सांगली जिल्हा सरपंच संघटनेने शिक्षकांना सरकारी पंच म्हणून नेमण्याची प्रथा तात्काळ थांबवावी अशी मागणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. पंचनाम्यामुळे शिक्षकांच्या निष्पक्षतेवर, प्रतिमेवर व शैक्षणिक कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा अधोरेखित.
जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात पंचनाम्यासाठी शिक्षकांना ‘सरकारी पंच’ म्हणून नेमण्याची प्रथा तात्काळ बंद करावी, अशी ठाम मागणी सोन्याळ (ता. जत) ग्रामपंचायतीचे सरपंच बसवराज तेली यांनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेल्या निवेदनातून केली. हे निवेदन सांगली जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की —
शिक्षकांची भूमिका शैक्षणिक, सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांना पंचनामा करण्यासाठी सरकारी पंच म्हणून नेमल्यास अनेक समस्या निर्माण होतात. शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी, पालकांशी आणि गावातील नागरिकांशी सतत संपर्क असल्याने सामाजिक दबाव, नातेसंबंध आणि स्थानिक राजकारणामुळे निष्पक्षता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवणे अयोग्य आणि अन्यायकारक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
शिवाय, पंचनाम्यादरम्यान होणारा वेळखाऊ आणि संवेदनशील कायदेशीर व्यवहार लक्षात घेता, साक्ष नोंदवणे, प्रतिपरीक्षा आणि न्यायालयीन जबाबदाऱ्या पार पाडणे यासाठी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण नसते. त्यामुळे शिक्षकांची प्रतिमा, मानसिक ताण आणि शैक्षणिक कामकाज या तिन्ही गोष्टींवर विपरीत परिणाम होत असल्याचेही सरपंचांनी नमूद केले.
निवेदनात यावरही भर देण्यात आला की —
शासन निर्णयांनुसार शिक्षकांवरील गैरशैक्षणिक कामाचा ताण कमी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने वारंवार जारी केलेले आहेत; तरीदेखील अनेक ठिकाणी शिक्षकांना पंचनाम्यासाठी बोलावले जात आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

सरपंच बसवराज तेली यांनी सुचवले की पंचनाम्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच महसूल आणि पोलिस विभागातील संबंधित अधिकारी/कर्मचारी उपलब्ध असताना शिक्षकांना या जबाबदारीत ओढू नये.
त्यामुळे, सांगली जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन, महसूल कार्यालये आणि संबंधित विभागांना शिक्षकांना सरकारी पंच म्हणून नेमणूक न करण्याबाबत स्पष्ट आणि लेखी आदेश जारी करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन सादर करताना सोन्याळ ग्रामपंचायतीचे सरपंच बसवराज तेली, तसेच गिरगावचे सरपंच गोपाल कुंभार, कोणबगीचे सरपंच आमसिद्ध बिराजदार, लोहगावचे सरपंच अशोक चव्हाण, शेड्याळचे उपसरपंच दत्तात्रय जाधव यांसह सांगली जिल्हा सरपंच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

