सोलापूरमधील धक्कादायक घटनेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड याने ओळखीचा गैरफायदा घेत विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप; पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सोलापूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सोलापूर शहरातील जुळे परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने ओळखीचा गैरफायदा घेत एक विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी राजेंद्र देविदास राठोड (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक) याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.

घटनेचा सविस्तर तपशील
डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत हा अत्याचाराचा काळ चालू होता. पीडितेच्या घराचे बांधकाम सुरू असताना शेजाऱ्याशी झालेल्या वादाचे मध्यस्थीकरण करण्यासाठी पीडितेने राठोडला ओळखीच्या माध्यमातून बोलावले होते. स्वतःला वाद मिटविणारा व्यक्ती म्हणून सादर करत राठोडने या घटनेचा फायदा घेतला.
सुरुवातीला तो पीडितेच्या बाजूने वागून तिचा विश्वास संपादन करू लागला. एका दिवशी पोलिस आयुक्तालयात तक्रार देण्यासाठी नेण्याच्या बहाण्याने त्याने तिला आपल्या गाडीत बसवले. पाणी प्यायला देताच ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर ती सिद्धेश्वर कारखान्याजवळील मोकळ्या मैदानात होती, जिथे राठोडने जबरदस्तीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
ब्लॅकमेलिंग आणि सततचे अत्याचार
या घटनेनंतर आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. नंतर कामानिमित्त मुंबईला गेल्यानंतर, तसेच अक्कलकोट आणि गाणगापूर परिसरातही तिला नेऊन त्याने जबरदस्ती केली असल्याचे पीडितेने सांगितले.
तसेच पतीची नोकरी घालवतो, मुलांना ठार मारतो, फोटो व्हायरल करतो अशा धमक्या देऊन पीडितेवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या सर्व प्रकारामुळे पीडितेच्या संसारात वितुष्ट आले.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून सदर बझार पोलिसांनी राजेंद्र राठोडविरुद्ध बलात्कार, धमकी आणि ब्लॅकमेलिंगचे गुन्हे नोंदवले आहेत. आरोपी सध्या पसार असून त्याचा शोध पोलिसांचे पथक घेत आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे करत आहेत.
