सिद्धार्थ जाधव

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक सोशल मीडियावर गाजतोय. ३१ ऑक्टोबरला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, मुंबई):
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ विषयी प्रेक्षकांमध्ये सुरू असलेली उत्कंठा आता अधिकच वाढली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड गाजत असून, त्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा लूक पाहून चाहत्यांनी अक्षरशः कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे.

सिद्धार्थ जाधव

या पोस्टरमध्ये सिद्धार्थ जाधव एकदम भिन्न आणि प्रभावी रूपात दिसत आहे. चेहऱ्यावर रक्ताचे डाग, जखमा, आणि डोळ्यांतून झळकणारी क्रौर्याची चमक यामुळे त्याचा हा लूक प्रेक्षकांना थक्क करणारा ठरला आहे. आतापर्यंत विनोदी भूमिकांमधून ओळख निर्माण केलेल्या सिद्धार्थने या वेळेस प्रेक्षकांना पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिरेखेत भेट देण्याची तयारी केली आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणतो, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटातील माझी भूमिका आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वाधिक वेगळी आहे. या पात्रातील क्रूरता लूकमध्ये उतरवणे आव्हानात्मक होते. या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी माझा एक फोटो मागवला आणि त्यावरून हा लूक तयार केला. तो पाहिल्यानंतर मी स्वतःच थक्क झालो. मला माझ्या या नव्या रूपावर विश्वास बसला नाही. अशा भूमिकेत मी कधीच दिसलो नाही, परंतु महेश सरांवरील विश्वासामुळे मी ही भूमिका मनापासून साकारली आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही हे रूप आवडेल.”

हेदेखील वाचा: upcoming marathi movie: ‘अभंग तुकाराम’ मध्ये अजिंक्य राऊत साकारणार तरुण छत्रपती शिवाजी महाराज – दिग्पाल लांजेकर यांचा नवा ऐतिहासिक सिनेमा! 7 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

या चित्रपटात सिद्धार्थ बोडके हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत, तर विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव यांसारखे मातब्बर कलाकार यात झळकणार आहेत. याशिवाय, राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या भूमिका देखील कथेला वेगळी उंची देतील, अशी चित्रपटसृष्टीतील चर्चा आहे.

या चित्रपटाची कथा आणि पटकथा महेश मांजरेकर यांनी स्वतः लिहिली असून, संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. निर्मितीची जबाबदारी द ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह यांनी सांभाळली आहे, तर वितरणाचे काम झी स्टुडिओज करत आहे.

इतिहासातील अस्सल मराठी वीरतेचा आणि पराक्रमाचा पुन्हा एकदा पडद्यावर गौरव करणारा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे संगीत, नेपथ्य आणि संवाद या सर्वच बाबींबाबत सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली असून, या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची प्रतीक्षा आता प्रत्येक मराठी रसिक उत्सुकतेने करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *