जत नगरपरिषद निवडणूक 2025 ची घोषणा; महाविकास आघाडी एकत्र येणार की स्वतंत्र लढणार, याकडे सर्वांचे लक्ष. भाजप आणि आघाडीतील टोकाची लढत रंगण्याची शक्यता.
(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
जत :
मागील तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने घोषणा केल्याबरोबरच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष — काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि अजित पवार गट — हे एकत्र येऊन निवडणूक लढणार की स्वतंत्रपणे रणांगणात उतरणार, याकडे संपूर्ण जतकरांचे लक्ष लागले आहे.

🔸 महाविकास आघाडी व भाजप आमनेसामने
या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती (भाजप-शिवसेना) यांच्यात टोकाची लढत रंगणार आहे. गत निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्या वेळी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह सात जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादीला सहा आणि भाजपला आठ जागा मिळाल्या होत्या.
निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी हातमिळवणी करून भाजपला सत्तेबाहेर ठेवत नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवर यांनी पाच वर्षे नगराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला.
🔸 नवे गणित, नवे प्रभाग
या वेळी जत नगरपरिषदेत आणखी एक प्रभाग वाढला असून एकूण चोवीस सदस्यांची निवड केली जाणार आहे — त्यात २३ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून येतील. शहरात एकूण ११ प्रभाग आणि ३५,३३६ मतदार आहेत. यंदाच्या प्रभाग आराखड्यात अनेक अनुभवी नगरसेवकांच्या प्रभागात बदल झाल्यामुळे पारंपरिक मतदारसंघांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे जुन्या राजकीय नेत्यांना मतदारांचा अंदाज बांधणे अवघड जात आहे.
🔸 निवडणुकीचा कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी निवडणुकीची घोषणा केली असून, १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. २१ नोव्हेंबर हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असेल, तर २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
🔸 आचारसंहिता लागू, फलक हटविण्याचा धडाका
निवडणुकीची घोषणा होताच जत नगरपरिषदेने तातडीने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली. दुपारी चार वाजल्यापासूनच शहरातील विविध भागांतील शासकीय आणि राजकीय फलक हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.
🔸 महिलांच्या कार्यक्रमांना फटका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांनी महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले. विशेषतः प्रभाग क्रमांक ८ मध्ये आयोजित कार्यक्रमांवर याचा थेट परिणाम झाला आहे.
🔸 इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग
निवडणूक जाहीर होताच प्रमुख नेतेमंडळींनी बैठकांचा सपाटा लावला आहे. शहरातील सर्व प्रमुख पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. प्रभागांचे नव्याने आखलेले गणित लक्षात घेता प्रत्येक पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
या निवडणुकीत जत नगरपरिषदेत अस्मितेची, प्रतिष्ठेची आणि सत्तेच्या समीकरणांची थरारक लढाई पाहायला मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
