शिक्षिका सौ.रिहाना नदाफ यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्यस्तरीय निवड
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ.रिहाना अजिम नदाफ यांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. सौ.नदाफ यांच्या “रोबोटिक्स अँड कोडींगचा प्राथमिक शिक्षणात वापर ” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्यस्तरीय उत्कृष्ट नवोक्रम म्हणून निवड झाली आहे. त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
शिक्षक ध्येय, सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड; हिंद एज्युकेशन सोसायटी दापोली जि. रत्नागिरी आणि मिलिंद दीक्षित, उपसंपादक, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या स्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता. शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली गेली आहे. राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. अ) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी) ब) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत)
हे देखील वाचा: विजेयचा अहंकार: मुलांसाठी गोष्ट 3 / Vijay’s ego: A story for children
रिहाना नदाफ यांनी प्राथमिक गटातून नवोक्रमासाठी नोंदवला होता सहभाग
अ आणि ब गटातील एकूण ३८ विजेत्या शिक्षिका, शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यातआले.तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल प्रमाणपत्र पाठविण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाळेखिंडी येथील सौ.रिहाना अजिम नदाफ यांनी प्राथमिक गटातून नवोक्रमासाठी सहभाग नोंदवला होता आणि त्यांच्या “रोबोटिक्स अँड कोडींगचा प्राथमिक शिक्षणात वापर ” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा राज्यस्तरीय निवड करण्यात आली.
नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट नवोपक्रम सादर करणाऱ्या शिक्षकांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षिका सौ.रिहाना अजिम नदाफ यांना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सार शेख, श्री. पाटील आणि तानाजी गवारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वाळेखिंडी केंद्राचे केंद्रप्रमुख कैलास गायकवाड, जिल्हा परिषद शाळा वाळेखिंडीचे मुख्याध्यापक श्री. टेकाळे आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचेही सहकार्य लाभले.