सांगली जिल्ह्यातील चोरीतील संशयित चोरटा कर्नाटकातील बेळगावचा
आयर्विन टाइम्स / सांगली
शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील एका सराफी दुकानात चोरी करून पसार झालेल्या अबरार हुसेन गुलाबरसुल बेग (वय ३०, कुडची ता. रायबाग जि. बेळगाव) या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून चोरलेली ९० हजार रुपये किमतीची पाटली हस्तगत करण्यात आली. शेडगेवाडी येथे तुषार लीलाचंद माळी यांचे सराफी दुकान आहे. ता. ५ एप्रिल रोजी त्यांच्या दुकानातून चोरट्याने सोन्याची पाटली चोरून नेली होती. याबाबत त्यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची गस्त सुरु असताना पोलिस कर्मचारी सागर लवटे यांना चोरीतील सोन्याची विक्री करण्यासाठी अबरार हुसेन बेग हा गुरुवारी कुपवाड फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या परिसरात सापळा लावला असता एक युवक संशयास्पदरीत्या रस्त्याकडेला थांबलेला दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शेडगेवाडीत सराफी दुकानातून चोरी केल्याची कबुली दिली. संशयित बेग हा सराईत चोरटा असून विविध राज्यांत चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सांगलीतील घनश्यामनगरमध्ये फ्लॅट फोडून साडेबारा तोळ्यांवर डल्ला
सांगलीतील संजयनगर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या घनश्यामनगरमधील दोन बंद फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने तब्बल साडेबारा तोळे सोने आणि ४४ हजारांची रोकड लंपास केली. दुपारी दीडच्या सुमारास ही चोरी झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिस तपास करत आहेत. ही चोरी सराईतांनी केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी नितीन संभाजी पाटील (वय ३१) हे खासगी वाहनावर चालक आहेत. ते घनश्यामनगर येथील वरद विश्व अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर राहतात. ते दुपारी एकच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटला. तिजोरीतील लॉकर चोरट्यांनी तोडले. तेथील सोन्याची अंगठी, सोन्याचे वेल, झुबे, चेन, बदाम, टॉप्स, चार अंगठ्या, सोनसाखळी, रिंगा असे नऊ तोळ्यांचे दागिने, स्मार्ट वॉच आणि १७ हजार पाचशे रुपयांची रोकड पळवली.
याचवेळी समोर असणाऱ्या अक्षय अपार्टमेंटमध्ये चोरटे घुसले. त्याठिकाणी फिर्यादी ज्योती मनसुखलाल चौहाण (वय ५५) यांचा फ्लॅट आहे. त्याही बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या फ्लॅटचाही कडीकोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. तिजोरीतील साडेतीन तोळ्यांचे दागिने आणि २७ हजारांची रोकड लंपास केली. दोन्ही चोरीतील
सात लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लुटला. दिवसाढवळ्या ही चोरी झाल्याने खळबळ उडाली. अगदी काही मिनिटांत चोरट्यांनी ही चोरी केली आहे.
दुपारी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून अपर अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, संजयनगरचे निरीक्षक बयाजीराव कुरळे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सूचना केल्या. चोरट्यांच्या शोधासाठी तातडीने संजयनगर आणि एलसीबीची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.
चोरटे दुपारी एकच्या सुमारास घनश्यामनगर परिसरात मोपेडवरून गेले. त्यावेळी दोघा चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधला होता. डोक्यावर टोपीही होती. अगदी काही मिनिटांत हात साफ करत चोरटे तेथून पसार झाले, हे सारे सीसीटीव्हीत कैद झाले. त्यांनी वापरलेल्या दुचाकीचा नंबरही बोगस असल्याचे तपासात समोर आले आहे.
सांगलीतील कुपवाडला पिस्तूल रोखल्याप्रकरणी नऊ जणांना अटक;तीन पिस्तुलांसह पाच काडतुसे, एडके जप्त : संशयितांना न्यायालयीन कोठडी
पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारण्याच्या हेतूने वाघमोडेनगरला एकावर पिस्तूल रोखल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दहा जणांना तपासांतर्गत कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. संशयितांची आज न्यायालयात रवानगी करण्यात करण्यात आली.
संदेश रामचंद्र घागरे (वय २१), किरण दादासाहेब कोंडीगिरे (वय २०), अनिकेत दत्ता कदम (वय २०), किरण शंकर लोखंडे (वय २३), सौरभ शहाजीराव मासाळ (वय २४, सर्व वाघमोडेनगर, कुपवाड), प्रतीक शिवाजी कोळेकर (वय १९, शरदनगर, कुपवाड), सोन्या ऊर्फ बापू हरी येडगे (वय २८), दादासो मारुती शेजुळ (वय २६), मलिक सलीम शेख (वय २४, सर्वजण दत्तनगर, बामणोली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
तपासांतर्गत पोलिसांनी त्यांच्याकडून तीन पिस्तूल, पाच काडतुसे, दोन दुचाकी, चार एडके असा दोन लाख २५ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सोमवारी (ता. ८) रात्री वाघमोडेनगर, मायाक्का देवी मंदिराच्या लगत वाढदिवसाच्या समारंभात सागर राजाराम माने (वय ३५, राजाराम बापू हौसिंग सोसायटी औद्योगिक वसाहत, मिरज ता. मिरज) यांच्यावर एकाने पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता.
पिस्तूलमधून गोळी सुटली नसल्याने ते बचावले. घडलेल्या प्रकाराची फिर्याद त्यांनी कुपवाड पोलिसांत दिली. शुक्रवारी (ता. १२) पाच संशयितांना अटक आष्टा (ता. वाळवा) येथून अटक करण्यात आली. संदेश रामचंद्र घागरे (वय २१). किरण दादासाहेब कोडीगिरे (वय २०), अनिकेत दत्ता कदम (वय २०, सर्वजण वाघमोडेनगर), प्रतीक शिवाजी कोळेकर (वय १९, शरदनगर, कुपवाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे होती. त्यांच्या व्यतिरिक्त गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आढळून आला.

नागाव (ता. वाळवा) येथे विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
नागाव (ता. वाळवा) येथे विजेच्या धक्क्याने ‘महावितरण’च्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आदित्य वसंत गुरव (वय २३, भडकंबे, ता. वाळवा) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.
याबाबत पोलिस ठाण्याकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी ८.१५ च्या सुमारास नागाव येथे महावितरणचा कंत्राटी कर्मचारी आदित्य गुरव व अन्य सहकारी मिळवून नागाव येथे रात्रीपासून वीज नसल्यामुळे दुरुस्तीकामासाठी गेले होते. दुरुस्तीकाम सुरू असताना अचानक आदित्य गुरव व त्याच्या एका सहकाऱ्याला विजेचा मोठा धक्का बसला. विजेचा धक्का बसल्यानंतर आदित्य गुरव शरद शामराव कुलकर्णी हे आदित्य गुरवला घेऊन आष्टा ग्रामीण रुग्णालयात आले असता डॉ. विजयकुमार पाटील यांनी तपासणी करून आदित्य गुरव दवाखान्यात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
याबाबतची वर्दी डॉ. विजयकुमार पाटील यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दिली आहे. आदित्य गुरवच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याची आई आजारी असते. त्याचा एक भाऊ दिव्यांग आहे. घर सांभाळणाऱ्या आदित्यचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती.