पूजा खेडकर यांच्यावर वैयक्तिक आलिशान वाहनावर अंबर दिवा लावणे, कक्ष बळकावणे इत्यादी आरोप
आयर्विन टाइम्स / वाशीम
आपल्या परीविक्षा कालावधीत पुणे येथे चर्चेत राहिलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात आज (ता. ११) रोजी रुजू झाल्या आहेत. त्यांच्यावरील आरोपाबाबत मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर आपल्या परीविक्षा कालावधीत पुणे येथे रुजू झाल्या होत्या. त्या कालावधीत वैयक्तिक आलिशान वाहनावर अंबर दिवा लावणे, अप्पर जिल्हाधिकारी यांचा कक्ष अनधिकृतपणे ताब्यात घेणे इत्यादी आरोपांनी त्या चर्चेत आल्या होत्या.
दरम्यान त्यांनी विकलांग गटातून उत्तीर्ण केलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेनंतर वैद्यकीय तपासनीस गैरहजर राहण्याची बाबही समोर आली होती. परीविक्षा कालावधीत बदली होत नाही. मात्र त्यांच्याबाबतच्या वादांमुळे त्यांची पुणे येथून उचलबांगडी करून वाशीम येथे पदस्थापना देण्यात आली. गुरुवारी त्यांनी वाशीम येथे रुजू होऊन कामकाजाला सुरवात केली आहे. राज्य सरकारने त्यांचा परीविक्षा कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला असून त्या ३१ मार्च २०२५ पर्यंत जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात प्रशिक्षण घेणार आहेत.
स्वतंत्र कक्ष मिळण्याची शाश्वती नाही
पूजा खेडकर वाशीम येथे रुजू झाल्या असल्या तरी येथे त्यांना स्वतंत्र कक्ष मिळण्याची शाश्वती नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कक्षाचे नूतनीकरण सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवनात हलविले आहे. तसेच पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी तत्काळ सुरू झाल्याने त्यांना आपल्या प्रशिक्षण मुख्यालयात बसावे लागणार आहे.
खेडकरांच्या अर्जाची पडताळणी होणार
दरम्यान, सध्या वादात असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जाची आणि इतर माहितीची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने समितीची स्थापना केली आहे. पद प्राप्त करण्यासाठी दिव्यांग ओबीसी कोटा आरक्षणाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पूजा खेडकर या २०२३ च्या तुकडीच्या अधिकारी आहेत. खासगी गाडीवर अंबर दिवा लावल्याबद्दल आणि केबिन मिळण्यावरून वाद घातल्याबद्दल पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. वादानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची वाशिमला बदली केली आहे. मात्र, खेडकर यांनी ‘यूपीएससी’ परीक्षेसाठी केलेल्या उमेदवारी अर्जाबाबत आणि त्यांनी घेतलेल्या सवलतींबाबत आक्षेप घेतले गेल्याने याबाबत पडताळणी करण्यासाठी सरकारने एक सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील ही समिती दोन आठवड्यांमध्ये आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.
पुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण कालावधीतील गैरवर्तणुकीबाबतचा तपशीलवार अहवाल राज्य शासनाकडून केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तिवेतन मंत्रालय आणि लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे खेडकर यांनी निवडीच्या वेळेस सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पुन्हा तपासणी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यांच्या पुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झाल्यानंतर खेडकर यांनी केलेल्या गैरवर्तणुकीबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सविस्तर अहवाल तयार करून सामान्य प्रशासन विभागाला पाठविला. त्यामध्ये प्रशिक्षणार्थी सेवेतील त्यांच्या वर्तणुकीसह इतर बाबींचा अहवालात उल्लेख केला होता. तसेच त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि त्यांची अन्य जिल्ह्यात बदली करावी, अशी विनंतीही केली होती. त्याची दखल घेत राज्य शासनाने खेडकर यांची वाशीम येथे बदली केली. त्यानुसार खेडकर प्रशिक्षणासाठी वाशीम येथे गुरुवारी रुजू झाल्या.
नॉन-क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता या दोन प्रकारांतून त्यांची निवड
लोकसेवा आयोगातून (यूपीएससी) झाली आहे. नॉन-क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसअॅबिलिटी) या दोन प्रकारांतून त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे ‘यूपीएससी’ने सांगूनही त्या सहा वेळा वैद्यकीय तपासणीसाठी गैरहजर राहिल्या. या पार्श्वभूमीवर ‘यूपीएससी’ने खेडकरांच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) आव्हान दिले होते. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने खेडकरांविरोधात निर्णय दिल्याची माहिती समोर आली आहे.
खेडकर यांनी बहुविकलांगतेबाबत स्वतःहून तपासणी केलेले एमआरआय प्रमाणपत्र स्वीकारल्याने त्यांची सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याचेही समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचे गैरवर्तणुकीचे गैरवर्तणुकीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खेडकर यांनी नियुक्तीच्या वेळेस सादर केलेल्या कागदपत्रांवरूनही वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालासह सर्व कागदपत्रे केंद्रीय कार्मिक मंत्रालय आणि लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला अहवाल पाठविण्यात येणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
वडिलांची संपत्ती ४० कोटी; ओबीसी नॉन-क्रिमीलेयर दर्जासाठी पात्र कशा?
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकतेच वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविली. त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती ४० कोटी रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यांच्या वडिलांची संपत्ती लक्षात घेता पूजा खेडकर ओबीसी नॉन-क्रिमीलेयर दर्जासाठी कशा पात्र ठरल्या ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकर यांनी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगितले होते. तसेच अंशतः अंध असून विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
परंतु त्यांनी वैद्यकीय चाचणीत सहभागी होण्यास वारंवार नकार दिला. तरीसुद्धा त्या आयएएससाठी पात्र कशा ठरल्या ? असा प्रश्नही माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून आयएएससाठी निवड झाल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी ही केंद्रीय कार्मिक कार्यालयाकडून केली जाते.
त्यानंतर प्रशिक्षणासाठी मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला पाठविण्यात येते. त्यांच्याकडूनही उमेदवारांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी होते. खेडकर यांच्या कागदपत्रांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मिळाल्यानंतर या दोन्ही कार्यालयांकडे खेडकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी पुन्हा होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
माझ्यावर असलेल्या आरोपाबाबत मी काहीही बोलणार नाही. मी वाशीम येथे काम करण्यासाठी आली आहे. त्यामुळे माझे काम माझे प्राधान्य राहणार आहे. – पूजा खेडकर, आयएएस अधिकारी, वाशीम