सारांश: सांगली जिल्हा कृषी कार्यालयातील निरीक्षक संतोष चौधरी यांना ३०,००० रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली. पॅरागॉन ॲग्री केअर कंपनीच्या इमारतीच्या इन्स्पेक्शन रिपोर्टसाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येत असून नागरिकांनी लाच मागणी झाल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
जिल्हा कृषी विभाग, सांगली येथे कार्यरत असलेल्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले आहे. आरोपीचे नाव संतोष रंजना राजाराम चौधरी (वय ४६, सध्या रा. फ्लॅट नं. 404, गणेश नमन अपार्टमेंट, दालचिनी हॉटेल समोर, धामणी रोड, विश्रामबाग, सांगली जि. सांगली) या ठिकाणी भाडेतत्त्वावर रा राहणेस आहे.
त्यांचे मूळ राहण्याचे ठिकाण गलांडेवाडी नं.1, तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे असून ते जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, यातील तक्रारदार यांनी तळेगाव एमआयडीसी येथे प्लॉट नंबर बी – ८४, शिवाजीनगर येथे शेती औषधाची कंपनी सुरू करणे कामी सन 2023 मध्ये एमआयडीसी कडेगाव सोबत करार केला आहे. एमआयडीसी कडेगाव यांनी दिलेल्या जागेवर तक्रारदारांनी पॅरागॉन ॲग्री केअर या नावाची शेती औषध कंपनी स्थापन करून त्याचे बांधकाम पूर्ण करून दि. 16 जुलै 2024 रोजी बिल्डींग कम्प्लिशन सर्टिफिकेट एमआयडीसी कडेगाव कार्यालयाकडून प्राप्त केले होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी सदर जागेवर पॅरागॉन अग्रिकेअर नावाची शेती औषध कंपनी स्थापन करणे कामी डीलर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (DRC) मिळणे कामी एका खाजगी एजंटामार्फत दि. 22 एप्रिल 2025 रोजी फाईल तयार करून घेतली होती. सदर सर्टिफिकेट प्राप्त करणे करिता सदर फाईल पुणे येथील ऑफिस मध्ये पाठवावी लागते. तत्पूर्वी जिल्हा कृषी विभाग सांगली यांचेकडून सदर इमारतीचे इन्स्पेक्शन करून रिपोर्ट प्राप्त करावा लागतो.
सदर इन्स्पेक्शन रिपोर्ट मिळणे कामी यातील तक्रारदार दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी जिल्हा कृषी विभाग सांगली येथे गेले असता वर नमूद आलोसे यांनी कंपनीच्या इमारतीचा इन्स्पेक्शन रिपोर्ट देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 35,000 रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने तात्काळ सांगली ACB कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार कार्यवाही करत दि. २४ एप्रिल रोजी एसीबीने सापळा रचला आणि चौधरी यांना त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदारकडून ३०,००० रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक उमेश दा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा पथकात पो.ह. ऋषिकेश बडनीकर, पो.ना. प्रितम चौगुले व पो.शि. अजित पाटील यांचा समावेश होता. ही कारवाई विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागरिकांना आवाहन :
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली येथे संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
संपर्क : उमेश दा. पाटील
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली मो.: ९५५२५३९८८९
कार्यालयीन क्रमांक : ०२३३-२३७३०९५
टोल फ्री क्रमांक : १०६४