वाचा छान छान गोष्टी

छान छान गोष्टी आवडतात ना वाचायला? चीनू आणि आईची गोष्ट

एका गावात चीनू नावाची एक लहान मुलगी होती. ती अतिशय चंचल, कल्पनाशील आणि गोष्टी ऐकण्यात रमणारी होती. रोज रात्री झोपताना आई तिला वेगवेगळ्या परीकथा सांगायची. त्या गोष्टींमध्ये परीलोकाचं वर्णन असायचं – एक सुंदर, जादुई जग, जिथे प्रत्येक गोष्ट चमकदार आणि मोहक असायची. तिथल्या पर्‍या सदैव आनंदी, प्रेमळ आणि मदत करणाऱ्या असायच्या. चीनूला परीलोकाबद्दल ऐकून इतकं रोमांचक वाटायचं की कधीतरी तिला खरंच त्या जादूच्या जगात जाण्याची इच्छा होत असे.

वाचा छान छान गोष्टी

एके रात्री, आईने परीलोकाबद्दलची एक सुंदर गोष्ट सांगितली आणि चीनूला गोष्ट ऐकता ऐकता झोप लागली. तिच्या मनात ती गोष्ट अजूनही फिरत होती. झोपेत ती परीलोकातच रमलेली होती. तेवढ्यात, अचानक कोणीतरी तिचं नाव घेऊन हाक मारली, “चीनू! ए चीनू! उठ, उठ!” तो आवाज खूप गोड आणि मोहक होता. चीनूच्या कानांवर तो आवाज पडताच ती थोडीशी जागी झाली. तिने डोळे उघडून बघितलं, तर काय आश्चर्य! तिच्या समोर एक सुंदर परी उभी होती.

हे देखील वाचा: छान छान गोष्टी : Story for children / मुलांसाठी गोष्ट 5 : स्वप्नातील हत्ती आणि चाणाक्ष घुबड / Dreamy elephants and clever owl

त्या परीने पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते, जणू काही पांढऱ्या आणि गुलाबी फुलांनी बनलेलं वस्त्र. तिच्या हातात एक चमचमणारी जादूची कांडी होती. परीने हसत चीनूला विचारलं, “तुला मला भेटायचं होतं ना? आणि परीलोकात जायचं होतं, बरोबर ना?” चीनूची सगळी स्वप्नं सत्यात उतरत असल्यासारखी वाटली. तिला विश्वासच बसत नव्हता की प्रत्यक्ष परी तिच्यासमोर उभी आहे! (वाचा छान छान गोष्टी)

चीनू आनंदाने म्हणाली, “हो, हो! मला खरंच परीलोकात जायचंय! तिथल्या सगळ्या पर्‍यांना भेटायचंय!” परीने हसत तिचा हात धरला आणि जादूची कांडी फिरवली. क्षणात त्या दोघी आकाशात उडू लागल्या. चीनूला तो एक स्वप्नवत रोमांचक अनुभव वाटत होता. थोड्याच वेळात त्या परीलोकात पोहोचल्या.

हे देखील वाचा: छान छान गोष्टी : Children’s story 4 : स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा / Believe in your own abilities

परिलोक तसंच होतं जसं आईने वर्णन केलं होतं – पांढऱ्या संगमरवरी इमारती, नद्या, डोंगर आणि सगळीकडे फक्त सौंदर्याचं राज्य होतं. तिथल्या प्रत्येक गोष्टीला एक अद्भुत चमक होती. चीनूच्या नजरेसमोर सगळ्या पर्‍या सुंदर पांढरे वस्त्र परिधान करून उभ्या होत्या. त्या खूप आनंदी दिसत होत्या. चीनू त्यांना बघून खुशीत धावू लागली.

पण इतक्यात काहीतरी घडलं, जोराचा आवाज झाला आणि चीनूची झोपमोड झाली. ती थेट आपल्या बिछान्यावरून खाली पडली होती! चीनूने आजूबाजूला पाहिलं, तिची आई कोपऱ्यात उभी हसत होती. आईच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून चीनूला समजलं की ती स्वप्न पाहत होती. ती पटकन उठून आईकडे धावली आणि आईला जाऊन बिलगली. तिनं हळू आवाजात विचारलं, “आई, पर्‍या फक्त गोष्टींमध्येच असतात का गं?”

हे देखील वाचा: छान छान गोष्टी : विजेयचा अहंकार: मुलांसाठी गोष्ट 3 / Vijay’s ego: A story for children

आईने हसत चीनूच्या केसांतून हात फिरवत उत्तर दिलं, “हो बाळा, पर्‍या फक्त गोष्टींमध्येच असतात. पण त्या गोष्टी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवतात. स्वप्नं पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ती आपल्याला नवी प्रेरणा देतात.”

चीनूला आईच्या या उत्तरातून काहीतरी नवं समजलं. जरी पर्‍या गोष्टींमध्ये असल्या तरी त्यांचं अस्तित्व आपल्या स्वप्नांमधून आपल्याला प्रेरणा देणारं असतं. ती पुन्हा आईला घट्ट बिलगली.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !