सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ परिसरात घरफोडी
सांगली / आयर्विन टाइम्स
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रभावी कारवाई करत आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीला गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, एकूण दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विनायक बजरंग खुटाळे (वय ३० वर्षे, रा. शिंदे मळा, संजयनगर, सांगली) हा चोरी केलेले दागिने विक्रीसाठी सांगलीच्या गुजराती हायस्कूल परिसरात येणार आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारावर पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला सापळा रचून अटक केली.
घटनेची पार्श्वभूमी
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्यादी नंदाबाई लक्ष्मण खोत यांनी ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी घरफोडीची तक्रार नोंदवली होती. घराचे लॉक तोडून चोरट्याने सोन्याचे दागिने लांबवले होते. या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक ४१६/२०२४ नुसार कलम ३३१ (३), ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने कबुली दिली की त्याने नागज फाटा येथे घरफोडी करून दागिने चोरले होते.
जप्त मुद्देमाल
पथकाने आरोपीच्या अंगझडतीत १९.२०० ग्रॅम वजनाचे मणी असलेले सोन्याचे गंठण (किंमत १,२०,००० रुपये) आणि ३०.१२० ग्रॅम वजनाची बोरमाळ (किंमत १,३५,००० रुपये) जप्त केली आहे. एकूण जप्त केलेल्या दागिन्यांची किंमत २,५५,००० रुपये आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी
या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे आणि सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी केले. पथकात पोना सोमनाथ गुंडे, पोशि अभिजीत ठाणेकर आणि अन्य पोलिस अधिकारी सहभागी होते.
सदर आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.