शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधावर परिणाम
प्राचीन काळी भारतीय संस्कृतीत अध्यापनाची गुरुकुल परंपरा प्रचलित होती, ज्यात शिष्य गुरूंसोबत राहून शिक्षण व संस्कार प्राप्त करायचे. पुढे शाळा आल्या. शाळांमध्ये शिष्यांना म्हणजेच विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात झाली आणि आता या आधुनिक जमान्यात AI आधारित शिक्षकही विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहेत. आजच्या आधुनिक युगात सर्वत्र परिवर्तनाचे जोरदार वारे वाहत आहे. बदलाच्या या वाऱ्यापासून कोणतेही क्षेत्र अस्पर्श राहिलेले नाही. मग ते शिक्षण असो किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते असो. विशेषतः तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधावरही मोठा परिणाम झाला आहे. या युगात प्रत्येक गोष्टीची माहिती फक्त एका क्लिकच्या अंतरावर आहे. अशा वातावरणात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील जवळीक संपली नसली तरी ती कमी होऊ लागली हे मात्र नक्की.
नवे तंत्रज्ञान आले असले शिक्षकाचे महत्त्व कमी झालेले नाही
वैदिक काळातील गुरुकुल पद्धतीत गुरू आणि शिष्य यांचे नाते पिता-पुत्राचे होते आणि त्या काळात एक प्रकारे अनौपचारिक शिक्षण दिले जात असे. मात्र आजची शिक्षणपद्धती पूर्णपणे बदलली आहे. आज व्यावसायिक बनण्याची वेळ आली आहे. ते देखील कौशल्य विकसित करण्यासाठी. याचा परिणाम शिक्षक-विद्यार्थी संबंधांवरही होत असल्याचे उघडपणे दिसत आहे. याबाबत शिक्षक सांगतात, ‘आजच्या तांत्रिक सुविधा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात शिक्षकांची भूमिका पूर्वीइतकीच महत्त्वाची आहे. फरक एवढाच आहे की आता मुलं हुशार झाली आहेत. आता त्यांना गॅझेट कसे वापरायचे हे माहित आहे. विशेषत: कोरोनाच्या काळात, जेव्हा ते मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून सलग दोन वर्षे शिक्षकांशी कनेक्ट होते, तेव्हा त्यांना खूप काही शिकायला मिळाले.
शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही थोडे व्यावसायिक झाले आहेत
आताचे युग AI चे आले आहे. जिथे सर्व माहिती एका स्पर्शात उपलब्ध आहे. पण एवढे असूनही शिक्षकांच्या महत्त्वात काहीही फरक पडलेला नाही, कारण कोणताही रोबो शिक्षक जेवढे सांगितले आहे किंवा फीड केले आहे, तेवढेच बोलू शकतो. इथे शिक्षक जसे स्वतः; पुढे उभे राहून नीटपणे समजावून सांगू शकतात, तसे त्याला समजावून सांगता येणार नाही. याशिवाय आजकालची मुलं असे काही प्रश्न विचारतात, जे वरच्या लेव्हलचे असतात. यासाठी आजच्या शिक्षकांना दररोज स्वत:ला अपडेट ठेवावे लागते. जेणेकरून ते मुलांची जिज्ञासा पूर्ण करू शकतील. आताच्या या युगात शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही थोडे व्यावसायिक झाले आहेत हे निश्चित. तरीही सहानुभूती आणि जिव्हाळ्याची तार त्यांना कुठेतरी जोडत आहे. आजही विद्यार्थ्यांचे काही आवडते शिक्षक आहेत, ज्यांची शिकवण्याची शैली त्यांना खूप आवडते.
