भारतीय संस्कृतीत शिक्षकाला प्राचीन काळापासून सर्वोच्च मानाचे स्थान देण्यात आले आहे. ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः’ या मंत्रात गुरुंना देवतांच्या बरोबरीचे स्थान दिले गेले आहे. शिक्षणाच्या पवित्र परंपरेत गुरु-शिष्य हे नातं केवळ ज्ञान देणारे आणि घेणारे एवढ्यावरच मर्यादित नव्हते, तर ते संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवणारं नातं होतं. मात्र आजच्या काळात शिक्षकाच्या सन्मानाला आणि या व्यवसायाच्या प्रतिष्ठेला समाजात अनेक कारणांमुळे तडा जाताना दिसतो.
आजच्या भारतात मोठा प्रश्न असा उभा राहतो की, शिक्षकांना खऱ्या अर्थाने तो सन्मान मिळतो आहे का, ज्याचा उल्लेख आपण आपल्या परंपरेत नेहमी करतो? हा व्यवसाय अजूनही तरुणांची पहिली पसंती आहे का? आणि जर आपण परदेशांच्या तुलनेत आपल्या शिक्षकांची स्थिती पाहिली, तर आत्मपरीक्षणाची गरज नाही का?
बदलती सामाजिक धारणा
आज अशी वेळ आली आहे की मूल शिकायला सुरुवात करताच बहुतांश पालक व नातेवाईक त्याला इंजिनिअर, डॉक्टर, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्ने दाखवतात. पण क्वचितच कोणी आपल्या मुलाने शिक्षक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. ही कटु पण खरी वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात गुरु-शिष्य परंपरा असूनही, शिक्षक व्यवसाय आज कमी लेखला जातो. अनेक जण हा व्यवसाय आवडीने नव्हे तर मजबुरीने स्वीकारतात. ही स्थिती का निर्माण झाली आहे, यावर सखोल विचार करणे आवश्यक आहे.
शिक्षकाचे बदलते स्वरूप
प्राचीन भारतात गुरुकुल परंपरेत गुरु शिष्याच्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदार असत. त्यांना पगार मिळत नसे, तर शिष्यांकडून ‘दक्षिणा’ मिळे—जी सन्मान आणि कृतज्ञतेचे प्रतीक होती. शिष्य गुरुकुलात दाखल झाला की, त्याच्यावर गुरूंचा पूर्ण अधिकार असे. पालकांनाही त्या नात्यात हस्तक्षेप करता येत नसे. आज मात्र चित्र बदलले आहे. शिक्षण हा व्यवसायिक पातळीवर परिभाषित झाला आहे. शिक्षक आता फक्त ज्ञान देणारा व्यक्ती राहिलेला नाही, तर त्याला असंख्य प्रशासकीय जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. यामुळे अध्यापनाच्या मूळ कार्यावर परिणाम होतो.
अनेक जबाबदाऱ्यांचा ताण
आज शिक्षकांचे काम केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नाही. त्यांना मध्यान्ह भोजन योजनेची देखरेख, निवडणूक ड्युटी, जनगणना, लसीकरण जनजागृती मोहिमा अशा विविध शासकीय कामांत गुंतवले जाते. हे काम समाजासाठी महत्त्वाचे असले तरी त्या बदल्यात शिक्षकांना ना सन्मान मिळतो, ना आवश्यक संसाधने. परिणामी त्यांच्यात असंतोष आणि हताशा वाढते. हेच एक मोठे कारण आहे की तरुण पिढी हा व्यवसाय स्वीकारण्यास टाळाटाळ करते.
आर्थिक कारण
कोणताही व्यवसाय निवडताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्थैर्य. परंतु शिक्षकांना आयटी, फायनान्स किंवा मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रांच्या तुलनेत सुरुवातीचे वेतन खूपच कमी मिळते. त्यामुळे संधी खर्च अधिक भासतो. याशिवाय करारनामा, अल्पकालीन किंवा आउटसोर्स नियुक्त्यांमुळे त्यांच्या कामाचा उत्साह कमी होतो. गेस्ट लेक्चरर किंवा तात्पुरत्या शिक्षकांना मर्यादित वेतन आणि सुविधा मिळतात, त्यामुळे या क्षेत्रात दीर्घकालीन कारकीर्द घडवणे कठीण बनते.
