सारांश: राज्यातील सर्व सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असून, तपासणीची माहिती ऑनलाईन हेल्थ अॅपमध्ये अपलोड केली जाईल.
जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्षी आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वैयक्तिक आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड) तयार करून, सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती आरोग्य विभागाने तयार केलेल्या ऑनलाईन अॅपमध्ये (हेल्थ अॅप ) अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना जन्मतः व्यंग, जीवनसत्व कमतरतेने होणारे आजार, शारीरिक व मानसिक विकासात्मक विलंब आणि आजार यासंदर्भात निदान व उपचार देण्यात येतात. त्याचबरोबर राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची प्रत्येकवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
आरोग्य तपासणीनंतर पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास, हेल्थ अॅपमध्ये माहिती अद्ययावत करून आवश्यक नियोजन करावे. आवश्यक दर्जेदार वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया आदी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम (आरबीएसके ) योजनेतील तरतुदीनुसार मोफत आणि तातडीने उपलब्ध होण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी. सुरक्षित, अद्ययावत साधनसामग्री, यंत्रसामग्री वापरण्याची काळजी घ्यावी, शालेय आरोग्य तपासणीवेळी शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील, याबाबत शाळांनी नियोजन करावे आणि सर्वच विद्यार्थ्यांची तपासणी करून घेण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा आणि हेल्थ कार्ड तयार करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा प्रतिक्रिया शिक्षक संघटनांच्या आल्या आहेत.
तपासणी पथके स्थापन
राज्यात शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी तालुका स्तरावर तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता व एक परिचारिका यांचा समावेश आहे. तपासणी पथके कार्यक्षेत्रातील अंगणवाडी व शाळा यांना भेटी देतात व तेथील मुलांची तपासणी करणार आहेत.