सांगली जिल्ह्यातील उमदी पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल
आयर्विन टाइम्स / सांगली
जत तालुक्यातील संख येथील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांना जीवे मारण्याची धमकी ई-मेलवरून देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतचा मेल जिल्हाधिकारी कार्यालयातही पाठवण्यात आला आहे. श्री. मागाडे यांनी तातडीने उमदी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात मेल पाठवणाऱ्या अमित नाटीकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती उमदी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांनी दिली. दरम्यान, अप्पर तहसीलदार यांना धमकी दिल्यानंतर पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. त्यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उमदी येथील अमित नाटीकर यांचा त्यांच्या शेतातील रस्त्यावरून वाद होता. त्यामुळे तो वाद संखचे अप्पर तहसीलदार मागाडे यांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी जागेची पाहणी करून सर्वांचे जाबजबाब घेऊन एकाच सर्व्हे नंबरमध्ये सर्वांची शेती असल्याने नाटीकर यांच्या शेतातून सर्वांना रस्ता देण्याचा आदेश ४ महिन्यांपूर्वी काढला होता.
हे देखील वाचा: Maharashtra News / महाराष्ट्र : एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढविणार; बैठकीत स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक
दरम्यान, याचाच राग मनात धरून ४८ तासांच्या आत संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा खून करण्याची धमकी मेलवरून देण्यात आली. याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार अप्पर तहसीलदार मागाडे यांनी उमदी ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
विट्यातील विशाल पाटील टोळी ४ जिल्ह्यातून तडीपार; अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद
गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी येथील विशाल पाटील टोळीला सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.
विशाल प्रशांत पाटील (वय २४, शाहूनगर, विटा), अमरजित अनिल क्षीरसागर (२२, पाटील वस्ती), शुभम महेश कोळी (२५, कदमवाडा), किसन राजेंद्र काळोखे (३०), विजय राजेंद्र काळोखे (२४), सागर देवेंद्र गायकवाड (२७), अमृत राजेंद्र काळोखे (२४, सर्व विवेकानंदनगर, विटा) अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
या टोळीविरुद्ध २०१९ ते २०२३ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खून, खुनाचा प्रयत्न करणे, बिगरपरवाना शस्त्र बाळगून दहशत माजवणे, गैरकायद्याची मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे, अपहरण करून इच्छापूर्वक दुखापत करणे, बांधकामास लागणारे साहित्याची, तसेच मोटारसायकल व इतर चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत.
वरील गुन्हेगार कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलिस ठाणे यांनी पोलिस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता. पोलिस अधीक्षकांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी विटा विभाग, विटा यांच्याकडे चौकशीला पाठविला.
त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई, तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलिस अधीक्षकांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्त्वांचा व्यापक विचार करून या टोळीला हद्दपार केल्याचे श्री. मेमाणे यांनी सांगितले.
दरम्यान, टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करणार असल्याचे श्री. मेमाणे यांनी सांगितले.
पिस्तूलसह काडतुसे जप्त, तिघांना अटक: पोलिस तपासात आतापर्यंत ‘दहा संशयित’; कुपवाड पोलिसांची कारवाई
पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारण्याच्या हेतूने वाघमोडेनगरला एकावर पिस्तूल रोखल्याप्रकरणी आणखी तिघांना तपासांतर्गत कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. मलिक शेख (वय २७, सध्या दत्तनगर, बामणोली, ता. मिरज), दादासो शेजुळ (२६) व सौरभ मासाळ (२४, दोघेही वाघमोडेनगर, कुपवाड) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत.
सोमवारपासूनच्या (ता. १५) तपासात पोलिसांनी आणखी एक पिस्तूल व दोन काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला. त्याव्यतिरिक्त एक पिस्तूल, दोन दुचाकी, चार एडके असा मुद्देमाल तत्पूर्वीच्या तपासात जप्त केला होता. या प्रकरणातील एक अल्पवयीन वगळता गुन्ह्यामधील संशयितांची संख्या पिस्तूल प्रकरण एकूण नऊ झालेली आहे. त्या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता सर्वांनाच न्यायालयाने उद्यापर्यंत (ता. १९) त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सोमवारी (ता. ८) रात्री वाघमोडेनगर, मायाक्कादेवी मंदिराच्या लगत एका वाढदिवसाच्या समारंभात सागर राजाराम माने (३५, राजारामबापू हौसिंग सोसायटी औद्योगिक वसाहत, मिरज ता. मिरज) यांच्यावर एकाने पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता.
पिस्तूलमधून गोळी सुटली नसल्याने ते बचावले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची फिर्याद कुपवाड पोलिसांत दिली. त्यानुसार मिरज पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा राबवून कुपवाडचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पुढील तीन दिवसात या घटनेतील संशयितांचा छडा लावला.
शुक्रवारी (ता. १२) पाच संशयितांना आष्टा (ता. वाळवा) येथून अटक करण्यात आली.
संदेश रामचंद्र घागरे (२१), किरण दादासो कोडीगिरे (२०), अनिकेत दत्ता कदम (२०, सर्वजण वाघमोडेनगर), प्रतीक शिवाजी कोळेकर (१९, शरदनगर, कुपवाड ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे होती. यांच्या व्यतिरिक्त गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आढळून आला.
संशयितांनी न्यायालयामध्ये हजर केले असता. सोमवारपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. या कालावधीत अत्यंत कौशल्याने तपासाची यंत्रणा राबवून सहायक पोलिस निरीक्षक भांडवलकर यांनी किरण लोखंडे व सोन्याबापू एडगे या संशयितांसह एक पिस्तूल, दोन दुचाकी व चार एडके जप्त केले.
त्यापुढे आजपर्यंत केलेल्या तपासामध्ये कुपवाड पोलिसांनी मलिक शेख, दादासाहेब शेजुळ व सौरभ मासाळ अशा तिघा संशयितांना अटक केली. या प्रकरणातील सर्व संशयितांना उद्यापर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील एकूण संशयितांची संख्या १० झाली आहे. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.