चोरीच्या घटनेमुळे डफळापूर (जत) परिसरात मोठी खळबळ
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील डफळापुर येथे रविवारी मध्यरात्री मुख्य बाजार पेठेत असलेले ज्वेलर्सचे दुकान फोडून तब्बल दहा किलोची चांदी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. त्याची किंमत सुमारे पाच लाख होते. या चोरीच्या घटनेमुळे डफळापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून या चोरीचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. रेकी करून ही चोरी करण्यात आल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. जत पोलीस तपास करत आहेत.
घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली हकीकत अशी: जत तालुक्यातील डफळापूर येथे हनमंत भगवान भोसले यांचे नेहा ज्वेलर्स नावाचे सोने -चांदीचे दुकान आहे. मुख्य बाजारपेठेत विठ्ठल मंदिरात शेजारी दुकान असून भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानात सोन्या-चांदीचे दागिनेही मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या लग्नसराई आणि विविध उत्सव-कार्यक्रमांची रेलचेल असल्याने त्यांनी चांदीचा माल मोठ्या प्रमाणात भरला होता.
दहा किलोची चांदी अज्ञात चोरटयांनी केली लंपास
रविवारी रात्री एक ते सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरटयांनी भोसले यांच्या दुकानाचे मुख्य शेटर, आतील लोखंडी ग्रील आणि सेंट्रल लॉक कटरने तोडून आत प्रवेश केला. व आतील शोकेशमध्ये असणारे तब्बल दहा किलोची चांदी अज्ञात चोरटयांनी लंपास केली आहे. यामध्ये दीड लाख किंमतीचे चांदीचे पैंजण तसेच तोडे, बाळे, मासुळी, जोडवी, बिचवा, कडली या दागिन्यांसह जुनी मोड असा एकूण 10 किलो चांदीचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला आहे.
सराईत गुन्हेगारांनी रेकी करून चोरी केल्याचा संशय
भोसले यांचे नेहा ज्वेलर्स हे मुख्य बाजारपेठेत दुकान आहे. आजूबाजूला अनेकांच्या दुकानावर सीसीटीव्ही आहेतच. तसेच त्यांच्या कडेही सीसीटीव्ही आहे. बाजूला त्यांचे मेडिकलचे दुकान देखील आहे. शिवाय भोसले कुटुंबीय तिथेच पाठीमागे राहायला असून, हे दुकान हनुमंत भोसले व त्यांचे वडील भगवान भोसले हे दोघेच चालवतात.
इतर दुसरा कुठला कर्मचारीही त्यांच्या दुकानात कामास नाही. असे असतानाही अज्ञात चोरांनी ही चोरी अत्यंत सफाईदारपणे केल्याचे दिसून येत आहे. फुटेज दिसणार नाही, दुकान फोडताना आवाज येणार नाही. कुणाला दिसू नये म्हणून काही डिजिटल बोर्ड आडवे लावून अतिशय शांत व सराईत पद्धतीने ही चोरी केली आहे. यामुळे काही दिवसापासून या दुकानावर चोरांची नजर असावी असेही बोलले जात आहे.
जत पोलिसांनी तातडीने दिली घटनास्थळी भेट
दरम्यान, रविवारी रात्री साडे तीनच्या सुमारास दुकानात काही तरी आवाज येत असल्याचे भोसले कुटुंबियांच्या लक्षात येताच ते बाहेर आले. तोवर एका चोरांनी तिथून पलाईन केल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय चोर पळून जात असताना काही चांदीच्या दागिन्यांची पाकिटे रस्त्यावर पडली होती. ही घटना घडल्यानंतर तातडीने जत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन, पुढील तपास सुरु केला आहे.
शिवाय तपासासाठी सोमवारी सकाळीच श्वान पथक, ठसेतज्ञ व तांत्रिक तपास यंत्रणा येथे दाखल झाली होती. बाजार पेठेतील फुटेज तपासण्यात येत असून, अनोळखी एक जण काही फुटेज मध्ये दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनील गिलडा, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी भेट दिली आहे. दोन पथक तयार करून या चोरीचा छडा तातडीने लावण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत झाली आहे. या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.
हे देखील वाचा: Unemployment ; 15 जुलै: जागतिक युवा कौशल्य दिन : बेरोजगारी ; भारतातील सर्वात मोठी समस्या / problem ; योजना भरपूर,पण रोजगार कुठाय?
तपास गतीने सुरू : निरीक्षक सूरज बिजली
जतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली म्हणाले, या चोरीचा तपास आम्ही गतीने सुरु केला आहे. तपासकामी तातडीने दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. एलसीबीकडून देखील एक समांतर तपास सुरु केला आहे. ही चोरी रेकी करून आणि सराईत गुन्हेगारानी केल्याचा संशय आहे. शिवाय येथे फुटेज मध्ये एक आरोपी दिसत असला तरी अन्य साथीदार असणार आहेत.
दुकानाचे सेंट्रल लॉक सहज तुटत नाही, त्यावरून ही चोरी प्रोफेशनल चोरट्यांकडून झाल्याचाही संशय आम्हास आहे. याचा लवकरच तपास करू, असेही जतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली म्हणाले.