सांगलीमध्ये ठराविक ठिकाणावरून मोटारसायकली तर आठवडा बाजारातून मोबाईल होत आहेत लंपास
आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली जिल्ह्यात ठराविक ठिकाणावरून मोटारसायकलींच्या चोरी होत आहेत तर आठवडा बाजारातून मोबाईल लांबवले जात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अलीकडच्या काही महिन्यापासून मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. सरासरी दररोज एक मोबाईल आणि एक दुचाकी चोरी केली जात आहे. पोलीस ठाण्यात या चोरीची फिर्याद दाखल होत आहे.
सांगली, मिरज शहरांसह तालुक्याच्या शहरातदेखील सीसीटीव्हीचे मोठे जाळे पसरलेले असतानाही दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. दिवसाढवळ्या होणाऱ्या या प्रकारामुळे सगळेच हैराण झाले आहेत. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे अशा चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलिसांना विशेष मोहिम राबविण्याची गरज आहे. सांगली शहरात प्रत्येक दिवशी काही भागात आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले आहे. हे आठवडी बाजार साधारणपणे सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत सुरू असतात.
या आठवडी बाजारात सहजपणे मोबाईल लंपास केले जात आहेत. हे मोबाईल लंपास करणारे चोरटे हे अल्पवयीन आहेत. त्यामुळे जरी या चोरट्यांना रंगेहात पकडले तर इतर लोक लहान मुलगा आहे त्याला सोडून द्या म्हणून सांगतात आणि त्यातून चोरटे सहजपणे निसटतात. गेल्या काही दिवसापासून मात्र सातत्याने या घटना घडत असल्याने पोलिसांनी आता आठवडी बाजारावर वॉच ठेवण्याची मोहिम राबविली आहे.
या बाजारात संशयितरित्या फिरणाऱ्यांना ते अडवून त्यांची चौकशी करताहेत. त्यामुळे अनेक बाजारातून हे चोरटे दिसेनासे झाले आहेत. पण तरीही पोलीस आणि नागरिकांची नजर चुकवून हे चोरटे चोरी करत आहेत. साहजिकच यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मोबाईल चोरीला भरीस पडत आहे आठवडी बाजारात साधारणपणे लोक भाजी खरेदी करत असताना आपल्या मोबाईलला खिश्यात ठेवताना तो व्यवस्थित ठेवत नाहीत. हा मोबाईल पाठीमागील खिश्यात किंवा शर्टच्या खिश्यात ठेवतात. भाजी खरेदी करताना गर्दी झाली की सहजपणे धक्का लागल्यावर हा मोबाईल इतरांच्या हाती पडतो. आणि मोबाईल मालकाला काही समजण्याच्या आधीच मोबाईल लंपास झालेला असतो.
पुरुषांच्या बाबतीत असे घडते तर महिलांच्या बाबतीतही असेच घडते. हा मोबाईल भाजीच्या पिशवीजवळ किंवा हातात तसेच पर्समधील उघड्या कप्प्यात ठेवला जातो. त्यामुळे हा मोबाईल चोरी करणे या चोरट्यांना सहजपणे जमते. नागरिकांनी आपल्या वस्तूची काळजी आणि सुरक्षितता घेतली तर या मोबाईलच्या चोऱ्या होण्याची शक्यता कमी आहे. पण ही सुरक्षितता घेतली जात नाही. त्यामुळेच या चोया वाढत चालल्या आहेत.
सांगलीतील काही चौकातून तसेच वसंतदादा सर्वोपचार रुग्णालय याशिवाय अनेक रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या दुचाकी चोऱ्याच्या अनेक घटनाची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामध्ये या ठराविक चौकाचे आणि ठराविक रूग्णालयाच्या पार्किंगच्या जवळचे ठिकाण आहे. दुचाकीच्या डुप्लिकेट चाव्या सहजपणे तयार होत असल्याने या दुचाकीचे चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच काही दुचाकीचे हँडललॉक सहजपणे तोडले जाते.
त्याचे प्रात्याक्षिकही अनेकवेळा चोरट्यांनी पोलिसांसमोर दाखविले आहे. पण तरीही या दुचाकीचे हँडल अजूनही चांगल्या दर्जाचे तयार होत नाही. त्यामुळे या दुचाकी सहजपणे चोरी केल्या जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे येतात पण लो-क्वॉलिटीचे सीसीटीव्ही असल्याने अनेक चोरटे स्पष्ट दिसत नसल्याने हे चोरटे सापडत नाहीत. पोलिसांनी ज्या परिसरात दुचाकी चोऱ्या होतात त्या परिसरातही गस्तीचे प्रमाण वाढविल्यास या चोऱ्याही कमी होवू शकतात.
सण- उत्सव नसल्याने सांगली जिल्ह्यातील बाजारपेठेत बेदाण्याची आवक मंदावली, उठावही कमी
सांगली जिल्ह्यातील तासगाव, सांगली, पंढरपूर या बेदाणाच्या बाजारपेठांत सौद्याला अंदाजे १० हजार टन बेदाण्याची आवक होत असून ५० टक्के विक्री होत आहे. सध्या सण- उत्सव नसल्याने बाजारपेठेत बेदाण्याची आवक मंदावली असल्याने उठावही कमी झाला आहे. दर टिकून आहेत. बेदाण्याला प्रतिकिलोस ११० ते २२० रुपयांपर्यंत दर आहेत. सध्या दरात चढ- उतार होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 30 जून: मेष, सिंह राशीसह 5 राशींना रविवारी आर्थिक लाभ होईल, इतरांनाही आजच्या राशीत त्यांचे भविष्य जाणून घ्या
राज्यात मे महिन्याअखेर ९५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली होती. मुळात मे महिन्यात लग्न समारंभ असतात. त्यामुळे बेदाण्याची मागणी वाढते. परंतु यंदा फारसे लग्न समारंभ नव्हते. त्यामुळे मे महिन्यात त्याचा अपेक्षित उठाव झाला नाही. तरीही बेदाण्याला मागणी बरी असल्याने दरही टिकून होते. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तीन प्रमुख बेदाणा बाजारांत अंदाजे एक हजार टन सौद्यासाठी आवक होते. जूनमध्ये बेदाण्याची मागणी कमी आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे.
मे महिन्यापेक्षा जून महिन्यात सौद्याला सुमारे ५०० टनांनी आवक कमी झाली असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. मे महिन्यात बेदाण्याची १३ हजार टनाची विक्री झाली होती. जूनमध्ये सुमारे बेदाणा १० हजार टन विकला गेला आहे. मुळात बाजारात बेदाण्याची आवक मंदावली असली तरी, बेदाण्याचे दर टिकून आहेत. सध्या राज्यातील शीतगृहात १ लाख १० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.
शेतकरी बेदाण्याच्या दराची स्थिती पाहून विक्री करत आहेत. हिरव्या बेदाण्याला ११० ते २२० रुपये प्रति किलो, पिवळ्या बेदाण्याला १०० ते १६० रुपये प्रतिकिलो दर आहे. जुलैच्या पंधरवड्यापर्यंत बेदाण्याची आवक, मागणी कमी-अधिक राहण्याची शक्यता आहे. बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितले की यंदाच्या हंगामात बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मागणीनुसार बेदाण्याची आवक सुरू आहे. येत्या महिन्यात बेदाण्याची विक्री वाढेल.