डोंगरावर आहे पुरातन दंडनाथाचे देऊळ
दंडोबा डोंगर सांगली, मिरज शहरापासून सांगलीच्या पूर्वेस ३५ किलोमीटरवर आहे. ११०० हेक्टर क्षेत्रात हा डोंगर पसरला आहे. या परिसरात दोन मोठे तलाव आहेत. अन्य बरेच बंधारे तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्यात सर्व बंधारे व तलाव भरून वाहत असतात. डोंगराच्या टोकावर मंदिर वसले आहे. दंडोबा डोंगराच्या चारी बाजूला खेडी वसली आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत. येथील हिरवाई पाहून छोट्या मोठ्या सहली आयोजित केल्या जात आहेत, मात्र अजूनही हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झालेला नाही.
दंडोबा डोंगर एक सुंदर पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते, यासाठी राजकारणी मंडळी आणि प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. हा हिरवाईने नटलेला दंडोबा डोंगर नेहमीच आकर्षित करीत असतो. वर्षभर हा डोंगर हिरवागार दिसतो. पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास सांगली, कोल्हापूर, अथणी परिसरातील लोकांना पर्यटनासाठी चांगले जवळचे ठिकाण मिळू शकते.
हा डोंगर पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत पसरला आहे
विकिपीडियावरील माहितीनुसार हा डोंगर सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावाजवळचा पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेला एक डोंगर आहे. डोंगरावर पुरातन दंडनाथाचे देऊळ आहे. डोंगरात सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्तादेखील असून पुरातन काळातील चित्रे आता कालौघात पुसट झाली आहेत.
या दंडोबा डोंगरावर एक पाच मजली मनोरा आहे. मनोऱ्याचा सर्वांत वरचा भाग आहे तेथे चार ते पाच माणसे उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायऱ्या आहेत, पण तिथून पुढे वरती जायला मानवनिर्मित पायऱ्या नाहीत; सध्या तेथे एक दगड आहे; त्याचा उपयोग करून वरती जाता येते. चौथ्या टप्प्यावर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
मनोऱ्यावर उभे राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचे शिखर दिसते
एका वेळी एकच माणूस जाईल एवढीच जागा आहे. वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो. स्थानिक लोकांच्या मते जर वातावरण चांगले असेल तर मनोऱ्यावर उभे राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचे शिखर दिसते.
या परिसरात पाऊस पडण्याचे प्रमाण कमी असले, तरी पावसाळी व हिवाळी पिके घेतली जातात. डोंगरउताराला घळीत बंधारे बांधून पाणी अडवले जाते. आजूबाजूला असलेली खेडी व तलावात असलेल्या पाण्यामुळे दंडोबा डोंगरात बऱ्याच प्राण्यांनी अधिवास निर्माण केला आहे व ते इथे मुक्कामी असतात. प्राण्याला आवश्यक असणारा सुरक्षित अधिवास या डोंगरात उपलब्ध असल्याने या भागात खोकड, कोल्हे, लांडगे, तरस हे श्वानकुळातील प्राणी आढळतात.
हे देखील वाचा: Maharashtra News / महाराष्ट्र : एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढविणार; बैठकीत स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक
याशिवाय, मुंगूस, रानमांजर, खवले मांजर, साळिंदर सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतात. हरिण कुळातील सांबर बऱ्याच वेळेस पर्यटकांना दिसून आले आहे. गवा व बिबट्या हे प्राणी स्थानिक शेतकऱ्यांनी पाहिल्याचा नोंदी आहेत. गवती माळराने असल्याने या भागात विंचू, पाली, साप, माळटिटवी, धाविक पक्षी, सिल्व्हर बिल, ट्राय कलर मुनिया, फॅन थ्रोटेड लिझार्ड उन्हाळ्यात दिसून येतात. कोल्हे, खोकड, तरस यांसारखे प्राणी डोंगरात अधिवास बनवून प्रजनन करतात.
डोंगरावर व उतारावर बरेच पाणवठे आहेत
उन्हाळ्यात खाद्याच्या व पाण्याच्या शोधार्थ भटकत डोंगरानजीक असलेल्या गावाच्या हद्दीत फिरती करतात. वन विभागातर्फे डोंगरावर व उतारावर बरेच पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सौर ऊर्जेचा वापर करून वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. एरंडोली येथे तरस दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. हा तरस दंडोबाच्या डोंगरातील घरी दोनदाच गेला असावा, असा अंदाज आहे.
हे देखील वाचा: Sangli Crime सांगली जिल्ह्यातील संख अप्पर तहसीलदारांना जीवे मारण्याची ई-मेलवरून धमकी; 4 महिन्यांपूर्वी काढलेल्या एका आदेशावरून धमकी
तरस हा मांसाहारी प्राणी आहे आणि तो कुजलेले मांस खातो. आपल्याकडील तरस शक्यतो जिवंत प्राण्यांवर, माणसांवर हल्ला करत नाहीत. आपण टीव्हीवर जो तरस पाहतो, तो आफ्रिकेतील जंगलातील आहे. त्यामुळे तरसाबद्दल भीती वाटणे साहजिक असले तरी आपल्याकडील त्यामुळे तो सहज ओळखू येतो. तरसांनी माणसावर हल्ला केल्याचे प्रसंग अगदी अपवादाने घडले आहेत. तरसाच्या अंगावर पट्टे असतात. त्याच्या पायाच्या ठशावरून त्याचे अस्तित्व ओळखणे शक्य होते.
वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा दंडोबा डोंगर
मिरज पूर्व भागात तरस दिसला. या भागात कोल्हे आणि लांडग्यांची संख्या देखील वाढलेली आहे. तसा हा जंगल नसलेला परिसर. मग हे जंगली प्राणी इथे आले कुठून? तर याचे उत्तर आहे, दंडोबाच्या जंगलात या प्राण्यांचा अधिवास आढळलेला आहे. तेथून अन्नाच्या शोधात हे प्राणी अन्यत्र भटकताना दिसत आहेत. त्यांचा मानवी वस्तीला फारसा धोका नसल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, मात्र चिंता करू नये.
– अजितकुमार पाटील, मानव व वन्यजीव अभ्यासक