विधवा सुनेचा सासू-सासऱ्याने लावून दिला पुनर्विवाह
आयर्विन टाइम्स / छत्रपती संभाजीनगर
विधवा सुनेचा पुनर्विवाह लावून देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील चंद्रशेखर व सुनीता साखरे यांनी समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे. विधवांच्या पुनर्विवाहावर पोकळ चर्चा न झडता साखरे कुटुंबाने प्रत्यक्षात कृती केली आहे. साखरे यांच्या या भूमिकेमुळे तरुण वयात वैधव्यामुळे अंधारमय आयुष्य समोर दिसत असताना तिच्यासमोर आशेचा किरण निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सुनेच्या विवाहावेळी साखरे परिवाराने कन्यादान करून तिला मुलीचा दर्जा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील मेडिकल व्यावसायिक चंद्रशेखर व सुनीता साखरे यांचा मुलगा प्रतिकचे २०२१ मध्ये सुप्रिया पाटील हिच्याशी
विवाह झाला होता. अभियंता असलेल्या प्रतीक व सुप्रियाचा संसार फुलत असतानाच ७ एप्रिल २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने २७ व्या वर्षीच प्रतिक इहलोक सोडून गेला. अवघ्या वर्षभराची साथ देणाऱ्या प्रतिकच्या अकाली निधनावेळी गरोदर असलेल्या सुप्रियावर अक्षरशः आकाश कोसळले.
या दुःखातून सावरत असतानाच दोन-तीन महिन्यांनी सुप्रियाने गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे सुप्रियाचे दुःख कमी झाले असले , तरी सासू-सासऱ्यांना त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू व सुनेचा संसार न झाल्याची सल सतत टोचत होती. त्यामुळे सुनीता साखरे व सावित्री पाटील यांनी सुप्रियेचा नव्याने संसार थाटण्याची हालचाली सुरू केल्या. सुरुवातीला या बाबीला नकार देणाऱ्या सुप्रियेला सासू सुनीता यांनी आईप्रमाणे समजावून सांगत तिचे मतपरिवर्तन करून संमती मिळवली.
सुनेचे पुढील आयुष्य सुखाचे जावो यासाठी साखरे पती-पत्नी सुप्रियाच्या आई – वडिलांच्या भूमिकेत उतरले. त्यानुसार त्यांनी शोधाशोध केल्यावर तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील शिवानंद शेरीकर यांच्याशी सुप्रियाचा पुनर्विवाह लावून देण्याचे निश्चित केले. शिवानंद हे चाकण येथील खासगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. यावेळी सुनीता व चंद्रशेखर साखरे यांनी सुप्रियेचे कन्यादान केले. नवदांपत्याला आशीर्वादरुपी मंगलाक्षता टाकताना उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात उपस्थित चिमुकला शिवांश सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
सन्मानाच्या भावनेतून केला सुप्रियाचा पुनर्विवाह
विधवांना सुवासिनींप्रमाणे वागणुकीची केवळ चर्चा झडते. प्रत्यक्षात त्यांना तशी संधी मिळत नाही. महिलाच दुसऱ्या महिलांचे सुख-दुख समजावून घेवू शकते. तरूण वयातील सुप्रियाचे दुख समजून घेत विधवा सन्मानाच्या भावनेतून तिचा विवाह लावून दिला आहे. यापुढे सुप्रियासाठी वैजापूर हे तिचे माहेर राहणार असल्याचे सुनीता साखरे यांनी सांगितले.
धाडसी निर्णयातून रोवले परिवर्तनाचे बीज
सुप्रियाच्या भविष्याचा विचार करून तिचा पुनर्विवाहाचा धाडसी निर्णय घेत साखरे यांनी समाजात परिवर्तनाचे बीज रोवले. साखरे कुटुंबाने घेतलेल्या या भूमिकेचे शहरातील सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
प्रतिकुटुंब दोन झाडे लावून संगोपन करण्याचा ग्रामपंचायतीने केला ठराव
पावसाळ्यात नेहमीच सर्वच शासकीय यंत्रणेच्या वतीने झाडे लावण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येते. यामध्ये किती झाडे लावली, किती जगली याचा ताळमेळ राहत नाही.
झाडे लावून त्याचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पानवडोद बुद्रुक ग्रामपंचायतीने बुधवारी (ता. २६) मासिक सभेत गावातील प्रत्येक कुटुंबाने दोन वृक्षलागवड करून संगोपन करावे. अन्यथा ग्रामपंचायतीकडून लागणारे कोणतेही कागदपत्रे मिळणार नाहीत, असा इतर ग्रापंचायतींसाठी प्रेरणादायी आणि हटके ठराव घेतला आहे.
दरवर्षीपेक्षा यावर्षी वाढलेले तापमान, पर्जन्यमानात होत असलेला चढउतार, यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने दोन झाडे लावून त्याचे संगोपन करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पाऊल उचलले आहे. दोन झाडे लावून त्याचे संगोपन करणे बंधनकारक केले आहे. असे न केल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही कागदपत्रे देण्यात येणार नसल्याचे ठरावात म्हटले आहे. यामुळे आता झाडांचे संगोपन करण्यासाठी गावकरीदेखील हिरिरीने यात सहभागी होऊन गावाला हिरवाईने नटविण्यासाठी कंबर कसणार आहे.
सरपंच भाग्यश्री फुसे म्हणाल्या की पावसाळ्यात झाडांची लागवड होते; परंतु त्याचे संगोपन होत नाही. यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करण्यासाठी ठराव घेण्यात आला. गावातील प्रत्येक कुटुंबाने दोन झाडे लावून त्याचे संगोपन करावयाचे आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत रोपे पुरविण्यात येणार आहेत. गावकऱ्यांनी या उपक्रमास सहकार्य करून गावाला हिरवाईने नटविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
हे देखील वाचा: शिक्षकांनो, व्हा अलर्ट: मोबाईल वापरावर येणार निर्बंध; गणवेशदेखील बंधनकारक
ग्रामसेवक गणेश जिवरग म्हणाले की झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता आता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठराव घेऊन प्रत्येक कुटुंबाला दोन झाडे देऊन त्याचे संगोपन करण्यासाठी नियोजन केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे शेतात किंवा दारासमोर जेथे शक्य आहे तेथे दोन झाडे लावावी. त्याचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असून, संगोपन करण्यासाठीदेखील वेळोवेळी लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे वृक्षलागवड होऊन झाडांची संख्या वाढण्यास मदत होईल.
–
, .