सायंकाळपर्यंत नदीपात्रात शोध सुरू होता. मात्र त्याचा ठावठिकाणा समजू शकला नाही.
आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेताना तोल गेल्याने तरुण वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. मात्र तो मिळून आला नाही. मोईन गौसपाक मोमीन (वय २४, रा. हनुमाननगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या वेळी त्याच्या ओळखीची मुलगीही त्याठिकाणी होती तिनेच हा प्रकार नातेवाइकांना कळवला. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती. ती मुलगी कोण होती, याचा पोलिस शोध घेत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता. सध्या तो एका खासगी कंपनीत कामाला होता. सांगलीतील एका मुलीसोबत आज सकाळी तो कृष्णा नदीकाठावर आला होता. सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला. तेथेच तो सेल्फी घेत होता. मोबाईलवर सेल्फी घेताना मोईन नदी पात्रात पडला. मोईनला पोहायला येत होते; परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे त्याला पोहत बाहेर येता आले नाही. तो पाण्याबरोबर वाहून जाऊ लागला. प्रवाहाच्या दिशेने पोहत तो काही अंतर आला; परंतु पुन्हा तो वाहून गेला.
दरम्यान, बंधाऱ्याकडे नागरिक धावले, आरडाओरडा करू लागले.तोवर तो तरुण दूरवर गेला. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन टीम आणि महापालिका अग्निशमन दलाचे जवानही आले. त्यांनी बोटीतून हरिपूरपर्यंत शोध घेतला; परंतु तोपर्यंत नदीपात्रात पाणी वाढले होते. बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे प्रवाहाचा वेगही वाढला होता. सायंकाळपर्यंत नदीपात्रात शोध सुरू होता. मात्र त्याचा ठावठिकाणा समजू शकला नाही. उद्या (ता. ८) सकाळी पुन्हा नदीपात्रात बोटीतून शोध घेण्यात येणार आहे.
दरम्यान, सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात तरुणाच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. त्यांनी ठाणे अंमलदारांकडे चौकशी केली; परंतु या घटनेबाबत कोणतीही नोंद नसल्याचे सांगितले. शोध सुरू आहे, त्यानंतर नोंद केली जाईल, असे स्पष्ट सांगून त्यांना पाठवण्यात आले.
घरात घुसून जबरी चोरी: डोळ्यांत मिरचीपूड टाकून हिसकावले महिलेचे दागिने; सांगलीतील संजयनगर येथील दत्त कॉलनीतील प्रकार
सांगलीतील संजयनगर परिसरातील दत्त कॉलनी येथे चाकूचा धाक दाखवत मिरचीची पूड डोळ्यांत टाकून सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली. चोरट्यांनी घरात घुसून ही चोरी केल्याने घबराट पसरली आहे. याप्रकरणी संगीता रामचंद्र ठोंबरे (रा. राजास्वामी व्यायाम शाळेनजीक, दत्त कॉलनी, सांगली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तिघा अनोळखींविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी संगीता या मजुरी करतात. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिघेजण त्यांच्या घरात घुसले. संशयितांनी चाकू आणि विळा घेऊन दमदाटी करण्यास सुरवात केली. यावेळी संगीता आणि त्यांचे पती यांनी संशयितांना विरोध केला. यावेळी संशयितांनी रामचंद्र यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांच्या गळ्यास विळा, तर पोटास चाकू लावून संगीता यांना दागिने देण्यास सांगितले.
हे देखील वाचा: Shocking! अत्याचार; जन्मदात्या पित्यासह 4 जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिक्षिकेच्या पतीचाही समावेश
संशयितांनी संगीता यांच्या गळ्यातील बोरमाळ आणि कर्णफुले हिसकावून घेतली, तर घरातील डब्यात ठेवलेले गंठण देखील जबरदस्तीने काढून घेऊन तेथून पसार झाले. दरम्यान, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. संशयितांनी घरात घुसून ही जबरी चोरी केल्याने पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे. तातडीने संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
सांगली जिल्ह्यात सहा महिन्यांत साडेसहाशे चोऱ्या, घरफोड्या टोळ्या सक्रिय : २२ कोटींवर ऐवज चोरीस
उघड्या दरवाजातून घरात घुसून चोरी करणाऱ्या टोळीने शहरात धुमाकूळ घातला आहे.. दुचाकी चोरणाऱ्या अनेक टोळ्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत साडेसहाशे चोऱ्या व घरफोड्या झाल्याची नोंद झाली आहे. चोरट्यांचे आव्हान सांगली पोलिसांसमोर आहे. दुसऱ्या बाजूला, शहरासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुट्यांच्या कालावधीत बंद घरांना लक्ष्य करून चोरटे सक्रिय होतात, त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुटीत चोऱ्यांचे प्रामाण वाढल्याचे दिसून आले. चोरटे सीसीटीव्हीतही कैद होत आहेत, मात्र पोलिसांच्या हाती लागत नाहीत, अशी अवस्था आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी रेकॉर्डवरील चोरट्यांचा बंदोबस्त केल्याचे पोलिस वारंवार सांगतात. मात्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे.
परप्रांतीय टोळ्याही आता सक्रिय झाल्या आहेत. शहरात दररोज दुचाकी चोरीलाच जाते, यावर पोलिस अधीक्षक दक्षतेच्या सूचना नागरिकांना देताना दिसतात. मात्र, चोरटे अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत. गेल्या सहा महिन्यात शहरासह जिल्ह्यात चोरी व घरफोडीच्या ६५१ घटना घडल्या आहेत. यामध्ये मोटारसायकल, वाहन, जनावर चोरी, मोबाईल, घरात शिरून केलेली चोरी यांसह अन्य प्रकारच्या चोऱ्यांचा समावेश आहे.
यामध्ये २२ कोटी २३ लाख ८० हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करून १९ कोटी ९० लाख ७४ हजार २३७ रुपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात यश आले आहे. चोरीचे गुन्हे निर्गती करण्याचे प्रमाण ९० टक्के आहे, असे पोलिस सांगतात. अद्याप २ कोटी ३३ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल मिळाला नसल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. चोऱ्यांचे सत्र थांबवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेलाही ते आव्हान देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिस दलाकडून आता कोणता ‘अॅक्शन प्लॅन ‘राबवणार हे पाहावे लागेल.