महिला पोलिस अधिकारी सोबत पुण्यात मध्यवस्तीत बुधवार चौकात शुक्रवारी सायंकाळी घडली घटना
आयर्विन टाइम्स / पुणे
रस्त्यात थांबविल्याच्या कारणावरून वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात मध्यवस्तीत बुधवार चौकात शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम १०९ आणि १३२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संजय फकीरा साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोलिस वाहतूक नियमन करत होते. या वेळी पोलिसांनी संशयावरून एका वाहनचालकाला थांबविल्यानंतर त्याने पोलिसांसोबत वादावादी केली. त्यानंतर एकाने बाटलीतील पेट्रोल महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर टाकले. परंतु त्यावेळी नेमके लायटर न पेटल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुदैवाने बचावले. महिला पोलीस कर्मचारी म्हणाली कि, “आमच्या अंगावर पेट्रोल टाकल्यानंतर उलटे धरल्यामुळे आमचा जीव वाचला. आमचा पुनर्जन्मच झाला आहे. या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. एक तासभर तरी मला बोलता आले नाही”
पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच खुनी निघाल्याने खळबळ ; रांजणगाव सांडस खूनप्रकरण
रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील शीतल स्वप्नील रणपिसे (वय २१) या विवाहितेच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस पथका यश आले असून, पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच खुनी निघाल्याने खळबळ उडाली आहे.
शीतल हिचा मृतदेह बुधवारी (ता. ३) दुपारी राहत्या घरात आढळला होता. दोरीने गळा आवळून व इलेक्ट्रीक वायरने शॉक देऊन तीचा खून झाल्याने खळबळ उडाली होती. याबाबत शीतल हिचा पती स्वप्नील श्यामराव रणपिसे (वय २६) याने, ‘आम्ही कुणी घरात नसताना अज्ञात व्यक्तीने शीतल हिचा खून केला,’ अशी फिर्याद दिली होती. त्यामुळे शिरूर पोलिसांनी गुरुवारी अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या या नवविवाहितेच्या क्रूर पद्धतीने झालेल्या ‘ खुनाच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला समांतर तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, गुरुवारी या विवाहितेवर तीच्या माहेरी पोंढे (ता. पुरंदर) येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर शिरूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणने तपासाची चक्रे वेगात फिरवून घटनास्थळाला भेट दिली. विवाहितेचे घर, परिसराची पाहणी केल्यानंतर आसपास चौकशी केली. त्यातून संशय बळावल्याने स्वप्नील याला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली.
हे देखील वाचा: Sangli News/ सांगली बातम्या: गांजाची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी सांगली जिल्ह्यात जेरबंद; तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, विवाहितेच्या खूनप्रकरणात रणपिसे कुटुंबातील आणखी कुणाचा सहभाग आहे किंवा कसे, याचाही पोलिस कसून शोध घेत असून, शीतल हिच्या माहेरच्या मंडळींनी तीच्या पतीवर बाहेरख्यालीपणाचा व सासू सासऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने त्यादृष्टीने तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी सांगितले.
स्वप्नीलने पोलिसांना सांगितले की, लग्न झाल्यानंतर किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद होत होते. ती कायमच माझ्यावर व मीदेखील तिच्यावर शंका घ्यायचो. ती नेहमी माझी इतरांशी तुलना करायची, ते मला आवडत नव्हते. ‘बाकीचे लोक बघा कसे वागतात, तसे तुम्ही वागत नाहीत,’ असे सतत बोलत असल्याने आमचे पटेनासे झाले.
बुधवारी दुपारी शीतल घरी एकटीच असताना शेतात कामाच्या निमित्ताने गेलेला स्वप्नील घरी आला.
त्यावेळी स्वयंपाकगृहात दोघांत वाद झाल्यानंतर त्याने नायलॉनच्या दोरीने शीतल हिचा गळा आवळला. त्यात ती बेशुद्ध झाली. त्यानंतरही त्याने इलेक्ट्रीक वायर तीच्या अंगठ्याला गुंडाळून शॉक दिला. त्यात हाताचा काही भाग जळाला व त्यातच तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्वप्नील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. शिरूर न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडी सुनावली.
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कात्रीने वार; तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू
एकतर्फी प्रेमातून वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या भिडी येथे माथेफिरू तरुणाने एका युवतीवर कात्रीने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात युवती गंभीर जखमी झाली. तिच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना गुरुवारी (ता. चार ) रात्री उशिरा घडली असून या प्रकरणी गावातील संदीप मसराम नामक युवकाला अटक करण्यात आली आहे.
भिडी येथील २३ वर्षीय तरुणी ही आपल्या घरी एकटी होती. ती आपल्या अंगणात घरकाम करीत असताना भिडी येथीलच संदीप मसराम या युवकाने घरात प्रवेश केला. संदीप तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. युवतीचा त्याला नकार असल्याने त्याने संतापून युवतीच्या गळ्यावर कैचीने सपासप वार केले. तरुणीवर तीन वार केल्यावर तरुणीच्या डोक्यात घरातील कुंडी टाकत तिला गंभीर जखमी केले. यावेळी तरुणी ही रक्त बंबाळ स्थितीत पडून असल्याचे परिसरातील पुरषोत्तम रेगे यांना दिसताच त्यांनी कुंपणाचे दार ओलांडून घरात प्रवेश केला. त्यांनी प्रसंगावधान राखल्याने तरुणीचा जीव वाचला. याचवेळी माथेफिरू संदीप मसराम मसराम हा तरुणीच्या घरात लपून बसला होता. गावकऱ्यांनी त्याला ताब्यात घेत चांगलाच चोप दिला व देवळी पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी तरुणीला लागलीच भिडी येथील रुग्णालयात पुरषोत्तम रेंगे व त्यांची मुलगी पूजा हिने रुग्णालयात दुचाकीवर बसवून उपचारासाठी दाखल केले.
मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. तरुणीवर उपचार सुरु आहेत. देवळीत खुनाचे प्रकरण ताजे असताना अचानक घडलेल्या तरुणीवरील हल्ल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. वर्धेत यापूर्वी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रकरणातून अंकित हिला जिवंत जाळण्यात आल्याचा इतिहास आहे. तर सेलू तालुक्यातही एका अंकिताला ठार करण्यात आले होते. त्यात भिडी येथे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत रोष व्यक्त करण्यात येत आहे.
(विविध बातम्यांचे पोर्टल आणि वर्तमानपत्र यांच्या संकलनातून )