स्टार प्रवाहवरील या भव्य मालिकेची निर्मिती करणार महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
आयर्विन टाइम्स / मुंबई
विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे … कथा साडेतीन शक्तिपीठांची’. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे.
देवी आदि- शक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न स्टार प्रवाहवर उदे गं अंबे … कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था स्टार प्रवाहसाठी या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे. निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते उदे गं अंबे …. कथा साडेतीन शक्तिपीठांची या मालिकेचा मुहूर्त सोहळा पार पडला. याप्रसंगी महेश कोठारे म्हणाले, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. मन उधाण वाऱ्याचे ही पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर विठुमाऊली, दख्खनचा राजा जोतिबा, पिंकीचा विजय असो, सुख म्हणजे नक्की काय असतं अश्या सुपरहिट मालिका केल्या. स्टार प्रवाहसाठी आणखी एक मालिका साकारत आहे.
उदे गं अबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची या महामालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार आहे. ही मालिकाही भव्यदिव्य असेल यात शंका नाही. या भव्यदिव्य मालिकेतून कोणकोणते कलाकार भेटीला येणार? सेट कसा असेल? याविषयी प्रेक्षकांना लवकरच कळेल. स्टार प्रवाहसाठीच्या या नव्या प्रोजेक्टसाठी प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत हीच इच्छा व्यक्त करेन, असे बोलतानाच ते म्हणाले कि नक्की पहा उदे गं अंबे … कथा साडेतीन शक्तिपीठांची लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.
”दोस्ती यारी’ या गाण्याला प्रेक्षकांची मिळतेय चांगली पसंती
मैत्रीचं नातं जगावेगळं आणि सर्वात खास असतं. नुकताच मैत्रीदिन साजरा करण्यात आला. या मैत्रीदिनाच्या निमित्ताने मैत्रीदिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी “बिग हिट मीडिया” प्रस्तुत “दोस्ती यारी” हे गाणं प्रदर्शित झालं. चार मित्रांची कॉलेज लाइफमधील धमाल-मस्ती, अडचणीच्या वेळी मदतीसाठीची धडपड हे सगळं या गाण्यातून दाखवण्यात आलं आहे. अल्पावधीतच या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. हे गाणं लोकप्रिय झालं आहे.
या गाण्यात विशाल फाले, आकाश जाधव, ऋषी काणेकर, शुभम खेडकर हे कलाकार दिसत आहेत. हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी या गाण्याची निर्मिती केली असून दिग्दर्शक स्वप्नील पाटील दिग्दर्शित हे गाणे केले आहे, तर प्रसाद शिरसाठ आणि स्मिता कुलकर्णी यांनीच हे गाणे लिहिले आहे. प्रसाद शिरसाठ यांनी या गाण्याला आपल्या संगीताची साथ दिली आहे, तसेच हे गाणे रोहित राऊत आणि मनीष राजगिरे यांनी गायले आहे.
या गाण्याच्या चित्रीकरणाला नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी कॉलेज कॅम्पस उपलब्ध करून दिले आहे. यासाठी बिग हिट मीडिया व टीमने त्यांचे आभारदेखील मानले आहेत. तर गाण्याचे बोल प्रसाद शिरसाठ आणि स्मिता कुलकर्णी यांनी सांभाळले आहेत. दरम्यान, या गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र प्रथमच रुपेरी पडद्यावर : ‘रघुवीर’ २३ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात
महाराष्ट्राला महान साधू-संतांची भूमी आहे. राज्याला संतांची थोर परंपरा लाभली आहे. सर्वसामान्यांसाठी मनाचे श्लोक आणि दासबोधसारखा महान ग्रंथ लिहिणारे तसेच सुखकर्ता दुःखहर्ता ही दैनंदिन पूजेतील आरती रचणारे समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र प्रथमच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘रघुवीर’ या आगामी चित्रपटाद्वारे समर्थांचा महिमा जगासमोर येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक नवीन पोस्टर रिलीज करून घोषित करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी ‘रघुवीर’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘रघुवीर’ची निर्मिती डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगानं समर्थ क्रिएशन्स यांनी केली आहे. अभिनव विकास पाठक या चित्रपटाचे निर्माते असून वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॉ. किरण छगन बडगुजर सहनिर्माते आहेत. खुशी अॅडव्हर्टायझिंग आयडियाज प्रा. लि. या चित्रपटाचे मार्केटिंग पार्टनर असून सिनेपोलिस या चित्रपट वितरण समूहाच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नीलेश कुंजीर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘रघुवीर’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासून कायम चर्चेत राहिला आहे. समर्थांच्या भूमिकेत अभिनेते विक्रम गायकवाड दिसणार असल्याचे उघड झाल्यानंतर ‘रघुवीर’बाबतची उत्सुकता आणखी वाढली.
‘जय जय रघुवीर समर्थ’चा मंत्र जपत २३ ऑगस्ट या दिवशी ‘रघुवीर’ सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचं नुकत्याच रिव्हील केलेल्या पोस्टरवर पाहायला मिळतं. याबाबत दिग्दर्शक नीलेश कुंजीर म्हणाले की, समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणणे, हे एक फार मोठे आव्हान आहे. या सिनेमातलं मुख्य पात्र हे हिरो म्हणून न वावरता सर्वसामान्य माणसाप्रमाणे ते दिसणार आहे, त्यातूनच संत समर्थ रामदास स्वामींचं दर्शन घडणार असे नीलेश कुंजीर यांनी सांगितले. या चित्रपटाची पटकथा नीलेश कुंजीर आणि अभिराम भडकमकर यांनी लिहिली आहे. संवादलेखनही भडकमकर यांनी केले आहे.
सचिन सुहास भावे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटात विक्रमसोबत ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखार्गे, गणेश माने कलाकार आहेत. डीओपी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी केलं आहे.