सांगली कृषी वार्ता

📰 सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज झाले आहेत. रब्बी हंगामासाठी खतं आणि बियाण्यांचा साठा पूर्ण असून जत आणि कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन होणार आहेत. कृषी क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकमध्ये.

🌾 मुख्य बातमी: सांगली जिल्ह्यात ऊस हंगामाची सुरूवात

सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखाने ऊस गाळप हंगामासाठी सज्ज झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भातून मजूर टोळ्या मिरज तालुक्यात दाखल होऊ लागल्या आहेत. १ नोव्हेंबरपासून गाळप हंगामाला प्रारंभ होणार असून, एकूण १.३९ लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपास तयार आहे. सरकारकडून दिलेल्या तोडणी यंत्र (हार्वेस्टर) अनुदानामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे ऊस उताऱ्यात घट येण्याची भीती कारखान्यांसमोर निर्माण झाली आहे.
राजारामबापू साखर कारखान्याच्या चार शाखा, विश्वास, हुतात्मा, सोनहिरा, क्रांती, दालमिया, श्री दत्त इंडिया, एसईझेड शुगर, श्री श्री सदगुरू, मोहनराव शिंदे, उदगिरी, यशवंत शुगर, श्रीपती शुगर्स आदींसह एकूण १६ कारखाने सज्ज आहेत.

हेदेखील वाचा: सांगली जिल्हा गुन्हेगारी वार्ता : जत तालुक्यातील दरीबडचीत विवाहित तरुणीची आत्महत्या, मिरज तालुक्यात पाच गावठी पिस्तुलांसह 2 जण अटक आणि याशिवाय वाचा अपघात, चोरी, वर्चस्ववादामुळे नागरिक भयभीतच्या बातम्या

💰 ऊसदरावरून शेतकरी वर्गात चर्चा

कर्नाटकातील काही कारखान्यांनी आधीच गाळप सुरू केल्याने सीमाभागात ऊस ‘पळवापळवी’ सुरू झाली आहे. सांगलीतील प्रमुख कारखाने — हुतात्मा, राजारामबापू, सोनहीरा, क्रांती, विश्वास आणि दत्त इंडिया — यांच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा ऊसदरासाठी ३५०० ते ३७५१ रुपये प्रतिटन अशी मागणी आहे. माजी खासदार राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी जाहीर केले आहे की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १० नोव्हेंबरपासून ऊसदर आंदोलन सुरू होईल.
जिल्ह्यात यावर्षी तब्बल एक लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रांवरील ऊस गाळपास उपलब्ध आहे. मात्र, लांबलेल्या पावसामुळे आणि शेतात साचलेल्या पाण्यामुळे तोडणी यंत्रणा सुरळीत लागण्यास वेळ लागणार आहे. दुसरीकडे, ऊस वेळेत कारखान्यापर्यंत पोहोचविण्याबरोबरच दराचा प्रश्नही शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे.
यावर्षी साखर उताऱ्यानुसार प्रतिटन ३५०० रुपयांपर्यंत पहिली उचल मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऊसतोड मजुरांचे गावाकडे आगमन सुरू झाले असून, बरेचसे मजूर दिवाळी साजरी करूनच कामावर हजर होणार आहेत.

सांगली कृषी वार्ता

🌽 मक्याला हमीभावासाठी प्रयत्नशील — खासदार विशाल पाटील

कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील मका खरेदी केंद्राचे उद्घाटन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी सांगितले की, “मका उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ मिळावी, यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. या केंद्रामुळे जत आणि कवठेमहांकाळ परिसरातील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल.”

🌱 रब्बी हंगामासाठी सांगली कृषी विभाग सज्ज

जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने १.८२ लाख टन खतं आणि १९ हजार क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून घेतला आहे. ७३७ गावांमध्ये ५८७० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके राबविली जाणार असून, ज्वारी, गहू, मका, हरभरा आणि सूर्यफूल या पिकांची पेरणी होईल. कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी सांगितले की, “खते आणि बियाण्यांचा पुरेसा साठा असल्याने कोणतीही कमतरता भासणार नाही.”

सांगली कृषी वार्ता

🏛️ जत व कवठेमहांकाळला स्वतंत्र बाजार समित्यांचा मार्ग मोकळा

राज्य शासनाच्या निर्णयानुसार जत आणि कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार आहेत. जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी सांगली बाजार समिती आणि राज्य पणन मंडळाकडून १५ दिवसांत अभिप्राय मागविला आहे. या बाजार समित्यांमुळे तालुक्यातच शेतमाल विक्रीसाठी हक्काचा बाजारभाव, आधुनिक लिलाव प्रणाली, ऑनलाइन विक्रीव्यवस्था, आणि प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. यामुळे स्थानिक रोजगार आणि कृषिपूरक उद्योग विकसित होण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे कवठेमहांकाळ आणि जत येथे दुय्यम बाजार आवार कार्यरत आहे. कवठेमहांकाळ येथे विठ्ठल (दाजी) पाटील दुय्यम बाजार आवाराचे कवठेमहांकाळ येथे ७.७५ हेक्टर क्षेत्र आहे, तर ढालगाव दुय्यम बाजार
आवाराचे ढालगाव येथे ३.४४ हेक्टर क्षेत्र आहे.

जत येथे श्रीमंत विजय श्रीराजे डफळे दुय्यम बाजार आवाराचे ६.४० हेक्टर क्षेत्र असून जनावरे बाजाराचे ६ हेक्टर इतके क्षेत्र आहे. तसेच बी. आर. शिंदे (काका) दुय्यम बाजार आवार माडग्याळ याचे ४.०८ हेक्टर क्षेत्र असून दुय्यम बाजार आवार उमदीचे ३.२० हेक्टर इतके क्षेत्र आहे.

सांगली जिल्ह्यातील कृषी क्षेत्र सध्या हंगामी गतीने पुढे सरकत आहे — एकीकडे साखर कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज आहेत, दुसरीकडे रब्बी हंगामाच्या पेरणीची तयारी जोमात आहे, तर जत आणि कवठेमहांकाळ येथे बाजार समित्यांच्या स्थापनेने शेतकऱ्यांना नवे आर्थिक बळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed