रणझुंजार मुरारबाजी देशपांडे यांच्या जीवनावर चित्रपट
आयर्विन टाइम्स / मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक शूर मावळ्यांनी इतिहास घडवला, त्यातले एक होते रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी त्यांनी आपल्या पराक्रमाने शेकडो शत्रूंना पराभूत केले. त्यांचा धाडसी इतिहास आजही प्रेरणादायी आहे. स्वराज्याच्या इतिहासात ‘पुरंदरचे काळभैरव’ म्हणून ओळखले जाणारे मुरारबाजी देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘वीर मुरारबाजी…पुरंदर की युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे.
अभिनेते सौरभ राज जैन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार
‘वीर …पुरंदर की युद्धगाथा’ हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘श्रीकृष्ण’ आणि ‘महादेव’ यांसारख्या मालिकांमध्ये तसेच ‘ओम नमो व्यंकटेशाय’ या दाक्षिणात्य चित्रपटात ‘तिरुपती बालाजी’ यांच्या भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणारे अभिनेते सौरभ राज जैन या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख त्यांच्या विलोभनीय पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली आहे.
‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटांच्या यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स आणि ए.ए. फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी… पुरंदर की युद्धगाथा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, आणि भाऊसाहेब आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. सौरभ राज जैन यांनी म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. माझ्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेलाही हेच प्रेम मिळेल.”
मुरारबाजी देशपांडे यांची शौर्याची गाथा
१६६५ च्या आषाढ महिन्यात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला होता. त्या वेळी देशपांडे यांनी निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून जाऊन अद्वितीय पराक्रम केला. मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याची गाथा आजच्या पिढीला समजावी म्हणून ‘वीर मुरारबाजी… पुरंदर की युद्धगाथा’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे, असे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले.
“आम्हाला अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहोचवायचा आहे,’ त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असेही त्यांनी नमूद केले. हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये देशभर प्रदर्शित होणार आहे.