भरती प्रक्रियेतील अडचणी
शासकीय शिक्षक भरतीची प्रक्रिया अत्यंत प्रदीर्घ असते. जाहिरात निघाल्यापासून प्रत्यक्ष रुजू होईपर्यंत अनेक वर्षे जातात. या कालावधीत तरुण दुसऱ्या पर्यायांकडे वळतात. परीक्षेत पेपरफुटी, वारंवार होणारे खटले आणि परीक्षा रद्द होण्यासारख्या घटनांमुळे या प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होतो. वेळ, पैसा आणि उर्जेची नासाडी होते. पूर्वी ही प्रक्रिया तुलनेने सोपी होती, मात्र आता ती दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे.
कार्यपरिस्थिती
बहुतेक शिक्षकांवर अनेक वर्गांचा आणि विषयांचा ताण प्रचंड असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे कठीण होते. काही खासगी शाळा सोडल्यास बहुसंख्य शाळांमध्ये प्रयोगशाळा, वाचनालय, स्मार्ट क्लास, इंटरनेट यांसारख्या किमान सुविधांचाही अभाव असतो. ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. शिक्षकांना ज्ञान देण्यासाठी जे वातावरण मिळायला हवे, ते न मिळाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
बदलाची गरज – अनेक स्तरांवर
शिक्षकांचे मुख्य कार्य म्हणजे अध्यापन. त्यांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करून शाळेत शिक्षणकेंद्रित वातावरण तयार करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर शाळांच्या पायाभूत सुविधांत सुधारणा करणे, प्रयोगशाळा, वाचनालय, स्मार्ट क्लास, इंटरनेट यांसारख्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामुळे शिक्षकांवरील ताण कमी होईल आणि ते आपले लक्ष पूर्णपणे अध्यापनावर केंद्रित करू शकतील. त्याच वेळी तरुणांच्या मनात या व्यवसायाबद्दल समर्पण आणि आदर टिकून राहील.
सामाजिक आदर आणि माध्यमांची भूमिका
आज समाजात शिक्षक या व्यवसायाचा सन्मान घटत चालला आहे. लोक या व्यवसायाकडे उदासीनतेने का पाहतात, याची कारणे शोधून ती दूर करणे आवश्यक आहे. माध्यमांनी आणि समाजाने शिक्षकांना ‘सोशल हिरोज’ म्हणून मान्यता दिली, त्यांना पुरस्कार आणि सामाजिक सन्मान मिळाला, तर निश्चितच सकारात्मक बदल घडेल. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान हे पायाभूत असते. प्रत्येक अभियंता, डॉक्टर, वैज्ञानिक, नेता, कलाकार घडविण्यामागे एखादा शिक्षक उभा असतो. त्यामुळे या व्यवसायाला कमी लेखणे म्हणजे समाजाच्या मूळ पायााला तडा देणे होय.
शिक्षक हा समाजाच्या भविष्याचा पाया आहे. प्राचीन परंपरेत त्यांना जे सर्वोच्च स्थान दिले गेले होते, ते आज प्रत्यक्षातही मिळाले पाहिजे. शिक्षकांवरील प्रशासकीय ओझे कमी करून, भरती प्रक्रिया सुलभ करून, आर्थिक स्थैर्य देऊन, कार्यपरिस्थिती सुधारून आणि समाजातील त्यांना योग्य सन्मान देऊनच हा व्यवसाय पुन्हा तरुणांच्या पहिल्या पसंतीचा होऊ शकतो. शिक्षक फक्त ज्ञान देत नाहीत, तर पिढ्या घडवतात. म्हणूनच त्यांना योग्य सन्मान, प्रतिष्ठा आणि सुविधा मिळणे हे केवळ शिक्षकांचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. जेव्हा आपण शिक्षकांना खऱ्या अर्थाने ‘सोशल हिरोज’ म्हणून ओळखू, तेव्हाच आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेला आणि समाजाला सक्षम व उज्ज्वल भविष्य देऊ शकू.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली