सांगली शहर पोलीस ठाण्याची कारवाई
सांगली/ आयर्विन टाइम्स
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने २ आरोपींना अटक करून एकूण १,१०,००० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्रावण सुरेश बनसोडे (वय २८ वर्षे, रा. साई कॉलनी, दिंडीवेस, मिरज) आणि प्रज्वल प्रकाश पांढरे (वय २३ वर्षे, रा. ब्राम्हणपुरी, मिरज) यांचा समावेश आहे. आरोपींनी स्टीलचा हातगाडा चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून सुझुकी कंपनीची मोपेडदेखील जप्त करण्यात आली आहे.
गुन्ह्याची हकीगत
दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९.०० ते १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजेदरम्यान सांगली शहरात चोरीची घटना घडली. फिर्यादी संतोष वासुदेव भगत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोकॉ. पृथ्वीराज कोळी यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम चोरी केलेला स्टीलचा हातगाडा विक्रीसाठी घेऊन घाडगे हॉस्पिटल बायपास रोड, sangli येथे येणार आहेत. त्यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. दोन इसम संशयास्पद स्थितीत फिरताना आढळले. त्यांची चौकशी केली असता चोरीचा हातगाडा आणि सुझुकी मोपेड सापडली. चौकशीत त्यांनी त्यांच्या साथीदार आकाश शिवाजी पवार याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
कारवाई आणि पुढील तपास
या यशस्वी कारवाईसाठी sangli शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एम. विमला यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे कार्य पूर्ण केले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. रफीक मुलाणी हे करीत आहेत.