सांगली

सारांश: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक करून ४.५९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वर्षा लोंढे आणि सपना चौगुले या सराईत गुन्हेगार महिलांनी सांगली एस.टी. स्टँडवर एका महिलेची पर्स चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे त्या दोघींना अंकली पुलाजवळ अटक केली. पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे.

सांगली

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक करून ४,५९,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हे देखील वाचा: Valentine’s Special / व्हॅलेंटाईन स्पेशल: ‘ॲमेझॉन प्यार बाजार’ – केवळ 99 रुपयांपासून आकर्षक ऑफर!

घटना कशी उघडकीस आली?
दि. ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास सांगली एस.टी. स्टँडवर फिर्यादी सौ. स्वाती सूर्यकांत नाडगौडा (रा. यड्राव फाटा, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांची ४,५९,००० रुपये किमतीची सोन्याची दागिने आणि १०० रुपये किंमतीची हॅन्डपर्स चोरीला गेली होती. या प्रकरणी  शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१/२०२५ बी.एन.एस., कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची तत्पर कारवाई
स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार हणमंत लोहार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अंकली पुलाजवळ दोन महिला चोरीचा माल घेऊन थांबल्या आहेत.

महिला आरोपी जेरबंद
दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.५० वाजता, पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन संशयित महिलांना ताब्यात घेतले.

हे देखील वाचा: romantic films: परंपरागत प्रेमकथांपासून वेगळ्या 5 रोमँटिक चित्रपटांची सफर

अटक आरोपी:
१) वर्षा इकबाल लोंढे (वय ३५ वर्षे, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
२) सपना राजू चौगुले (वय २७ वर्षे, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर)

महिला पोलीस हवालदार दुर्गा कुमरे यांनी पंचांसमक्ष आरोपींची झडती घेतली असता वर्षा लोंढेच्या हॅन्डपर्समध्ये चोरीला गेलेले सोन्याचे दागिने तसेच स्वाती नाडगौडा यांची ओळखपत्रे सापडली. चौकशीत दोन्ही आरोपींनी सांगली एस.टी. स्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या महिलेची पर्स चोरी केल्याची कबुली दिली.

हे देखील वाचा:नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न: राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर; पीडित कुटुंबाची घेतली भेट

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झाले की दोन्ही महिला आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत आणि सांगली व कोल्हापूर येथे त्यांच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपींवर पुढील कारवाई सुरू
सदर आरोपींना अटक करून  शहर पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed