मुंबई,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
राज्यातील एसटी बसस्थानक आणि आगारांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस तंत्रज्ञानाच्या वापराला गती देण्यासोबतच महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या दालनात झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक यांनी विविध निर्णय जाहीर केले. राज्यभरातील सर्व बसस्थानकांमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच नवीन बसेस सीसीटीव्हीने सुसज्ज असतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसेसना ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महिला सुरक्षा आणि स्वच्छतेवर भर
महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, बसस्थानकांवर महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, असे निर्देशही देण्यात आले. याशिवाय, प्रत्येक बसस्थानकात महिलांसाठी प्रशस्त आणि स्वच्छतागृहाची सोय केली जावी. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्वच्छतेचा आढावा घ्यावा, असेही सांगण्यात आले.
सुरक्षा व्यवस्थेतील सुधारणा
राज्यातील सर्व एसटी आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करण्यात येणार आहे. तसेच निर्लेखित बसेस आणि जप्त केलेली वाहने १५ एप्रिलपर्यंत आगारातून हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपदासाठी भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला जाणार आहे.
परिवहन व्यवस्थापन अधिक काटेकोर
बसस्थानक आणि आगारांची सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठी गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगार व्यवस्थापकांनी स्वतः आगारातच वास्तव्य करावे, जेणेकरून व्यवस्थापनावर त्यांचे नियंत्रण राहील. तसेच प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून प्रवाशांची फसवणूक टाळता येईल.
हे देखील वाचा: क्राईम / रहस्यमय स्टोरी 2 : काळोखातला कट / The Dark Conspiracy
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना
बसस्थानकांवर येणाऱ्या प्रत्येक बसची सुरक्षा रक्षकांकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. चालक आणि वाहकांनी आगारातून बस सोडताना ती बंद असल्याची खात्री करावी. सुरक्षा रक्षकांनी परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करावी.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा पुरवण्याचे आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयांमुळे एसटी महामंडळाच्या सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.