आजच्या शाळा सेकंड होम होऊ लागल्या आहेत
आज शाळा देखील त्या पूर्वीच्या राहिलेल्या नाहीत. आज त्यामध्ये सर्व प्रकारची आधुनिकता आली आहे. नव्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे, जेणेकरून शिकवणे आणि शिकणे या दोन्ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे चालतील. काळ आणि परिस्थिती आधुनिक झाली असली तरी गुरुकुल पद्धती आता व्यवहारात नाही. पण शाळा आता पुन्हा मुलांचे दुसरे घर (सेकंड होम) होऊ लागल्या आहेत. घरानंतर ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ कुठे घालवतात तर शाळेत. आता मुलांना आनंदाने शाळेत जायला आवडते. त्यांना तिथे मोकळी हवा आणि वातावरण मिळते. जिथे ते खूप काही शिकतात. प्रत्येक पावलांवर त्यांना त्यांच्या लाडक्या शिक्षकांनी साथ दिली आहे, जे त्यांच्या अनुभवांनी त्यांचा पुढचा मार्ग मोकळा करतात.
शिक्षक– विद्यार्थी नाते अजूनही अखंड आहे
प्राचीन काळी शिक्षकांना वडिलांप्रमाणे वागणूक दिली जात असे. त्यांचे विद्यार्थ्यांशी पिता-पुत्राचे नाते होते. आज काळ नक्कीच बदलला आहे. पण त्यांच्यातील बंध अजूनही कायम आहे. आजही अनेक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भरभरून प्रेम देतात. अशावेळी महिला शिक्षिका असेल तर तिचे लहान मुलांशी स्नेहाचे संबंध असतात. मुलाने टिफिन खाल्ले की नाही? कुणाला दुखापत झाली का? या सगळ्याची ती खूप काळजी घेते. त्यामुळे शिक्षकांचे मुलांशी असलेले नाते घट्ट होते. ते अधिक लक्षपूर्वक अभ्यास करतात. शिक्षक सांगतात की, अनेकदा लहान मुलांना शिकवताना आमची त्यांच्याशी मैत्री होते. अनेकवेळा ते त्यांचा टिफिन आणायला विसरले तर आम्ही आमचा डबा त्यांच्यासोबत शेअर करतो. मुलांच्या सर्व समस्या आणि गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ते शाळेत असताना घराच्या पेक्षा त्यांना वेगळे वाटू नये. शिक्षक मुलांची खडानखडा माहिती ठेवतात.
कालानुरूप जबाबदारी वाढतेय
आधुनिक युगात, शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना केवळ विषयाचे ज्ञानच नाही तर त्यांना जीवन कौशल्ये, त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक विकासासाठी तयार करावे लागणार आहे. आज शिक्षक मुलांना शाळेत सक्रिय ठेवण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या दृष्टिकोनातून पाहिल्यास सध्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या संदर्भात शिक्षकाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे.
अलीकडचे विद्यार्थी खूप जिज्ञासू आणि तंत्रज्ञान जाणणारे झाले आहेत. त्यामुळे आधुनिक संदर्भात शिक्षकांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. आजचे युग आधुनिकतेचे आहे, स्पर्धेचे आहे आणि वेगाने वाढणारे देखील आहे. त्यामुळे आज विद्यार्थ्यांचे जीवन पूर्वीसारखे सोपे, शांत आणि संयमी राहिलेले नाही. वेगाने पुढे जाणे आणि पुढे जात राहणे ही त्यांची मजबुरी बनली आहे. त्यांनी असे केले नाही तर जीवनाच्या शर्यतीत ते मागे राहतील. त्यासाठी त्यांना तयार करणे ही शिक्षकांची जबाबदारी बनली आहे.
हे देखील वाचा: Sangli Crime / सांगली : पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड; दारूसाठी कृत्य
सर्वांगीण विकासासाठी सज्ज राहा
शिक्षणाचा मुख्य उद्देश व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा आहे, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या भावी जीवनासाठी पूर्णपणे तयार होऊन स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील. अशा परिस्थितीत शिक्षकाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. प्राचीन काळी जेव्हा गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती, तेव्हाही गुरु त्या काळातील परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना तयार करायचे. आजच्या परिस्थितीत हे अधिक आवश्यक झाले आहे, कारण आज शिक्षकाने मुलांचा बौद्धिक, नैतिक, मानसिक आणि शारीरिक विकास तर करायचा आहेच पण त्यांचा सामाजिक आणि चारित्र्यदृष्ट्या विकास करणेही गरजेचे झाले आहे.
– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली