एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका
सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. मात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून या वाहिनीवर रोज रात्री ९.००वा. आपल्या भेटीला येणार आहे.
तंत्रज्ञानाप्रमाणे मालिकेची कथा ही तितकीच दमदार
यावेळी बोलताना या वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकार म्हणाले की, वाहिनीने प्रेक्षकांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. असाच एआयचा एक वेगळा प्रयोग ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने करत असून केवळ तंत्रज्ञान वापरायचं म्हणून हा प्रयोग केलेला नाही तर क्रिएटिव्ह टीमची मेहनत यामध्ये दिसणार आहे. तंत्रज्ञानाप्रमाणे मालिकेची कथा ही तितकीच दमदार असायला हवी हे आम्ही कटाक्षाने पाळलं आहे. वेगळी कथा आणि उत्तम तंत्रज्ञान याचा मिलाफ असलेली ही मालिका प्रेक्षकांचं नक्की मनोरंजन करेल असा विश्वास या वाहिनीच्या फिक्शन हेड सोहा कुळकर्णी यांनी व्यक्त केला. पहिल्यांदा एआयवर आधारित मालिकेत काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी निश्चितच आनंददायी असल्याचे सुबोध भावे यांनी सांगितले. सुबोध भावे यांच्यासोबाबत काम करण्याचा आनंद आणि दडपण दोन्ही असल्याचे शिवानी सोनार हिने सांगितले.
सोनी मराठीवर माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा
पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा बहरणार आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलींत दिसणार आहे.मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते संदीप जाधव आहेत.
अभिनेत्री शिवानी सोनार ही मालिकेतला चर्चेतला
या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे. सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक. चित्रपट व मालिका यांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची, हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. त्याची प्रत्येक मालिका खास आहे. अभिनेत्री शिवानी सोनार ही मालिकेतला चर्चेतला चेहरा आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला हा चेहरा आता ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत खास अंदाजात दिसणार आहे ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या प्रयोगासाठी ही जोडी सज्ज झाली आहे.
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या दोन्ही व्यक्तीरेखांच्या वयामध्ये जवळपास २०-२५ वर्षांचे अंतर असणार आहे. या मालिकेतला सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांचं वेगळं दिसणं सध्या चर्चेत आहे. यात अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि तरुण माहीच्या भूमिकेतही तोच दिसणार आहे. शिवानी सोनार गौरी या भूमिकेत दिसणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहेत.एआयचा वापर करून ह्या मालिकेतल्या व्यक्तिरेखा साकारल्या जाणार आहेत.
जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते
या नव्या प्रयोगाचा एक भाग म्हणून आणि मालिकेच्या जाहिरातीकरता एक भन्नाट कल्पनाही लढवली होती. ६ मे १९९१ रोजी सुबोधने त्याची पत्नी मंजिरी हिला प्रपोज केले होते. अभिनेत्याच्या आयुष्यातल्या या गोड क्षणानिमित्त त्याने ६ मे २०२४ रोजी एक व्हिडिओ शेअर केला. त्याने त्या क्षणी नेमकं काय घडलं होतं, हे अत्यंत आगळ्यावेगळ्या शैलीत सांगितलं. या व्हिडिओमध्ये ३३ वर्षांपूर्वीचा सुबोध दिसला, मात्र त्यासाठी कोणताही जुना फोटो किंवा व्हिडिओ वापरला नव्हता, तर एआयचा वापर करून सुबोधने ही किमया साधली. तर मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध भावे याला त्याच्या मालिका-चित्रपटांची आठवण करून देणारी एक खास फ्रेम भेट म्हणून दिली.
“नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची! कारण, जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!” ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी कशी असेल? या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार? हे सर्व अनुभवण्यासाठी येत्या ८ जुलैपासून या वाहिनीवर रोज रात्री ९.०० वा. प्रसारित होणारी ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका नक्की पाहा. -गणेश तळेकर