मुंबई, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रात एकूण ५० सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर सायबर लॅब्स उभारल्या जात असून त्यामध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय “महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प” या जागतिक दर्जाच्या उपक्रमाचीही सुरुवात झाली आहे.
२०२४ मध्ये ३.३२ लाख तक्रारी, ४४० कोटींची फसवणूक रोखली
सायबर गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या सायबर हेल्पलाइन (१९३०) आणि http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण ३,३२,५३८ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये आर्थिक फसवणुकीच्या रकमेपैकी ४४०.३७ कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे. यामुळे शासनाच्या सायबर संरक्षण मोहिमेचा ठोस परिणाम दिसून आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील सायबर गुन्ह्यांची आकडेवारी :
– मुंबई शहर – २ गुन्हे
– पुणे शहर – १२५ गुन्हे
– ठाणे शहर – ८६२ गुन्हे
– राज्यभरात एकूण – हजारो प्रकरणांत तपास, ८३८ गुन्ह्यांची उकल व ९४२ आरोपींना अटक
सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. तसेच राज्याच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जात आहे. या केंद्रांद्वारे १९३० आणि १९४५ हेल्पलाईन क्रमांकावर सेवा दिली जाते.
पोलिस अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण
महाराष्ट्र सायबरच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत ५,००० पोलीस अधिकाऱ्यांना सायबर गुन्हे तपास व प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले जात आहे.
state शासनाच्या या धोरणात्मक आणि तांत्रिक पातळीवरील उपाययोजनांमुळे भविष्यात सायबर गुन्हेगारीवर निश्चितच वचक बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी सायबर गुन्ह्यांसंदर्भात सतर्क राहावे आणि कोणतीही फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० किंवा संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.