शाळा

शिक्षकांनी निलंबनाचा आदेश स्वीकारला नाही

आयर्विन टाइम्स / पुणे
शाळा तपासणीसाठी आलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला मारहाण करून हाकलून देण्याचा धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार पुणे जिल्ह्यतील शिरूर तालुक्यात घडला आहे. विस्तार अधिकारी यांच्या अहवालावरून संबंधित दोघा शिक्षकांना गटविकास अधिकारी यांनी निलंबित केले असले तरी हे दोघे संबंधित शाळेचा ताबा सोडायला तयार नाहीत, त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.

शाळा तपासणी करण्यासाठी आलेल्या शिक्षण विस्तार अधिकार्याला मारहाणीचा प्रकार करणाऱ्या आणि याच कारणास्तव निलंबित झालेल्या रांजणगाव सांडस (ता. शिरूर) केंद्रातील जिल्हा परिषदेच्या दत्तनगर शाळेतील महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे या शिक्षकांनी शाळेवरील ताबा कायम ठेवला असून, निलंबनाच्या पत्राला केराची टोपली दाखवून वरिष्ठांच्या आदेशाला फाट्यावर मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा: Good news! मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा अध्यादेश जारी; शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कमध्ये 100 टक्के लाभ

शाळा तपासणीसाठी आलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ बजाबा पवार यांना काळे व पाचर्णे यांनी कोंडून मारहाण केल्याचा प्रकार २८ जून रोजी दत्तनगर शाळेत घडला होता. याबाबत पवार यांनी सादर केलेल्या अहवालाची दखल घेत व या अहवालासोबत त्यांनी सादर केलेले मोबाईलवरील रेकॉर्डिंग व चित्रफितीच्या आधारे गटविकास अधिकारी डोके यांनी गेल्या मंगळवारी (ता. २) या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली होती.

शाळा

रजेवर गेलेले हे शिक्षक पुन्हा शाळेवर दाखल झाले असून, त्यांनी शाळेचा ताबा घेतल्याचे चित्र आहे. या शिक्षकांना निलंबित केले असल्याचे पत्र घेऊन केंद्रप्रमुख डी. सी. वेताळ हे गेले असता त्यांनी निलंबनाचा आदेश स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांच्या मोबाईलवर व्हॉटसअपद्वारे निलंबनाच्या आदेशाचे पत्र सोडले असून, त्यांच्या पत्त्यावरही टपालाने प्रत पाठविली असल्याचे गटविकास अधिकारी डोके यांनी सांगितले.

याबाबत जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला असून, शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या शिक्षकांना मुख्यालयाला बोलाविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निलंबन झाल्यानंतरही काळे व पाचर्णे हे शिक्षक दत्तनगर शाळेवर हजर असून, सोमवारी (ता. ८) त्यांनी रजेवर जात असल्याचे पत्र शाळा व्यवस्थापन समितीकडे दिल्याचे समजते. त्यांनी जाताना तीन वर्गखोल्यांसह रजिस्टर कुलूपबंद केल्याने इतर शिक्षकांना हजेरी लावणे मुश्कील झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

शाळा

शाळा भरवली पंचायत समितीत: शिक्षकांच्या बदलीसाठी आंबळे ग्रामस्थ आक्रमक; अधिकाऱ्यांकडून दखल

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दर्जाहीन शिक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत आणि या शिक्षकांची बदली करून दुसरे शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी आंबळे (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ८) टोकाचे पाऊल उचलत गावातील शाळा बंद करून विद्यार्थ्यांना घेऊन थेट येथील पंचायत समितीच्या प्रांगणात शाळा भरवली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आंबळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्य असलेल्या अनिल वाखारे व सीमा वाखारे या शिक्षकांच्या शैक्षणिक कामकाजावरून ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या असून, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना दर्जाहीन शिक्षण दिले जात असल्याने व त्यामुळे आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी सोमवारी तिसरीतील विद्यार्थ्यांसह थेट पंचायत समितीचे कार्यालय गाठले. मुख्य प्रवेशद्वारातील व्हरांड्यात शाळा भरवून तेथेच शैक्षणिक परिपाठ सुरू
केला.

हे देखील वाचा: Sangli News / सांगलीच्या बातम्या: सेल्फीचा मोह जीवावर बेतला; सांगलीतील 1 तरुण कृष्णा नदीत वाहून गेला

आंबळेचे सरपंच सोमनाथ बेंद्रे, ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बेंद्रे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिवले, संदीप घुमरे, मच्छिंद्र सिन्नरकर, शेखर निंबाळकर, श्रीकांत निंबाळकर, सागर देशमुख, किसन बेंद्रे, सादिक इनामदार, सीमा बेंद्रे, नीलम सागर, यास्मीन नदाफ यांच्यासह ग्रामस्थ व पालक यावेळी उपस्थित होते.
आंबळे शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरत चालला असल्याकडे ग्रामस्थांनी गेल्या सहा महिन्यांपासून पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले, शिक्षक बदलीची मागणी केली.

मात्र कुठलीही दखल घेतली न गेल्याने हे पाऊल उचलावे लागले असल्याचे दिलीप बेंद्रे यांनी सांगितले. शिक्षक व केंद्रप्रमुखांच्या मिलिभगतमुळे ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनानंतरही शिक्षक बदली व इतर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हा परिषदेत शाळा भरविण्याचा इशारा सरपंच बेंद्रे यांनी दिला. गेल्या तीन वर्षांपासून शाळेत इन्स्पेक्शन झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, गटविकास अधिकारी महेश डोके यांनी पालक व ग्रामस्थांशी चर्चा करून आंबळे शाळेसाठी तातडीने दुसरे दोन शिक्षक दिल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंबळे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे प्रत्येकी एकेक वर्ग असून, येथे चार शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील दोन शिक्षकांविषयी ग्रामस्थ व पालकांची तक्रार असून, दोन पदवीधर शिक्षकांची गेल्या आठ वर्षांपासूनची मागणी प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !