सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र येथील घटना
आयर्विन टाइम्स / सांगली
सात-बारा उताऱ्यावर नावनोंदीसाठी सात हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्रच्या महिला तलाठी सीमा विलास मंडले (वय ४४, विद्यानगर, सैदापूर, ता. कन्हाड, जि. सातारा), तसेच त्यांचा साथीदार चंद्रकांत बबनराव सूर्यवंशी (येडेमच्छिंद्र, ता. वाळवा) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदारांनी शेतजमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली, त्यांचे नाव कमी करून स्वतःचे नाव लावण्यासाठी तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले होते, त्या वेळी दोघांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत १ ऑगस्टला तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. दरम्यान, विभागाने २ ऑगस्टला तक्रारीची पडताळणी केली असता पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
‘लाचलुचपत’च्या पडताळणीत दोघेही सकृतदर्शनी दोषी असल्याचे निदर्शनास आले. तलाठी सीमा मंडले यांची चंद्रकांत सूर्यवंशी याच्याशी ओळख आहे. तक्रारदार यांना सात- बारावर नाव नोंद करून देण्याचे काम करून देण्याची हमी सूर्यवंशी याने दिली होती. खरेदी केलेल्या शेतजमिनीची नोंद मंडल अधिकारी जाधव यांना सांगून करून देण्याचे आश्वासन त्याने दिले. तक्रारदारांकडे मंडल अधिकारी जाधव आणि प्रांताधिकाऱ्यांना देण्याकरिता सात हजार रुपयांची मागणी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत तलाठी सीमा मंडले यांनी सहभागी होऊन तक्रारदार यांना लाचेची रक्कम चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, पोपट पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव यांचा सहभाग होता.