सरकारी शाळेतील शिक्षिकेवर कारवाई करण्याचे आश्वासन
जयपूर / आयर्विन टाइम्स
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरच्या एका शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, या व्हिडिओत दोन अल्पवयीन विद्यार्थी शिक्षिकेचे पाय दाबत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हा प्रकार जयपूरच्या राजकीय उच्च प्राथमिक विद्यालय करतारपूरा येथे घडला आहे.
सदर व्हिडिओत एक शिक्षिका चटईवर पोटावर झोपलेली, तर दुसरी शिक्षिका बाजूलाच खुर्चीवर बसलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन लहान मुले त्या शिक्षिकेचे पाय दाबत असल्याचे पाहायला मिळत आहे. या धक्कादायक घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.
चक्क राजधानीतल्या शाळेत घडली घटना: शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
जयपूर हे राज्यातील प्रशासनाचे मुख्य केंद्र आहे. येथे सरकारचे अनेक उच्च अधिकारी, शिक्षण विभागाचे प्रमुख आणि शिक्षणमंत्री यांची कार्यालये आहेत. असे असतानादेखील राजधानीतील म्हणजेच शहरातील शाळांमध्ये शिक्षणाच्या नावाखाली अशा अनैतिक गोष्टी घडत असतील तर ग्रामीण भागातील शाळांचे काय हाल असतील, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
जयपूर शहरातील करतारपूरा शाळा मालवीय विधानसभा क्षेत्रात येते. या क्षेत्राचे माजी शिक्षणमंत्री कालीचरण सराफ असून, त्यांच्या कार्यकाळात शाळांची परिस्थिती कशी होती यावरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, सचिवालय आणि मुख्यमंत्री निवासस्थानापासून काहीच अंतरावर ही शाळा असूनसुद्धा येथे असा प्रकार घडल्याने शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था उघड झाली आहे.
प्रकरणाची चौकशी आणि कारवाईचे आदेश
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शाळेच्या मुख्याध्यापिका अनु चौधरी यांनी त्वरीत तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. “हा व्हिडिओ बुधवारी माझ्या पाहण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षिका आणि विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेण्यात येईल. घटनेचा पूर्ण तपास केल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल,” असे अनु चौधरी यांनी स्पष्ट केले.
तसेच त्यांनी पुढे असेही सांगितले की, “शाळांमध्ये अशा प्रकारचे वर्तन अत्यंत निंदनीय आहे. शिक्षिका असो वा इतर कोणी, विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे पाय दाबून घेणे मुळीच मान्य करता येणार नाही.” सध्या हा व्हिडीओ तिफण व्हायरल होताना दिसत आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
समाजातील तीव्र प्रतिक्रिया
या घटनेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थितीवर प्रश्न विचारले आहेत. “विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षणासाठी पाठवले जाते की शिक्षिकांचे पाय दाबण्यासाठी ?” अशी संतप्त प्रतिक्रिया एका पालकाने दिली आहे. अनेकांनी शिक्षिकेच्या या बेशिस्त वर्तनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
घटनाक्रम आणि शिक्षण व्यवस्थेची दुर्दशा
जयपूरच्या सरकारी शाळेत घडलेली ही घटना केवळ स्थानिक प्रकरण नसून, शिक्षण क्षेत्रातील ढिसाळपणाचा आणि बेशिस्त कारभाराचा एक नमुना आहे, असे मानले जात आहे. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून, अशा प्रकारच्या गैरवर्तनाला पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरत आहे.