सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याची थेट सीईओंना धमकी
सांगली (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एका शिक्षिकेविरोधात आत्महत्येची धमकी देत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान जत येथील पोलिसांतदेखील संबंधित शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
प्रकरणाची पार्श्वभूमी
संबंधित शिक्षिका जत तालुक्यातील एका शाळेत कार्यरत होत्या. त्यांच्या वर्तनाविषयी पालकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. याची दखल घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, पालकांच्या तक्रारी योग्य असल्याचे आढळले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तृप्ती धोडमिसे यांनी शिक्षिकेवर कारवाई करत तिला निलंबित केले. जत येथील पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर देखील बदलीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याने संबंधीत अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
बदलीची मागणी आणि धमकी
निलंबनानंतर शिक्षिकेची शिराळा तालुक्यात नियुक्ती करण्यात आली. मात्र, कवठेमहांकाळ तालुक्यात बदली व्हावी, असा तिचा आग्रह होता. गेल्या महिनाभरापासून शिक्षिकेने जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे सतत विनवण्या आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने शिक्षिकेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ठाम भूमिका घेतली.
सोमवारी दुपारी, शिक्षिकेने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या दालनात गोंधळ घालत, “कवठेमहांकाळमध्ये बदली केली नाही, तर जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करेन,” असा इशारा दिला.
प्रशासनाची कारवाई
संबंधित घटनेची गंभीर दखल घेऊन सीईओ तृप्ती धोडमिसे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, विश्रामबाग पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
प्रशासनाचा कडक इशारा
प्रशासनाच्या वतीने, अशा प्रकारच्या धमक्या देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील शिस्त व नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.