तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे हॉटेल डॉल्फिनवर पोलिसांनी छापा टाकून चालू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. दोन पीडित महिलांची सुटका तर चार संशयितांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने कारवाई केली; पुढील तपास सुरू.
तासगाव (प्रतिनिधी – आयर्विन टाइम्स)
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील कोड्याचे माळ परिसरातील हॉटेल डॉल्फिनमध्ये सुरु असलेल्या संशयित वेश्या व्यवसायावर पोलिसांनी सोमवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून चार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अंमलदार सुरेश गणपती भोसले (वय ४१) यांनी याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये —
🔹 सागर पोपट भोसले (वय २३, रा. मणेराजुरी)
🔹 कैलास बाबासो सूर्यवंशी (वय २८, रा. जाधववाडी, ता. कवठेमहांकाळ)
🔹 ओंकार गणेश सकटे (वय २६, रा. डोर्ली, ता. जत)
🔹 सुनील लालासो चव्हाण (वय ३४, रा. मणेराजुरी)
या चौघांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्यांना आणि दोन पीडित महिलांना ताब्यात घेतले.
गोपनीय बातमीदाराकडून हॉटेल डॉल्फिनमध्ये छुपा वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिस हवालदार सुरेश भोसले यांना प्राप्त झाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला असता सागर भोसले व कैलास सूर्यवंशी हे दोघेजण संगनमताने पीडित मुलींच्या माध्यमातून व्यावसायिक शोषण करत असल्याचे निष्पन्न झाले. व्यवसायातून मिळणारे पैसे ते स्वतःकडे ठेवत असल्याचेही आढळले.
तसेच ओंकार सकटे व सुनील चव्हाण हे दोघेजण ग्राहक म्हणून वेश्यागमनासाठी आले असल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी चारही संशयितांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या छाप्यात सहभागी पथकात —
एपीआय दीपक पाटील, अमित परीट, अमर सूर्यवंशी, सुरेश भोसले, सतीश साठे, अजित सूर्यवंशी, तानाजी शिंदे आणि महिला पोलिस गीतांजली पाटील यांचा समावेश होता. पुढील तपास तासगाव पोलिसांकडून सुरू आहे.
