सारांश: सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील शेखर पाटणकर याने बालकामगार गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, ज्यामुळे त्याला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी करत ही कारवाई केली. दुसऱ्या प्रकरणात मिरजेतील दोन कर्मचाऱ्यांनी थकीत पगार मंजुरीसाठी लाच मागितल्याबद्दल अटक झाली. दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.
सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
बांधकाम कार्यक्षेत्रावर झालेल्या अपघातानंतर बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी शेखर जयवंत पाटणकर ( वय ३८, रा. सांगली) याला अटक करण्यात आली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तीनी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक शेखर जयवंत पाटणकर (वय ३८, रा. सांगली) याच्यावर कारवाई झाली.
अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे बांधकाम साईटवर सळी बांधण्याचे कंत्राट घेतात. ७ डिसेंबरला तक्रारदार यांनी कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकाम साईटवर एक अल्पवयीन बालक, त्याचे नातेवाईक अपघातात जखमी झाले होते. जखमींवर विजयनगर – सांगली येथे भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हॉस्पिटलमधून विश्रामबाग पोलिस ठाण्यात जखमींबाबत माहिती देण्यात आली होती. त्यासाठी पोलिस नाईक पाटणकर हा गेला होता.
अपघातामध्ये तक्रारदार यांच्याविरुद्ध बालकामगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदार यांच्या बाजूने घेण्यासाठी पोलिस नाईक पाटणकर याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार १० डिसेंबरला पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत पाटणकर याने २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला होता. तेथून परवानगी मिळाल्यानंतर पाटणकर याला अटक करून विश्रामबाग- सांगली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान दुसऱ्या एका लाच मागणी केल्याप्रकरणात लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलेल्या दोन प्रशासकीय कर्मचाऱ्यांनादेखील मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तीनी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. महाविद्यालयातील थकीत पगार बिलाची १९ लाखांची रक्कम मंजूर करुन आणण्यासाठी सहा टक्के याप्रमाणे १ लाख १० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी मिरजेतील हिंद एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक उमेश मारुती बोरकर (वय ३६, रा. यादव गल्ली, कवठेएकंद, ता. मिरज) व कनिष्ठ लिपिक युवराज मनोहर कांबळे (वय ५६, रा. बौद्ध वसाहत, बेडग, ता. मिरज) याला अटक केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सांगली उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.