सांगलीतील कुपवाडच्या तरुणाने खास विक्रीसाठी तलवारी बनवल्या
आयर्विन टाइम्स / सांगली
विशाळगडजवळील येथील घटनेनंतर सांगली पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गस्ती पथकांत वाढ केली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या पथकाची गस्त सुरू असताना सांगली – आष्टा रस्त्यावर एका तरुणाकडून बेकायदेशीर तलवारीचा साठा जप्त करण्यात आला. १० तलवारींसह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय २१, नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, की सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते. यावेळी एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकातील अंमलदार संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप पाटील यांना माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने सापळा रचण्यात आला. संशयित भगतसिंग शीख याला संशयास्पदरित्या ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्याजवळ पोत्यात दहा तलवारी मिळाल्या.
हे देखील वाचा: Jat News : जत तालुक्यातील सिंगनहळ्ळीत चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; 1 जखमी : दोघे अचकनहळ्ळी गावचे रहिवासी
या तलवारींबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या तलवारी या विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक दुचाकी असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, रफिक मुलाणी, विनायक शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, पृथ्वीराज कोळी, सुमित सूर्यवंशी, योगेश सटाले, गणेश कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली.
दरम्यान, संशयित लोखंडी भांडी बनवतो. त्याने एक तलवार बनवली होती. नक्षीकाम, धार असलेल्या तलवारी त्याने बनवल्या. त्या विक्रीसाठी सांगलीत आला होता. तत्पूर्वी त्याला सांगली पोलिसांनी अटक केली. पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे.
खरसुंडीत रोख रकमेसह ऐवज पळविला; एसटी बसस्थानकासमोर ३.१७ लाखांच्या मुद्देमालाची चोरी
खरसुंडी बसस्थानकासमोर भेट देऊन पाहणी केली. भिवघाट रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाजवळ असलेल्या श्री सिद्धनाथ ज्वेलर्स, श्री सिद्धेश्वर हार्डवेअर व पान टपरी शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने चोरी करून तीन लाख १७ हजार पाचशे रुपये चांदी तयार दागिने व रोख असा ऐवज लंपास केला. आटपाडी पोलिसांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शनिवारी रात्री चोट्याने सुरज अशोक गायकवाड चिंचाळेकर यांचे श्री सिद्धनाथ ज्वेलर्सच्या समोरील गेटचे कुलूप तोडून आतील बाजूस प्रवेश केला. शटरचे सेंटर लॉक कटावणीने उचकटून दोन्ही बाजूच्या लॉकपट्ट्या तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानात सीसीटीव्ही असल्याने कॅमेरे साईडला वाकवण्यात आले.
हे देखील वाचा: World Brain Day / विश्व मेंदू दिवस 22 जुलै : लोकांना मेंदूशी संबंधित सर्व आजारांची माहिती व्हायला हवी
त्यानंतर ज्वेलरीमधील चांदीचे दागिने व तयार वस्तू अशा दोन लाख ९२ हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने व वस्तूंची चोरी करण्यात आली आहे. या नंतर याच ज्वेलरीसमोरील सिद्धेश्वर हार्डवेअर तरंगेंचे हार्डवेअरच्या दुकानाचे दोन्ही बाजूच्या लॉक पट्ट्या तोडून शटर कटावणीने उचकटण्यात आले. चिल्लर व १५ ते २० हजारांची चोरी करण्यात आली आहे. त्यानंतर प्रसाद जावीर यांच्या पान दुकानाचे कुलूप तोडून चार- पाच हजारांची चिल्लर असे तीन लाख १७ हजार पाचशे रुपये रोख व ऐवज चोरण्यात आला आहे.
त्याची फिर्याद सूरज गायकवाड यांनी आटपाडी पोलिसांत दिली. ज्वेलरीचे मालक गायकवाड दुकान उघडण्यास आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्याची माहिती आटपाडी पोलिसांत दिली. निरीक्षक प्रकाश गायकवाड व उपनिरीक्षक राजीव केंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी श्वान पथकही आणून शोध घेण्याचा प्रयत्न केला. उपनिरीक्षक राजीव केंद्रे तपास करीत आहेत.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका युवकाचे वाचले प्राण; शिराळा तालुक्यातील एका गावातील घटना
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील एका गावात आत्महत्या करणाऱ्या युवकाचे पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले. पोलिसांनी वेळेत जाऊन सीपीआर पद्धतीचा उपयोग करून त्याला जीवदान दिले. पोलिस हवलदार सूर्यकांत कुंभार व अरुण मामलेकर यांचे मदतीबद्दल कौतुक होत आहे.
पोलिसांनी माहिती दिली की, १९ जुलै रोजी अंमलदार पोलिस हवलदार सूर्यकांत कुंभार व अरुण मामलेकर मदत ड्युटीस होते. त्यांना ११२ वरून महिलेचा फोन आला. पती शिवीगाळ व मारहाण करीत असून जीव देण्याचा व घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मदत करा, असी विनंती केली. कुंभार व मामलेकर यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही.
दोघांनी गावात जाऊन महिलेच्या नावांवरून चौकशी केली. स्थानिकांकडून उपयुक्त माहिती मिळाली नाही. मात्र, १८ जुलै रोजी रात्री संबंधित महिलेने डायल ११२ ला फोन केल्याने हवालदार मुलाणी व विकास शिंदे त्या गावात गेले होते. पती घरी व आजबाजूला आढळला नाही. महिला माहेरी गेली होती. पोलिसांनी ‘तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात या सांगून परतले. महिला व तिच्या पतीचे नाव व गावाची माहिती कुंभार व मामलेकरांना मुलाणी व शिंदेंनी दिली.
कुंभार व मामलेकर युवकाच्या घरी पोहोचले. दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी मागील दरवाजाकडे जाऊन पाहिले असता तो ही बंद असल्याने शंका आली. समोरचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. युवक साडीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. तो बेशुध्दास्थेत होता. कुंभार यांनी त्वरित सीपीआर उपचार केला. मामलेकर यांनी प्राथमिक उपचार सुरू केले. सीपीआर व प्राथमिक उपचाराने श्वासोच्छ्वास सुरू झाला. लोकांच्या मदतीने खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि त्याचे प्राण वाचले. सध्या तो सुखरूप आहे.