गळफास बसून मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट
आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली शहरातील सावंत प्लॉटमधील घरात आज दुपारी चारच्या सुमारास शाळेच्या कापडी पट्ट्याचा फा लागल्याने सहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. अंजली नितीन खांडेकर असे या बालिकेचे नाव आहे. दरम्यान, घातपाताचा संशय वाटल्याने पोलिसांनी दोन तास कसून चौकशी केली. अखेर गळफास बसूनच मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद विश्रामबाग पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. यावेळी शासकीय रुग्णालय परिसरात मोठी गर्दी होती.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शासकीय रुग्णालयाजवळच असणाऱ्या सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहते. नितीन सावंत हे मार्केट यार्डात हमाली करतात. त्यांना मोठी मुलगी अंजली आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते. दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. वडील नितीन हे कर्नाटकात गावाकडे गेले होते. घरात चिमुकली अंजली, आई, छोटा भाऊ आणि आजी असे चौघेजण होते. दुपारी चारच्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती.
थोड्यावेळाने आई बाहेर आली, तेव्हा तिला अंजली ही खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलवले. अंजलीला खुंटीवरून खाली काढले. त्यानंतर तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, चिमुरड्या अंजलीचा संशयास्पद मृत्यू तर नाही ना? अशी चर्चा परिसरात होती. विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी भेट दिली. दोन तास पोलिसांनी कसून चौकशी केली. आई-वडिलांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
शिराळा येथे चोरीच्या पाच मोटारसायकल जप्त; चरणच्या एकास अटक; अनेक गुन्हे उघडकीस
कोल्हापूर जिल्ह्यातील चरण (ता. शाहूवाडी) येथील करण युवराज पाटील ( वय १९) याला मोटारसायकल चोरी प्रकरणी शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सुहास सुकुमार चौगुले (रा. सांगली) यांनी फिर्याद दिली होती. ही घटना ९ ऑगस्टला घडली होती.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुहास चौगुले यांची मोटारसायकल ९ ऑगस्टला नागपंचमी दिवशी शिराळा येथून दुपारी दोन ते सहा वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली होती. त्याची दाखल घेऊन पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपविभागिय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहायक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अंमलदार हे घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा तपास करत होते.
दरम्यान पोलिस नाईक अमर जाधव यांना गोपनीय बातमीदारांमार्फत आरोपी करण युवराज पाटील याने सदरचा गुन्हा केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार त्यास ताब्यात व विश्वासात घेऊन त्याचेकडे सखोल तपास केला. त्यावेळी त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले. त्यामुळे त्यास अटक करून आणखी तपास केला असता त्याने साथीदारासह आणखी गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, पोलिस हवालदार भूषण महाडिक, एस. जी. पाटील, एन. व्ही. यादव, सुभाष पाटील, माणिक पाटील, अरुण मामलेकर, पोलिस नाईक अमर जाधव, शरद पाटील, गुडवाडे (सायबर पोलिस ठाणे) यांच्या पथकाने केली. तपास पोलिस नाईक अमर जाधव करीत आहेत.
या क्रमांकांच्या मोटारसायकली: पोलिसांनी चोरीतील मोटारसायकल क्रमांक (एम. एच. ०८ एस. ८०७७) (एम. एच. १० ए. एल. ९४६) (एम. एच.०९) (ईएक्स ४६६३ ) (एम. एच. १०. सी. ई. ५९०२), (एमएच १०. सीजे ४९८८) अशा ९५ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
सांगली शहरातील नऊ दुचाकी हस्तगत: सराईत चोरटा ताब्यात: त्याच्याकडून ३१ गुन्हे उघडकीस; सांगली पोलिसांची कारवाई
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातून चोरलेल्या ४ लाख ८० हजारच्या नऊ दुचाकी सराईत चोरट्याकडून सांगली शहर पोलिसांनी हस्तगत केल्या. रणजित श्रीरंग लोखंडे (वय २५, रा. गोमटेश कॉम्पुटरनजीक, बुधगाव, ता. मिरज) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर दुचाकी चोरीचे तब्बल ३१ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुचाकी शहरातून चोरीस जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात चोरट्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथक तैनात केले होते. या पथकातील पोलिस कर्मचारी संतोष गळवे यांना, संशयित आकाशवाणीच्या मागील बाजूस बुधवारी (ता. २८) चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. गुन्हे प्रकटीकरण शाखेने परिसरात सापळा लावला. त्यावेळी एक युवक दुचाकीवर थांबल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दुचाकीला नंबर प्लेट नसल्याने तसेच संशयिताच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सांगली पोलिस चौकशीत संशयित रणजित लोखंडे याने सदरची दुचाकी सांगली बसस्थानक परिसरातील एका मोबाईलच्या दुकानासमोरून चोरल्याची कबुली दिली. पोलिस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी पंचनामा करून सदरची दुचाकी जप्त केली.
संशयित लोखंडे यास न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. पोलिस चौकशीत संशयित रणजित याने शहरातील अजून आठ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज पोलिस ठाण्यात संशयितावर दुचाकी चोरीचेच गुन्हे असून, यापूर्वी पोलिसांनी त्याच्याकडून ३१ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
या कारवाईत पोलिस कर्मचारी संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, गौतम कांबळे, योगेश सटाले, संतोष गळवे, संदिप कुंभार, पृथ्वीराज कोळी यांनी सहभाग घेतला. तपास श्रीपाद शिंदे करीत आहेत.