेली. दिवसभरात तिने कुटुंबीयांशी संपर्क साधला नाही. घरच्यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने प्रतिसाद दिला नाही.
गर्भपात करण्यासाठी मदत करणारी एजंट महिला, कळंबोली (नवी मुंबई) येथील अमर हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टर व त्यांना मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात वराळे येथील विवाहित महिला समरीन नेवरेकर बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली होती. तिचा पती कामानिमित्त कतारमध्ये असतो. पोलिसांनी परिसरात चौकशी केली. त्यावेळी समरीनच्या घराजवळ राहणाऱ्या गजेंद्र दगडखैर याच्याशी तिचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. गजेंद्रला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार, समरीन गरोदर राहिल्यामुळे तिचा गर्भपात करण्यासाठी गजेंद्रने तिला रविकांत गायकवाड मित्रासोबत कळंबोली येथे पाठविले.
हे देखील वाचा: Sangli Crime : सांगलीतील कुपवाडच्या तरुणाकडून 10 तलवारी जप्त; सांगली – आष्टा मार्गावर गस्त सुरू असताना लागला पोलिसांच्या हाती
तेथे अमर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर गायकवाडने तिचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह घेऊन तो परत गजेंद्रकडे आला. ९ जुलै रोजी पहाटे दोघांनी समरीनचा मृतदेह इंदोरी गावातील इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिला. हा प्रकार पाहून समरीनची दोन्ही लहान मुले आरडाओरडा करू लागली. दोन्ही मुले रडू लागल्यामुळे त्यांनाही जिवंतपणे नदीत टाकून देण्यात आले.
या मृतदेहासह तिच्या दोन्ही मुलांना समरीन हिने प्रतिसाद न दिल्याने तिच्या आईने ६ जुलै रोजी तळेगाव-दाभाडे पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तिचे वडील कतार येथून आले. त्यांनी खूनप्रकरणी फिर्याद दिली. समरीन हिचा पती चालक असून, तोही कतार येथे कामानिमित्त गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांमार्फत मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. संशयितांनी मृतदेह नदीपात्रात टाकून दोन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत पावसामुळे नदीपात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मृतदेह शोधण्यात अडचणी येत आहेत, असे सहायक पोलिस आयुक्त (देहूरोड विभाग ) देवीदास घेवारे यांनी सांगितलॆ.
हे देखील वाचा: Jat News : जत तालुक्यातील सिंगनहळ्ळीत चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; 1 जखमी : दोघे अचकनहळ्ळी गावचे रहिवासी
आरोपी दगडखैर व गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे; तर गर्भपात करण्यास साहाय्य करणारी बुधवंत नामक महिला तसेच कळंबोलीतील अमर हॉस्पिटलमधील डॉक्टर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत महिला हरविल्याची तक्रारदेखील तळेगाव एमआयडीसी पोलिसांत दाखल होती. सहायक पोलिस आयुक्त देविदास घेवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर, सहायक निरीक्षक श्याम मस्के, उपनिरीक्षक सीताराम पुणेकर, अनिल भोसले यांनी गुन्हा उघडकीस आणला. पुणे जिल्ह्यातील या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा: World Brain Day / विश्व मेंदू दिवस 22 जुलै : लोकांना मेंदूशी संबंधित सर्व आजारांची माहिती व्हायला हवी