विजेयचा हातात जणू काही जादूच होती
प्राचीन काळात, गांधार प्रदेशात विजेय नावाचा एक प्रसिद्ध मूर्तिकार राहत होता. त्याच्या हातात जणू काही जादूच होती. त्याने तयार केलेल्या शिल्पांमुळे त्याचे नाव संपूर्ण भरतखंडात दुमदुमले होते. त्याची कला इतकी अप्रतिम होती की, त्याच्याकडून शिल्प तयार करून घेण्यासाठी अनेक राजा-महाराजे येत असत. त्याच्या हाच कला राजवर्धन राजाला एवढी भावली की, त्याने आपल्या राजवाड्याच्या परिसरात अनेक शिल्पे त्याच्याकडून बनवून घेतली.
परंतु, विजेयच्या या कौशल्यामुळे त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याला वाटू लागले की, तोच सर्वोत्तम कलाकार आहे. या अहंकारामुळे अनेक जवळचे मित्र त्याला दुरावले. त्याच्या स्वभावातील बदलामुळे त्याचे सखेसोबती त्याच्यापासून दूर होऊ लागले.
हे देखील वाचा: Children’s Story/ लहान मुलांसाठी गोष्ट: संजय सर आणि राहुल; स्नेहाचा धागा
एके दिवशी सूरजदीप राज्यातील मंत्री आणि राजगुरू शक्तिबाबा मूर्तिकाराकडे आले. त्यांनी विनंती केली की, “राजवर्धन राजाचे शक्तिबाबा यांच्यावर अपार श्रद्धा आहे. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा एक सुंदर पुतळा आपण तयार करून द्यावा.”
मूर्तिकाराने थोडासा अहंकारीपणे विचारले, “शक्तिबाबांकडे अशी कोणती विशेषता आहे की, त्यांच्यावर राजांची एवढी श्रद्धा आहे?” मंत्री म्हणाले, “शक्तिबाबांकडे भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळ जाणण्याची अद्वितीय शक्ती आहे.”
हे ऐकून मूर्तिकार अजूनच गर्विष्ठ झाला आणि म्हणाला, “बाबा, तुम्ही राजाचे भविष्य सांगता, तर माझेही भविष्य सांगा. मात्र, माझ्या प्रसिद्धी, पैशांबद्दल काहीही सांगू नका. त्याव्यतिरिक्त जर काही समजत असेल, तर ते सांगा.”
शक्तिबाबांनी मूर्तिकाराच्या अहंकारी स्वभावाची जाणीव केली आणि म्हणाले, “विजेय, तुझे भविष्य सांगणे सोपे नाही, परंतु ते तितकेसे आनंददायी नाही.” विजेय जरा घाबरला आणि म्हणाला, “कृपया सांगा, मी ऐकण्यास तयार आहे.”
शक्तिबाबा शांतपणे म्हणाले, “तुझं आयुष्य आता फक्त चाळीस दिवस उरलं आहे. चाळिसाव्या दिवशी मध्यरात्री तुला मृत्यू येईल.” हे ऐकताच मूर्तिकार हादरला. त्याला भीती वाटू लागली, पण त्याच्या अहंकाराने त्याला यमराजालाच फसवण्याचा विचार करायला लावला.
मूर्तिकाराने यमराजाला चकवण्यासाठी स्वतःच्या पाच मूर्ती बनवल्या आणि त्या मूर्त्यांसोबत स्वतःही झोपून राहिला. चाळीसाव्या दिवशी, यमराज आला. त्याला सहा विजेयसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती जमिनीवर झोपलेल्या दिसल्या. खरा मूर्तिकार कोण, हे ओळखणे कठीण होते.
यमराज थोडा विचारात पडला, पण मग तो मोठ्याने म्हणाला, “मूर्तिकाराने या पाच मूर्ती अप्रतिम बनवल्या आहेत, पण एका मूर्तीत मोठी चूक केली आहे. ती चूक त्याच्या लक्षात कशी आली नाही?” हे ऐकताच विजेय उठून बसला आणि विचारले, “कोणती चूक आहे ते सांगा?”
यमराज हसला आणि म्हणाला, “चूक तुझ्या मूर्तीत नाही, विजेय. चूक तुझ्या मनात आहे—तुझ्या अहंकारात. तू एक महान कलाकार आहेस, पण अहंकारामुळे तू आनंदी नाहीस.”
हे देखील वाचा: (बालकविता) गोष्ट सांगती आजोबा
हे ऐकताच विजेयला आपल्या चुकांची जाणीव झाली. त्याने यमराजाच्या पायावर लोळण घेतली आणि म्हणाला, “मला माफ करा. माझ्या अहंकारामुळे मी मोठी चूक केली आहे.” शक्तिबाबा, हे सर्व पाहत होते. त्यांनी विजेयचा अहंकार घालवण्यासाठीच हे नाट्य रचले होते.
त्या दिवसापासून विजेयने आपला अहंकार सोडला आणि तो पुन्हा एकदा नम्र आणि संतुलित कलाकार बनला.
या गोष्टीतून काय शिकवण मिळते?
या गोष्टीतून आपण शिकतो की, मोठे कौशल्य असले तरी अहंकाराला आपल्या जीवनात स्थान नसावे. अहंकाराने माणसाला त्याच्या खऱ्या आनंदापासून दूर केले जाते.